Fig Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Fig Farming : मुंबई बाजारपेठेत झेंडेंच्या अंजिराची चलती

पुणे जिल्ह्यातील दिवे (ता. पुरंदर) येथील विठ्ठल, बाळासाहेब, संतोष, महेंद्र झेंडे या चार भावांनी २६ गुंठे अंजीर, २० गुंठे पेरू, सव्वा एकरात सीताफळ बाग फुलविली आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून वाटाणा, हरभरा लागवड केली जाते.

Sandeep Navle

पुणे जिल्ह्यातील दिवे (ता. पुरंदर) गावशिवारातील पश्‍चिम आणि उत्तरेकडील परिसर हा डोंगरी पट्टा आहे. या भागातील जमीन बऱ्यापैकी हलक्या प्रकारातील आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबागांकडे वळले आहेत. या गावातील विठ्ठल, बाळासाहेब, संतोष, महेंद्र झेंडे चार भावांचे एकत्रित कुटुंब असून, यांच्याकडे सहा एकर जमीन आहे. पूर्वी ते बाजरी, गहू, ज्वारी लागवड करत होते. परंतु फळबागांचे महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी २६ गुंठे अंजीर (Fig), २० गुंठे पेरू (Guava), सव्वा एकरात सीताफळ (Custard Apple) बाग फुलविली आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून वाटाणा, हरभरा लागवड केली जाते.

माळ जमीन असल्याने जल, मृद्‍संधारणासाठी योग्यरीत्या बांधबंदिस्ती केली. शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी दोन किलोमीटर अंतरावरून शेतापर्यंत पाइपलाइन केली. शेतात पाणी आल्याने सुरुवातीला भाजीपाला, ज्वारी, गहू, कांदा या पिकांची लागवड सुरू झाली. परंतु या पिकांच्या बाजारभावात चढउतार असल्याने फळबागेचा विचार केला. झेंडे यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून अंजीर, पेरू, सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी झेंडे यांनी पुरंदर स्थानिक या अंजीर जातीची लागवड केली. सुरुवातीला ६५ रोपे आणि त्यानंतर ४५ रोपांची लागवड केली. अडीच वर्षांपूर्वी पेरूच्या सरदार जातीच्या १०० कलमांची लागवड केली. त्यांच्याकडे सीताफळाची जुनी बाग आहे. त्याचबरोबरीने दीड वर्षापूर्वी सीताफळाच्या फुले पुरंदर या जातीच्या १०० रोपांची लागवड केली आहे. सीताफळाची एकूण पावणे तीनशे झाडे त्यांच्या बागेत आहेत.

अंजीर बागेचे व्यवस्थापन

बाजारपेठेत योग्य कालावधीत फळे जाण्यासाठी तसेच तोडणी नियोजन सोपे होण्यासाठी ६५ झाडांचा खट्टा बहर आणि ४५ झाडांचा मीठा बहर धरला जातो. खट्टा बहरासाठी झाडांना शिफारशीत खतमात्रा देऊन पाच जूनला पाणी सोडले जाते. त्यानंतर पिकाच्या गरजेनुसार पाट पाणी दिले जाते. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिली जातात. कीड, रोगनियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. साधारण साडेचार महिन्यांनंतर फळतोडणीस सुरुवात होते. हा कालावधी १५ ऑक्टोबर ते ३० जानेवारीपर्यंत असतो. सध्या फळाची काढणी अंतिम टप्यांत आहे. प्रति झाडापासून ऐंशी ते शंभर किलो उत्पादन मिळते.

मीठा बहरासाठी झाडांना खतमात्रा देऊन १ जुलै रोजी पाणी सोडले जाते. पुढे खट्टा बहरासारखेच पीक व्यवस्थापन ठेवले जाते. या फळांची तोडणी २० नोव्हेंबर ते १ मार्चपर्यंत होते.

बागेस रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखत आणि लेंडी खताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली

आहे. झाडे सशक्त झाल्याने फळांना चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळतो. पिकाच्या गरजेनुसार सेंद्रिय खत, जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर केला जातो.

जानेवारीनंतर शेततळ्यातील पाणी संपत असल्याने तसेच बाजारपेठेत इतरांपेक्षा लवकर फळे जाण्यासाठी पाच जूनमध्ये खट्टा बहर धरला जातो. योग्य वेळी कीड, रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केल्याने फारसा प्रादुर्भाव होत नाही. फळांची गुणवत्ता चांगली राहते. मजुरांमार्फत आधुनिक फवारणी यंत्रांचा वापर केला जातो.

झाडांच्या आळ्यात पाचट आच्छादन केल्याने पाणी बचत होते. ओलावा टिकून राहतो. दर आठ दिवसांच्या अंतराने फळबागेस पाणी दिले जाते.

फळबागेतून अपेक्षित नफा

अंजिराची विक्री मुंबई बाजारपेठेत होते. सीताफळांची विक्री सासवड बाजारपेठेत केली जाते. पेरू खरेदीसाठी व्यापारी बागेतच येतात. अंजीर, पेरू, सीताफळापासून झेंडे यांना खर्च वजा करता एका एकरातून दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत नफा भेटतो. एक एकरासाठी एक लाखांच्या आसपास खर्च होतो. गेले दोन वर्षे लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात आर्थिक फटका बसला. तरीही न डगमगता झेंडे फळबागेतून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत. बागेमध्येच फळांची प्रतवारी, पॅकिंगसाठी लहानसे पॅकहाउस उभारले आहे. झेंडे यांनी बागेमध्ये सहा लोकांना रोजगार दिला आहे. विविध ठिकाणचे शेतकरी झेंडे यांची अंजीर बाग पाहावयास येतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.

गेल्या काही वर्षांपासून दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे) शिवारातील शेतकरी सीताफळ, अंजीर, पेरू लागवडीकडे वळले आहेत. यापैकीच एक आहेत संतोष गेनबा झेंडे हे प्रयोगशील शेतकरी. सुधारित तंत्र आणि योग्य व्यवस्थापनातून त्यांनी हलक्या जमिनीत सीताफळ, अंजीर आणि पेरूची फळबाग चांगल्या प्रकारे जोपासली आहे. अंजीर फळांच्या विक्रीसाठी त्यांनी ‘सत्यम गार्डन' हा ब्रॅण्ड तयार केला आहे. मुंबई मार्केटमध्ये त्यांच्या अंजीर फळांना वाढती मागणी आहे.

शाश्‍वत पाण्यासाठी शेततळे : झेंडे यांची डोंगराकडेला फळबाग असल्याने पाण्याचा शाश्‍वत स्रोत नाही. त्यामुळे पाइपलाइन करून पाणी आणले आहे. याचबरोबरीने शेतात दोन विहिरी आहेत. फळबागेसाठी शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी १०० फूट बाय १०० फूट बाय २६ फूट आकाराचे शेततळे केले आहे. यामध्ये अडीच लाख लिटर पाणी साठते. यामुळे गरजेनुसार फळबागेला पाणी देता येते.

प्रतवारी, योग्य पॅकिंगवर भर

अंजीर फळाच्या आकारानुसार एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर अशी प्रतवारी केली जाते. एक नंबरमध्ये बारा नगाच्या चार पेट्या एकत्र बांधल्या जातात. त्यास जोटा म्हणतात. एका पेटीत १२ अंजीर फळे असतात. या पेट्या मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जातात.

मुंबई मार्केटमध्ये एक नंबरच्या एका जोट्याला ३०० ते ३५० रुपये दर मिळतो. दोन नंबरच्या एका जोट्यास २०० ते २५० रुपये आणि तीन नंबरच्या एका जोट्यास १०० ते १५० रुपये दर मिळतो. झेंडे यांच्या फळांना ‘पुरंदर अंजीर’ या नावाने मुंबई- वाशी मार्केटमध्ये ओळखले जाते. त्यांनी स्वतःचा ‘सत्यम गार्डन’ ब्रॅण्ड तयार केला आहे.

संतोष झेंडे ९९७०५७०५१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT