इंद्रजीत भालेराव
Summer Vacations : मार्च १९७९ मध्ये मी दहावीची म्हणजे मॅट्रिकची परीक्षा दिली. मला खात्री होती की या परीक्षेत मी नापास होणार, पुढचं आपलं शिक्षणही थांबणार. तोपर्यंत घरात कुणी दहावीपर्यंत शिकलेलंही नव्हतं. मोठे भाऊ लक्ष्मणराव यांना आम्ही अण्णा म्हणायचो, ते चौथीपर्यंत शिकून शेती करायला लागलेले होते. त्यांच्यापेक्षा धाकटे दत्तराव यांना आम्ही दादा म्हणायचो, ते चौथीच्या पुढच्या शिक्षणासाठी आहेरवाडीच्या शाळेत गेले. पण त्यांनीही मध्येच शाळा सोडून शेतीत राबायला सुरुवात केली. त्याला कारणही तसंच घडलं. एका दिवशी दादानं गावात खोड्या केल्या म्हणून तिथल्या बाजीराव पाटील मास्तरांनी त्यांना मारलं.
हे दुसऱ्या दिवशी बाजीराव मास्तरांना खतमच करायचं म्हणून घरातला चाकू लपवून नेताना घरच्यांनी पाहिलं. म्हणून त्यांची शाळाच बंद करण्यात आली. नाहीतर दादा फार हुशार होते. शिकले असते तर फारच मोठे कुणीतरी अधिकारी झाले असते. कारण त्यांच्या अंगात नेतृत्वगुणही होता. पण स्वभावातल्या अतिरेकीपणामुळं सगळंच मागं पडलं आणि त्यांना शेतीत राबावं लागू लागलं. या पार्श्वभूमीवर मी कसाबसा दहावीपर्यंत पोहोचलो होतो. पण मला आता पुढचं माझंही भविष्य दिसू लागलं. या दोन भावांसारखं आपणालाही शेतीतच राबावं लागणार याची मला खात्री पटली होती. आमची इंग्रजी आधीच कच्ची आणि त्यात नेमकं यावर्षी मोक्याच्या वेळेला आमच्या इंग्रजी शिकवणाऱ्या गुरुजींची बदली झाली. आमची परीक्षा होईपर्यंत दुसरे कुणी गुरुजी बदलीवर आलेच नाहीत. त्यामुळं इंग्रजी धोका देणार याची आम्हाला खात्री होती.
एरवी सुट्ट्यांमध्ये आम्ही शेतीतच राबत होतो. आता पक्कं शेतीला लागलं पाहिजे या जाणिवेनं मी शेतात घुसलो. शेतातला ऊस नुकताच निघाला होता. वाकानं फोडण्याचं काम सुरू करायचं होतं. त्यासाठी दोन रोजगार लावले होते. त्यात मी तिसरा सामील झालो. कसून कामाला लागलो. उसाचा खोडवा आधीचाच राखलेला होता. नासधूस झालेल्या वाकानाच्या सरी पुन्हा एकदा टीकाशीनं खोदून त्याची माती वटमावर लावायचं काम सुरू झालं. मी माझी दुपारची भाकरी बांधून घेऊन रोजगारांसोबत जायचो.
त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकंच काम करायचो. मस्त राबू लागलो. दुपारी बांधावरच्या बाभळीच्या सावलीला बसून त्यांच्यासोबत जेऊ लागलो. ओढ्याकाठच्या हिऱ्याचं पाणी पिऊ लागलो. त्यांच्यासोबत त्यांच्यासारख्याच चावट गप्पा करू लागलो. आता आयुष्य यांच्यासोबतच घालवायचं म्हटल्यावर मी माझ्या प्रकृतीला सगळा नाजूकपणा मारण्याचा प्रयत्न करू लागलो. मी राकटही दिसू लागलो आणि माझे स्नायू पिळदार होऊ लागले.
मला शेतात राबताना पाहून शेजारी म्हणायला लागले, आता तिन्ही लेक शेतात राबणारे म्हणल्यावर नारायणरावांची शेती आबादी आबाद होणार ! मला म्हणायचे, पुढं शिकायचं नाही काय रे ? मी म्हणायचो, निकाल लागल्यावर पाहू. ते म्हणायचे, तुला निकालाची खात्री वाटत नाही काय ? मी म्हणायचो, मावशी धोका देण्याची शक्यता आहे. मराठीला माय तर इंग्रजीला तेव्हा सगळे मावशी म्हणायचे. त्यामुळं मी काय म्हणतोय ते सगळ्यांनाच समजायचं. पण मला शेतात राबतांना पाहून वडिलांना फार वाईट वाटायचं. त्यांना वाटायचं मी पुढं शिकायला पाहिजे आणि शेतीतून बाहेर पडायला पाहिजे. माझी हिनार म्हणजे नाजूक प्रकृती शेतात राबायच्या कामाची नाही, असं त्यांना वाटायचं. पण मी मनःपूर्वक शेतात राबतोय याचं त्यांना कौतुकही वाटायचं.
माझ्यासोबत जे दोघंजण होते ते दोघंही कमीजास्त माझ्याच वयाचे होते. पण ते दलित कुटुंबातले आणि नेहमी अशीच कामं करणारे असल्यामुळं त्यांना या कामाची सवय होती. मी अधूनमधून शेतात राबत असलो तरी माझ्या हाताला अशा जड कामाची सवय नव्हती. त्यामुळं माझ्या हाताला फोड आले. टिकावाचे घाव घालून आणि माती भरलेली खोरी ओढून रात्री हात खूप दुखायचे. पण हे दोन-तीन दिवसच झालं. फोड फुटून हाताला घट्टे तयार झाले आणि सरावानं हात दुखायचंही थांबलं. आता हळूहळू अशा अवजड कामांची सवय होऊन जाईल. एकदा माणूस रटलाघटला की त्याला मग अशा कामाचा कंटाळाही येत नाही. याआधी शेतात असं काही काम केलं की आम्ही वडिलांकडून थोडाफार मोबदला घ्यायचो. वडीलही आनंदानं पैसे द्यायचे. तेव्हा आई म्हणायची, त्यांना खायला लागत नाही काय? कुठून येतंय ते ? यांना कशाला पैसे द्यायला पाहिजे ! पण या कामाचा ना मी मोबदला मागितला ना मोबदला घेतला. आता आपण नापास होणार आणि आयुष्यभर हेच करायचय या अपराध भावनेनं पैसे मागण्याचा विचारही मनात आला नाही.
खरंतर आम्ही अभ्यास केला नाही म्हणून नापास होणार नव्हतो, तर आम्हाला शिकवायला गुरुजीच नव्हते म्हणून आम्ही नापास होणार होतो. त्यात आमचा काहीही दोष असणार नव्हता. तरीही तेव्हा गावात नापास होणं ही मोठी नामुष्की समजली जायची. आमच्या आधीच्या वर्षी आमच्या सोबतची आमच्या गावची दोन्ही मुलं मॅट्रिक नापासच झाली होती आणि आता छानपैकी शेतीत रुळलीही होती. पण तरीही नापासचा ढब्बा बदनामीकारक समजला जायचा. आमच्या नापास होण्याला आम्ही कारणीभूत नसलो तरी वाईट मात्र आमचंच होणार होतं. म्हणून आम्हाला वाईट वाटत होतं. माझ्यासोबतच्या गावातल्या कुणाही मुलाला पास होण्याची खात्री नव्हती. किंबहुना नापास होण्याचीच सगळ्यांना खात्री होती. पण ती सगळी मुलं तरीही आनंदातच होती. शेतात राबत होती. खेळत होती. मला साध्या साध्या गोष्टीही मनाला लावून घ्यायची सवयच होती. त्यामुळं वाट्याला दुःखंच यायचं. पण स्वभाव कसा बदलणार ? आज लक्षात येतं की त्यामुळंच तर मी इतरांपेक्षा वेगळा होतो. जास्त संवेदनशील होतो. म्हणूनच कवी झालो असेल. पण हे आज कळतं. तेव्हा ते कळत नसे.
आपण नापास होणार या पराभूत मानसिकतेचा शरीरावरही परिणाम होतच असणार. त्यामुळं जसजसा निकाल जवळ येऊ लागला तसतशी माझ्या अंगाला खाज सुटली. जांघामध्ये तर भयंकर खाज सुटायची. त्यावर सगळे गावठी उपाय सुरू होते. वावडिंगच्या शेंगा कुटून त्या खोबऱ्याच्या तेलात टाकून जांघेत लावल्या की भयंकर आग व्हायची आणि जास्तच फोड यायचे. हे असं व्हायलय म्हणून सांगितलं की उपाय सांगणारे म्हणायचे रोग सगळा निघून चाललाय. नंतर खपल्या धरील आणि बरोबर होईल. रोगापेक्षा हा इलाज जरा भारीच होता. पण डॉक्टरकडं कसं जाणार? कोण नेणार ? डॉक्टरांना या गुप्त जागा कशा दाखवणार ? खरं तर डॉक्टरांनी एखादा मलम दिला असता आणि ती खाज सहज थांबली असती. पण या गावठी इलाजापुढं मी हात टेकले होते. पुढं निकाल लागून तो पचणी पडला आणि ही खाज आपोआप थांबली. आज कळतं तो सगळा मानसिकतेचा परिणाम होता.
याच मानसिकतेतून मला वाघाटं खेळायची सवय लागली. गावातली शाळा उन्हाळ्यात बंदच होती. शाळेच्या व्हरांड्यात शहाबादी फरशी होती. चार बाय चार फुटाच्या त्या एकाच दगडावर आम्ही छान वाघाटं रेखाटायचो आणि प्रतिस्पर्धी मुलासोबत सोळा खड्यांचा खेळ खेळायचो. एका परीनं तो खेळ म्हणजे गावठी बुद्धिबळच होतं. जिंकण्याच्याच इर्शेनं मी तो खेळ खेळायला बसायचो. पुष्कळ वेळा जिंकायचोच. पण कधीतरी हरलो की मला भयंकर खाज सुटायची. जीव हैराण व्हायचा. रात्री झोप यायची नाही. दुसऱ्या दिवशी एखाद्या मुलाला हारवेपर्यंत मला चैनच पडत नसे. एखाद्याला हरवलं आणि मी जिंकलो की त्या दिवशी खाज सुटत नसे. पुढं निकाल लागल्यावर आपोआप हा वाघाट्याचा खेळ मागे पडला आणि मी पार विसरूनही गेलो. मॅट्रिकला पराभूत होण्याच्या भितीनं मला ही जिंकण्याची लत लागली असावी.
माझ्यासोबत काम करू लागायला जे दोन गडी होते ते माझ्याच मागच्या पुढच्या वयाचे होते. त्या दोघांचीही लग्नं झालेली होती. एकाला तर एक मुलही झालेलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या पुष्कळच चावट गप्पा रंगायच्या. आता आयुष्य यांच्यासोबतच जर काढायचय तर त्यांच्याशी एकरूप व्हायलाच हवं, असं वाटून मीही त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी व्हायचो. आपल्या पत्नीसोबतचे रात्रीचे अनुभव ते एकमेकांना चावट भाषेत सांगून खूप मजा घ्यायचे. समकालीन शालेय मित्रही पुष्कळच लैंगिक गोष्टीवर बोलायचे. तेव्हा मी फक्त श्रोत्याची भूमिका घ्यायचो. कधी कधी तर तिथून उठूनही जायचो. पण माझे हे काम करू लागणारे सवंगडी असं काही बोलताना मी आता त्यांच्या बोलण्यातही सहभागी होऊ लागलो.
माझं वय तेव्हा सतरा वर्षाचं होतं. तेव्हा ते वय लग्नासाठी योग्य समजलं जायचं. कसं कुणास ठाऊक पण या उन्हाळ्याच्या सुट्टीत मलाही दोन सोयरीकी येऊन गेल्या. एक सोयरीक मला माझ्या हयातनगरच्या शाळेत शिकवणाऱ्या गुरुजींनीच आणली होती. त्यांची पुतणीच लग्नाची होती. पण मी निग्रहानं नको म्हणालो. मला इतक्या लवकर लग्न नको होतं. वडिलांनी मग त्यांना गावातलाच एक मुलगा दाखवला. त्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी सोयरीकी पाहायला सुरुवात केली होती. खरंतर गावातल्या शाळेत चौथीपर्यंत तो माझ्याच वर्गात होता. पुढं त्यानं शिक्षण सोडून शेतीत राबायला सुरुवात केली होती. आता तो पक्का शेतकरी झाला होता. योगायोगानं गुरुजींच्या पुतणीचं तिथं जुळलं आणि माझ्यासाठी आलेली सोयरीक अशी गावातच मी नाकारली तरी माझ्याच गावात पक्की झाली.
दुसरी एक शहरातली चांगली शिकलेली मुलगी सांगून आली. मी वडिलांना निग्रहानं नाही म्हणून सांगितल्यावर त्यांनी परस्पर नाही म्हणायला सुरुवात केली होती. या शहरातल्या मुलीसाठी वडिलांनी वाड्यातलाच मुलगा दाखवला. तो माझ्या पुढच्याच वर्गातला होता. त्याही मुलीचं तिथं जुळलं. दरम्यान हयातनगरच्या शाळेतली आमची एक वर्गमैत्रीण लग्न होऊन आमच्याच गावात आली होती. याचा अर्थ तेव्हा मुलाचं सतराअठरा आणि मुलीचं तेराचौदा हे वय सर्रास लग्नाचं समजलं जायचं. पटापट लग्नं व्हायची. मुलं संसाराला जुंपली जायची. मुली मिळत नाहीत, लग्न होत नाहीत असा प्रकार तेव्हा नव्हता.
शेवटी एकदाचा निकालाचा दिवस आला. हयातनगरच्या शाळेतली आम्ही काही मुलं निकाल आणायला शाळेत गेलो. त्या शाळेत आमचं ही शेवटचं जाणं होतं. आज आम्हाला आमचे मॅट्रिकचे निकाल मिळणार होते. खूप उत्सुकतेनं आम्ही आमचा निकाल पाहिला. त्यावर्षी त्या शाळेतून मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेलो आम्ही एकूण चौदा विद्यार्थी होतो. आम्ही चौदाजणही नापास झालेले होतो. शाळेचा दहावीचा निकाल शून्य टक्के लागलेला होता. त्यामुळं कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद नव्हता. आम्ही सर्वच समदुखी होतो. त्यामुळं ते दुःख टोकाचं जाणवतलं नाही. कारण अमुक कसा पास झाला ? आणि तू कसा नापास झाला ? असं आम्हाला कोणी विचारणार नव्हतं. तरीही आम्ही सगळेजण चेहरे पाडून शाळेसमोरच्या वडाच्या झाडाखाली बसलो. कारण सगळ्यांचंच पुढचं भवितव्य अंधारात होतं. ते रात्रंदिवस राबण्यातच जाणार होतं. आजूबाजूच्या अनेक गावची मुलं त्या शाळेत येत होती.
त्या सगळ्यांच्या आज शेवटच्याच भेटी होणार होत्या. त्यामुळं सगळेच एकमेकांच्या गळ्याला पडून निरोप घेत होते. सगळ्यांचंच गणित आणि इंग्रजी गेलेलं होतं. सगळेच आता शिक्षण सोडून शेतीत राबणार होते. लगेच लग्नही करणार होते. माझं मात्र केवळ इंग्रजी गेलेलं होतं. इतर विषयांना बऱ्यापैकी गुण होते. हिंदीला तर मी प्रथम श्रेणीत होतो. अवधूतवार सरांनी आम्हाला खूपच चांगलं हिंदी शिकवलं होतं. हिंदीची खूप छान तयारीही करून घेतली होती. बागल सरांनी सहाच महिन्यात आमची गणिताची खूप चांगली तयारी करून घेतली. आमचे गणिताचे आधीचे सर बदलून गेले आणि बागल सर आले म्हणून बरं झालं. पण बागल सरांनी वर्गात येऊन पाहिलं तर आमची काहीच तयारी नव्हती. मग ते जिद्दीला पेटले आणि त्यांनी सहाच महिन्यात आमच्याकडून पक्की तयारी करून घेतली. त्यामुळं माझं गणितही निघालं होतं. बागल आणि अवधूतवार गुरुजींसारखे इतर विषयालाही गुरुजी मिळाले असते तर आमच्यापैकी अनेक जण प्रथम श्रेणीत पास झाले असते. बागल आणि अवधूतवार सरांनी दोघांनीही वडाखाली येऊन आमच्या गुणपत्रिका पाहिल्या. कौतुक केलं. शाळा व्यवस्थापनाला दोष दिला आणि आम्हाला धीर दिला. आम्ही सगळे विद्यार्थी नापास झालो असलो तरी नापास झालेल्या मुलांपैकी सगळ्यात जास्त मार्क मलाच होते. त्यामुळं वासरात लंगडी गाय म्हणतात तसं शाळेतल्या नापास झालेल्या सगळ्यांमध्ये माझा नंबर पहिला होता.
आमच्या सगळ्यांच्या वडिलांनी आम्हाला निकाल पहायला पाठवलं खरं, पण त्यांनाही काळजी वाटली. पोरं नापास झाली तर नीट घरी येतील ना ? या चिंतेनं पाठोपाठ वडील आणि चुलते छकडं जुंपून हयातनगरला आले. ते जवळ आल्यावर आम्ही खाली माना घालून उभे राहिलो. मला तर रडूही फुटलं.
पण वडिलांनी खूपच धीर दिला. म्हणाले, 'एकदा घडून गेलेल्या घटनेचा फार विचार करायचा नसतो. पुढं काय करायचं त्याचा विचार करायचा असतो. एकच विषय गेला ना ? तो पुढच्या वर्षी सहज निघेल. तो काढू आणि पुढं जाऊ' आमच्या गावच्या सगळ्याच मुलांना छकड्यात घालून वडिलांनी गावी आणलं. सगळ्यांना धीर दिला. असा बाप मिळाला म्हणून पुढचं भवितव्य उज्वल घडत गेलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.