Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crop : ऊस बेणे मळ्याचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. अशोक कडलग, आर. एन. गायकवाड

प्रत्येक शेतकऱ्याने कारखान्याच्या ऊस रोपवाटिकेमधून बेणे घेऊन लागवड करावी. कारण बेणे मळ्यातील ऊस आणि गळिताच्या उसाचे रासायनिक गुणधर्म वेगळे असतात. त्रिस्तरीय बेणेमळ्यातून बियाणे घेऊन स्वतः बेणे प्लॉट तयार करून ऊस लागवड करावी. याप्रकारे कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात हंगामवार वेगवेगळ्या जातींचा बेणे पुरवठा करण्यासाठी मूलभूत बियाण्यांपासून गटनिहाय पायाभूत बियाणे प्लॉट कारखाना क्षेत्र आणि निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर तयार करून त्यापासून प्रमाणित बेणे प्लॉट गटनिहाय लागण करून त्या बेण्याचा वापर हंगामनिहाय लागवडीसाठी करावा. शेतकऱ्यांनी ३ ते ४ वर्षांतून एकदा बेणे बदल करण्यासाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाने त्रिस्तरीय बेणेमळा योजना राबविली पाहिजे.

उत्तम प्रतीचे ऊस बेणे निर्मिती

१) हंगामनिहाय आणि जातनिहाय ऊस क्षेत्राचा विचार करून आराखडा तयार करावा.
२) ऊस बेणे मळा लागवडीचे गुणन १:१२ किंवा १:१५ असते. उतिसंवर्धन रोपांपासून बेणे मळा तयार केल्यास त्याचे गुणन १:२० ते १:२५ पर्यंत मिळते.
३) बेणे मळा लागवडीसाठी पूर्वमशागत चांगली करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
४) ज्या जमिनीत बेणे मळा लागवड करावयाची आहे अशा जमिनीत अगोदर एक वर्ष लागण ऊस किंवा खोडवा घेतलेला नसावा.
५) बेणे मळा लागवडीपूर्वी एकरी १० टन शेणखत वापरावे.
६) शेणखत गांडूळ खत उपलब्ध न झाल्यास ताग, धैचा किंवा चवळी पिकाची पेरणी करून ४५ दिवसांत गाडून त्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा.
७) बेणे मळ्याची लागवड अशावेळी करावी की लागणीवेळी बेण्याचे वय ८ ते १० महिने असावे.
८) बेणे मळ्यात रोग, किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम, इमिडाक्लोप्रिड ३६ ग्रॅम आणि वसंत ऊर्जा ५०० मिलि प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून टिपरी १५ ते २० मिनिटे बुडवून लागण करावी.
९) बेणे रसरशीत, लांब कांडी, रोग, कीडमुक्त आणि मूलद्रव्य कमतरता विरहित असण्यासाठी शिफारशीत खत मात्रा द्याव्यात.
१०) बेणे मळ्याकरिता संशोधन संस्थेने तयार केलेले बेणे वापरावे.
११) बेणे मळ्याची लागवड ४, ४.५ फूट किंवा २.५ × ५ पट्टा पद्धतीने करावी जेणेकरून निरीक्षण करणे सोपे जाते. तसेच रोग, किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे शक्य होते.

इन्फो

उत्कृष्ट बेण्याची ठळक वैशिष्ट्ये ः
१) बेणे मळ्यातील सर्व उसाचे गुणधर्म संबंधित जाती अनुरूप असावेत.
२) बेणे रसरशीत, सशक्त, लांब कांडी, रोग आणि कीडमुक्त असावे.
३) बेण्यावरील डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली व फुगीर असावेत.
४) डोळे जास्त जून, निस्तेज व काळपट नसावेत.
५) ८ ते १० महिने वयाचा ऊस बेण्यासाठी वापरावा. त्यामध्ये साखर ग्लुकोजच्या स्वरूपात असते. विद्राव्य नायट्रोजनचे प्रमाण ०.३० टक्के असते. त्यामुळे सरासरी उगवण ९० ते ९५ टक्के होते.
६) मुळ्या, पांक्क्षा व तुरा फुटलेले ऊस बेण्यांसाठी वापरू नयेत.
७) ऊस लोळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
८) खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.
९) पायाभूत बेणे तयार करणेसाठी मूलभूत व प्रमाणित बेणेमळा करणेसाठी पायाभूत बेण्याचा वापर करावा.

इन्फो ः
ऊस बेण्याची घ्यावयाची काळजी ः
१) मळ्यातील उसाचे पाचट आधी काढू नये कारण, सूर्यप्रकाशात डोळा उघडा पडून खराब होण्याची शक्यता असते.
२) शेतावर बेणे लावताना हाताने पाचट काढावे, टिपरी करावी. अन्य ठिकाणाहून बेणे वाहतूक करावयाची असल्यास पाचट काढू नये, तुकडे करू नये, वाढे काढू नये.
३) बेणे तीक्ष्ण धारदार कोयत्याने तोडावे. कोयता अधून मधून निर्जंतुक द्रावणात बुडवावा.
४) लांब अंतरावरून बेणे आणल्यास किंवा अन्य कारणाने बेणे शिळे झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून लागवड करावी, जेणेकरून उगवणीवर परिणाम होणार नाही.

बेणे मळा लागण

१) लागणीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर करून दोन टिपरीतील अंतर ६ ते ९ इंच ठेवून २.५ ते ३ सेंमी खोलीवर कोरडी लागण करावी, टिपरी जास्त खोल लावल्यास त्याचा फुटव्यावर परिणाम होतो.
२) लागणीच्या वेळी प्रति हेक्टर ५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे.
३) लागणीनंतर एक महिन्याने प्रती हेक्टर ५० किलो नत्र, दोन महिन्यांनी ४० किलो नत्र व तीन महिन्यांनी ५५ किलो नत्र द्यावे.
४) मोठ्या बांधणीवेळी प्रती हेक्टर ११५ किलो नत्र ५५ किलो स्फुरद व ५५ किलो पालाशची मात्रा द्यावी.
५) मोठ्या बांधणीनंतर एक महिन्यांनी प्रति हेक्टर ५५ किलो नत्र आणि तोडणी पूर्वी एक महिना अगोदर ५५ किलो नत्र द्यावे.
६) शिफारशीप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा.
७) उतिसंवर्धन रोपांना फुटवे जास्त येत असल्याने त्यापासून लागवड केलेल्या बेण्यास शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त खत मात्रा द्यावी.
८) बेणे मळ्याची आंतरमशागत महत्त्वाची असते. तण नियंत्रण, कीड, रोगनियंत्रण, लहान बांधणी, मोठी बांधणी, रोगग्रस्त व कीडग्रस्त बेटे, इतर जातीची बेटे काढावीत. तणांचे नियंत्रण न केल्यास जाडी कमी होऊन उसाची संख्या कमी होते. खोड किडींचा उपद्रव वाढतो त्यासाठी शिफारशीत रासायनिक तणनाशकांचा वापर व गरजेनुसार खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
९) उसाची ५० ते ६० दिवसानंतर लहान बांधणी करावी. फुटव्यांची वाढ एकसमान होऊन बेणेलायक उसाची संख्या जास्त मिळते.
१०) पाण्याचा वापर नियंत्रित करून हंगामानुसार पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी किंवा जास्त करावे.
११) १०० ते ११५ दिवसांनंतर किंवा सर्व फुटव्यांची वाढ एकसमान झाल्याचे विचारात घेऊन मोठी बांधणी करावी.
१२) बेण्याची आनुवंशिक व भौतिक शुद्धता राखण्यासाठी बेणे मळ्याची रोगिंग क्रिया महत्त्वाची असते. बेणे मळ्यात इतर जातींची बेटे आढळल्यास काढून टाकावीत यास रोगिंग म्हणतात. काणी, गवताळ वाढ, रोगग्रस्त व कीडग्रस्त बेटे काढून टाकावीत. त्यासाठी तज्ज्ञाकडून तीन वेळा बेणे मळ्याचे निरीक्षण झाले पाहिजे. पहिले निरीक्षण लागणीनंतर ४५ ते ६०, दुसरे निरीक्षण १२० दिवसांनी व तिसरे निरीक्षण तोडणी अगोदर १५ दिवस करावे.
१३) मूलभूत बेणे मळा निरीक्षणे दोन संशोधन संस्थेच्या सक्षम शास्त्रज्ञांनी केले पाहिजे. पायाभूत बेणे मळा निरीक्षण कारखाना आणि कृषी विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी तसेच प्रमाणित बेणे मळा निरीक्षण दोन कारखान्यांतील ऊस विकास अधिकाऱ्यांनी केले पाहिजे.
१४) पायाभूत व प्रमाणित बेणे मळ्यांमध्ये तिसऱ्या निरीक्षणावेळी तांबडी कुज, काणी, गवताळ वाढ, रोगाचे प्रमाण तसेच खोड कीड, पिठ्या ढेकूण, खवले कीड याचे प्रमाण शून्य टक्के असावे. मर रोगाचे प्रमाण एक शतांशापेक्षा व शेंडा पोखरणाऱ्या अळीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असावे. याप्रमाणे निरीक्षणे व प्रमाणीकरण बेणे गुणवत्तेच्या हमीसाठी आवश्यक आहे.

त्रिस्तरीय बेणे मळा योजना

मूलभूत बेणे ः
- मूलभूत बेणे कृषी विद्यापीठ, ऊस संशोधन संस्थेमध्ये तयार करतात. सदर बेण्यास उष्ण बाष्प हवा प्रक्रिया ५२ अंश सेल्सिअस तापमान, ९५ ते ९९ टक्के सापेक्ष आर्द्रतेस केली जाते. या प्रकारची प्रक्रिया बेण्यापासून प्रसार होणाऱ्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असते.
पायाभूत बियाणे ः
- पायाभूत बेणे लागण कारखाना क्षेत्र आणि गटनिहाय निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर केली जाते.
-बियाणे लागणीसाठी मूलभूत बियाण्याचा वापर करावा. लागणीवेळी सदर बेण्यास शिफारशीप्रमाणे बुरशीनाशक, कीटकनाशकाची प्रक्रिया करावी.
प्रमाणित बियाणे ः
- प्रमाणित बेणे लागणीसाठी पायाभूत बेण्याचा वापर करावा. प्रमाणित बेणे कारखाना कार्यक्षेत्रातील गटनिहाय निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर घ्यावे. पायाभूत प्रमाणे प्रमाणित बेण्यास बेणे प्रक्रिया करावी.

संपर्क ः आर. एन. गायकवाड, ९८८१३२७३५५
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT