Sunil Borkar Agrowon
ॲग्रो विशेष

Sunil Borkar : गुणनियंत्रण संचालकपदी सुनील बोरकर यांची नियुक्ती

Director of Input and Quality Control : राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदाचा घोळ राज्य सरकारने अखेर संपुष्टात आणला आहे. या पदावर सुनील चंद्रकांत बोरकर यांची नियुक्ती झाली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदाचा घोळ राज्य सरकारने अखेर संपुष्टात आणला आहे. या पदावर सुनील चंद्रकांत बोरकर यांची नियुक्ती झाली आहे. गुणनियंत्रण विभागात यापूर्वी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज केलेले श्री. बोरकर थेट संचालक म्हणून परत येतील, असे संकेत गेल्या दोन वर्षांपासून मिळत होते.

गुणनियंत्रण संचालकपदावरून विकास पाटील निवृत्त झाल्यानंतर राज्य शासनाने गेल्या दोन आठवड्यांपासून संचालकपद रिक्त ठेवले होते. अखेर कृषी मंत्रालयाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी सोमवारी (ता. १५) दुपारनंतर नव्या पाच संचालकांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले. त्यात श्री. बोरकर यांचे नाव असल्यामुळे ‘गुणनियंत्रण’मधील संभ्रम दूर झाला आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे पूर्णवेळ सहसंचालक श्री. बोरकर आधीपासून कामकाज पहात होते. तसेच सुभाष नागरे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांना देण्यात आला होता. गुणनियंत्रण संचालकपदावर नियुक्तीकरिता सहसंचालकपदाचा तीन वर्षे सेवा अनुभव बंधनकारक आहे.

मात्र तसा अनुभव श्री. बोरकर यांच्याकडे नव्हता. परंतु गुणनियंत्रण विभागातील त्यांचा दांडगा अनुभव विचारात घेत राज्य शासनाने गुणनियंत्रण संचालकपदाची पात्रता घटवून श्री. बोरकर यांची नियुक्ती केली आहे. ‘गुणनियंत्रण संचालकपद आता सहसंचालक वेतनश्रेणीत पदावनत करण्यात येईल. तसा प्रस्ताव कृषी मंत्रालयाकडून सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर केला जात आहे,’ असे श्री. बोरकर यांच्या निवडीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘‘राज्याच्या गुणनियंत्रण विभागाचे काम जलद होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. निविष्ठा उत्पादक, विक्रेते यांच्या समस्या सोडवतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी लक्ष दिले जाईल,’’ अशी प्रतिक्रिया श्री. बोरकर यांनी दिली. दरम्यान, श्री. बोरकर यांच्याकडील आधीचा कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचा अतिरिक्त पदभार आता विनयकुमार जयसिंगराव आवटे यांना पूर्णवेळ स्वरूपात देण्यात आला आहे.

श्री.आवटे आधीदेखील आधी विस्तार संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला आता पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. या पदावर आता किसन मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक म्हणून कार्यरत होते. कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’चे संचालकपदाची सूत्रे अशोक हणमंत किरनळ्ळी यांना पूर्णवेळ देण्यात आले आहे. श्री. किरनळ्ळी सध्या फलोत्पादन सहसंचालक म्हणून कार्यरत होते व आत्मा संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांच्याकडे होता.

विस्तार संचालकपदी रफिक नाईकवाडी

राज्याच्या विस्तार व प्रशिक्षण संचालकपदी आता रफिकसाब शामदभाई नाईकवाडी यांना देण्यात आली आहे. ते पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालकपद सांभाळत होते. त्यांच्याकडे मृद्‍संधारण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभारदेखील होता. विस्तार सेवेतील योजनांचा सूक्ष्म अभ्यास, मंत्रालयीन समन्वयाचा दांडगा अनुभव यामुळे श्री. नाईकवाडी यांना विस्तार संचालकपद मिळाल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj : बहुतांशी भागात पावसाची उघडीप; राज्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाचा अंदाज

Akola Assembly Constituency : विधानसभेचा आखाडा नवा, खेळाडू जुनेच

Heavy Rain : कोल्हापुरात धुवाधार पावसाची हजेरी, पुढच्या २४ तासांत पुन्हा पावसाची शक्यता

Kolhapur Jaggery Market : कोल्हापूर बाजारात गुळाची आवक वाढली; साखर हंगाम लांबणीचा गुऱ्हाळांना फायदा, कांद्यालाही दर

Labor Shortage : मजुरांअभावी सोयाबीन काढणी, कापूस वेचणी लांबणीवर

SCROLL FOR NEXT