Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : रासायनिक उद्योजकाची तंत्रयुक्त काटेकोर ऊसशेती

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी असलेले भारत तावरे रासायनिक क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक आहेत. मोठा व्याप सांभाळून त्यांनी ऊस शेतीतही भरीव यश संपादन केले आहे. तांत्रिक ज्ञानासह सुधारित, उच्च तंत्रज्ञानाचा वापर, शास्त्रीय व्यवस्थापनाद्वारे पाणी, खते, मजुरी व वेळ यांच्यात बचत करीत उसाची एकरी ९० ते १०० टनांपर्यंत उत्पादकता त्यांनी गाठली आहे.

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी असलेले भारत तावरे रासायनिक क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक म्हणून गणले आहेत. मुंबई येथील प्रसिद्ध ‘यूडीसीटी’ संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तावरे यांनी १९९३ मध्ये छोटा रासायनिक प्रकल्प सुरू केला. त्यात उल्लेखनीय प्रगती करीत डोंबिवली (ठाणे), तसेच कुरकुंभ (पुणे) येथे त्यांनी मोठे रासायनिक उद्योग उभे केले.

उद्योगाचा व्याप प्रचंड असल्याने पूर्ण वेळ शेतीकडे लक्ष देता येत नाही. तथापि, शेतीची आवड कायम जपली. शेतीत यश मिळवायचे, प्रगती करायची व उत्पादकता वाढवायची तर उच्च व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर व नियोजन महत्त्वाचे आहे हे तावरे यांनी जाणले. त्यादृष्टीने यांत्रिकीकरण, मजूर व दूरस्थ पद्धतीने देखरेख या पद्धतीने व्यवस्थापन चोख ठेवले. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई (गणपती माळ) (जि. पुणे) येथे पंचवीस वर्षांपूर्वी १६ एकर शेती घेतली. तीन वर्षांपूर्वी कुरुळी येथे २२ एकर शेती विकत घेतली. आजमितीस ३८ एकर शेती असून, बहुतांश सर्व उसाखाली आहे.

सुधारित पद्धतीचे व्यवस्थापन

जमिनीच्या सुपीकेतवर सर्वाधिक भर. दरवर्षी माती परीक्षण केले जाते. अहवालात आढळलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून खत व्यवस्थापन होते.

शेणखत, कोंबडी खत, लेंडीखत, प्रेसमड, कंपोस्ट आदींचा वापर. ताग गाडण्यात येतो. दरवर्षी उसाचे पाचट न जाळता त्याची कुट्टी करून त्यावर जिवाणू कल्चरची प्रक्रिया.

उसानंतर कांदा, ज्वारी, गहू, हरभरा अशी विविध पिके. त्यामुळे चांगला बेवड तयार होतो.

साडेचार बाय दीड फूट व पाच बाय दोन फूट अंतरावर एक डोळा पद्धतीद्वारे लागवड. त्यामुळे हवा खेळती राहून मशागत करणे सोपे.

स्वतःच दर्जेदार बेणे मळा तयार करण्यावर भर. पुढील वर्षी लागवड क्षेत्र निश्‍चित करून बेणे मळ्याचे नियोजन. ८ ते १० महिन्यांच्या उसाचा वापर लागवडीसाठी. दरवर्षी आडसाली लागवड.

तीन वर्षांपासून सुपरकेन नर्सरीचा प्रयोग. त्यासाठी ‘यूपीएल’ कंपनीच्या ऊस विकास विभागाचे व्यवस्थापक अमोल आंधळे यांचे मार्गदर्शन. रोपे तयार करण्यासाठी छोट्या आकाराचे बेड तयार करून त्यावर ओलाव्यासाठी गोण्यांचा वापर होतो. त्यावर मातीची भर लावून उसाचे डोळे लावले जातात. सुमारे २१ दिवसांच्या रोपांची लागवड होते. को ८६०३२ या वाणाचा वापर. यंदाही १६ एकरांवर सुपरकेन नर्सरी.

दोन ट्रॅक्टर्स व त्यावर चालणारी अवजारे. यूपीएल कंपनीकडून फवारणी यंत्रांची सुविधा.

सात वर्षांपासून मक्यातील स्टार्च- सेल्युलोजवर आधारित विघटनशील जैविक घटकाचा वापर. त्यामुळे ठिबकद्वारे पिकाला दिलेले पाणी कैक पटीने धरून ठेवले जाते. पिकाला ते गरजेनुसार सहा महिन्यांपर्यंत उपलब्ध होत राहते. त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याबरोबर त्याची बचतही झाली आहे.

तीन ते चार विहिरी व बोअरवेल. ठिबक आहे. एका जागेतील संपूर्ण २३ एकरांवर स्वयंचलित ठिबक सिंचनाचा (ड्रीप ऑटोमेशन) वापर. अन्य क्षेत्रांत तो वाढविण्यात येणार.

शेतीत वीजभार नियमन ही महत्त्वाची समस्या आहे. पाण्याअभावी उत्पादनात घट होते. त्यावर उपाय म्हणून एका क्षेत्रात सौर ऊर्जेचे सुमारे ६६ पॅनेल्स बसविले आहेत. त्यामुळे पिकाला दिवसा पाणी देण्याचा प्रश्‍नही काही प्रमाणात सुटला आहे.

बदलते हवामान व नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी हवामान केंद्र बसविले आहे. त्याद्वारे आर्द्रता, तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग आदी बाबी कळून येतात.

एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन

पूर्वी उसाचे एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. आता एकरी ८०, ९० ते १०० टनांपर्यंत उत्पादन मिळते. मागील हंगामात आडसाली उसाचे एकरी ११९ टनांपर्यंत उत्पादन घेतले. सुमारे ३८ एकरांतील ३४०० ते ३५०० टन ऊस परिसरातील कारखान्यांना दरवर्षी गाळपासाठी देण्यात येतो. ‘माळेगाव शुगर’ कारखान्याने सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणून निवड केली आहे. तावरे यांनी शेती व्यवस्थापनात कोठे तडजोड न ठेवण्याबरोबरच शेतात डौलदार घरही बांधले आहे. घराजवळच कुंपण करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तावरे सांगतात, की शेतीत आज नैसर्गिक आपत्तींचे संकट वाढले आहे. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न असतो. आजचे काम आजच पूर्ण करण्यावर माझा भर असतो. त्यामुळे व्यवस्थापन करणे सोपे जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT