Indrajit Bhalerao : स्वाभिमान घडवाया बळ आम्हाला मिळो बळीला

Article by Indrajeet Bhalerao : एकेकाळी शेतकरी हुतात्म्यांसाठी मीच लिहिलेल्या या ओळी आज आठवण्याचं कारण म्हणजे दिग्रस कऱ्हाळे येथील शेतकऱ्यांच्या हुतात्मा स्मारकाला दिलेली भेट.
Indrajit Bhalerao
Indrajit BhaleraoAgrowon

इंद्रजित भालेराव

शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा

सूर्य उगवण्यासाठी

तुम्ही सांडले रक्त जाहली

पवित्र इथली माती

स्मृतीत तुमच्या शेतकऱ्यांचा

स्वाभिमान घडवाया

बळ आम्हाला मिळो बळीला

उंच पदी चढवाया

एकेकाळी शेतकरी हुतात्म्यांसाठी मीच लिहिलेल्या या ओळी आज आठवण्याचं कारण म्हणजे दिग्रस कऱ्हाळे येथील शेतकऱ्यांच्या हुतात्मा स्मारकाला दिलेली भेट. परवा हिंगोलीच्या मॉडेल कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्राचार्यांनी आवर्जून बोलावलेलं होतं. विद्यार्थ्यांसोबत पालकांच्याही सत्काराचं नियोजन त्यांनी केलेलं होतं.

ही अभिनव कल्पना मला फार आवडली. त्यात एक शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही होते. पांडुरंग जाधव हे त्यांचं नाव मला नंतर समजलं. कार्यक्रम संपल्यावर ते आवर्जून मला भेटले आणि म्हणाले, 'दिग्रस कऱ्हाळे या गावातील शेतकरी हुतात्मा स्मारकाला भेट द्यायला येणार का ?' मी म्हटलं, इथून किती दूर आहे ते ? म्हणाले, केवळ दोन किलोमीटर. मग मला जायला काहीच हरकत नव्हती.

Indrajit Bhalerao
Indrajit Bhalerao : महानोरांच नाव कवितेतही आणि मातीतही मोठं होते !

कार्यक्रम संपलेला होता. भूक लागलेली होती. पण ज्यांनी अन्न पिकवणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांच्यासाठी भूक थोडी आवरायला हरकत नव्हती. म्हणून मी प्राचार्य सोळुंके सर, कवीमित्र अण्णा जगताप यांना म्हणालो की, आपण चट्कन तिथं जाऊन शेतकरी हुतात्म्यांना अभिवादन करून येऊयात आणि मग जेवायला जाऊयात. आम्ही सर्व मिळून त्यादिवशी शेतकरी हुतात्म्यांचं स्मारक पाहायला गेलो.

अगदी साध्या सुध्या पद्धतीनं उभं केलेलं हे शेतकऱ्यांचं स्मारक आहे. दोन हुतात्मा शेतकऱ्यांचे पुतळे, एक स्मारक शिला आणि समोर थोडी रिकामी जागा, त्या जागेला तारेचं कुंपण घातलेलं. ग्रामपंचायतीला लागूनच गावातल्या लोकांनी उभं केलेलं हे शेतकरी हुतात्म्यांचं स्मारक ग्रामपंचायतीच्याच ताब्यात आहे. सुरक्षेसाठी गेटला कुलूपही लावलेलं असतं. किल्ली ग्रामपंचायतीत ठेवलेली असते. पांडुरंग जाधव यांनी आधीच निरोप देऊन किल्ली मागवून ठेवलेली होती.

Indrajit Bhalerao
Indrajit Bhalerao : महानोरांच मोठेपण आता वाढतच जाईल !

हे स्मारक उभारण्यासाठी कुठली संस्था किंवा सरकार पुढं आलेलं नव्हतं. गाववाल्यांनीच उत्स्फूर्तपणे आपल्या गावच्या या माणसांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं याचा अभिमान वाटून उभं केलेलं हे स्मारक आहे. इथल्याच कुणातरी कलावंतानं घडवलेले हे पुतळे. मी औरंगाबाद विद्यापीठात शिकायला असताना डिसेंबर १९८६ मध्ये शरद जोशी यांनी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून छेडलेल्या आंदोलनादरम्यान सुरेगावात पोलिसांकडून निर्घृण गोळीबार झालेला होता.

त्यात तीघा जणांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं होतं. त्यातले दोघेजण हे दिग्रस कऱ्हाळे येथील तर एक जण सुरेगाव येथील होता. घटना इथूनच जवळ असलेल्या सुरेगावी घडलेली होती. निवृत्तीराव कऱ्हाळे आणि परसरामजी कऱ्हाळे हे दोघेजण दिग्रसचे होते, तर ज्ञानदेव टोम्पे हे सुरेगावचे होते. टोम्पे यांचा पुतळा सुरेगावच्या लोकांनी त्यांच्या गावात उभा केलेला असल्यामुळे तो इथल्या लोकांनी उभा केलेला नाही.

त्याचवेळी गंगारामजी बाबाराव कऱ्हाळे यांनाही गोळी लागलेली होती. पण त्यांचं निधन तेव्हा झालं नाही. त्यानंतर चौदा वर्षे झिजून त्यांना मरण प्राप्त झालं. त्यांच्या संदर्भातही मी एक कविता लिहिली होती. परवा दिल्लीला झालेल्या साहित्य अकादमीच्या साहित्य उत्सवात हिंदीत अनुवादित करून तीच कविता मी सादर केली तेव्हा भारतातल्या तीन ज्ञानपीठ प्राप्त लेखकांनाही ती कविता आवडली होती. ती कविता अशी

। श्रेय ।

त्या गावात झालेल्या

शेतकरी आंदोलनातल्या हुतात्म्यांसोबतच

त्यालाही लागली होती गोळी

पण तो मेला चौदा वर्षे झुरून

शेवटच्या दिवसात त्याला आणि दवाखान्याला

कंटाळले होते सर्वचजण

त्याला ना जगण्याचं सुख मिळालं

ना मरणाचं श्रेय

गावात उभारलेल्या हुतात्म्यांचे पुतळे पाहताना

गावकऱ्यांचा गहिवर अनावर होतो

मेला असता तेव्हाच तर सन्मानानं

त्याचाही पुतळा उभा केला असता गावानं

त्याच्याही मरणाचं कौतुक झालं असतं

जाणाऱ्या येणाऱ्यांनी अभिवादन केलं असतं

काळाचा नेम असा चुकतो कधी कधी

जित्या जिवाचं खत होऊन जातं

मी इथल्या घटनांवर कविता लिहिल्या पण या गावाला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग याआधी आलेला नव्हता. ती सुवर्णसंधी मी यावेळी साधली आणि मुद्दाम या गावी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com