Water Conservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : वसुंधरेवर प्रेम करणारे गाव वाघोली

सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या वाघोलीकरांनी (जि. नगर) श्रमदानातून नदीवर जलसंधारणाची कामे केली. पाणी उपलब्धता झाली. पीक पद्धतीत बदल झाला, दुग्ध व्यवसाय वाढीस लागला.

Team Agrowon

Wagholi Village Story : सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या वाघोलीकरांनी (जि. नगर) श्रमदानातून नदीवर जलसंधारणाची (WaterConservation) कामे केली. पाणी उपलब्धता झाली.

पीक पद्धतीत बदल झाला, दुग्ध व्यवसाय (Milk Business) वाढीस लागला. दोन वेळा शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ पुरस्कारांवर गावाने मोहर उमटवली. गावचा हा कायापालट आदर्श निर्माण करणारा आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या उत्तरेकडील काही गावांना जायकवाडी धरणाच्या (Jaykawadi Dam) फुगवट्याचा लाभ मिळतो. ते वगळता बहुतांश भागात शाश्‍वत पाणी नाही. त्यामुळे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या गावांपैकी वाघोली हे चार हजार लोकसंख्येचे गाव. पश्‍चिमेकडून ढोरा तर पूर्वेकडून वृद्धा नदी जाते.

सर्वांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे केल्याशिवाय गावचा पाणीप्रश्‍न सुटणार नाही हे ग्रामस्थांनी जाणले. सहा वर्षांपूर्वी गावकरी, माजी सरपंच बाबासाहेब गाडगे, उमेश भालसिंग यांनी पुढाकार घेत जलसंधारणासह ग्रामविकासाची कामे सुरू केली.

नदीपात्रांचे खोली- रुंदीकरण

ढोरा नदीवर वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यात गाळ साचला होता. साडेसतरा लाखांची लोकवर्गणी आणि भारत फोर्ज कंपनीचा ६० लाखांच्या निधी यातून बंधाऱ्यातील संपूर्ण गाळ काढण्यात
आला. सुमारे सव्वा किलोमीटर लांबीचे खोलीकरण केले. ७० ते ७५ मीटर मूळ व्याप्ती असलेले नदीपात्र तीस मीटरवर आले होते. नदीकाठच्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करून नदीपात्र रुंद केले. त्यातून २२ हजार कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढली.

पूर्वी दोनशे फुटांवरही विंधन विहिरीला पाणी लगत नव्हते. आता चाळीस फुटांवर पाणी लागतेय. वाघोलीसह शेजारच्या आडगाव, निंबेनांदूर या गावांना पाणी उपलब्ध झाले.

दहा लाखांचा लोकसहभाग, ५० लाखांचा कंपनीची मदत यातून वृद्धा नदीचेही यंदा एक किलोमीटरहून अधिक अंतरावर खोलीकरण केले. बंधाऱ्याची भिंत दोन फुटांनी वाढवली असून,
पाणीसाठवण क्षमता वाढली आहे. त्याचा पूर्व भागातील गावांनाही फायदा होणार आहे.

पीक पद्धतीत बदल

उन्हाळ्यात पूर्वी अपवादाने हिरवे शेत दिसायचे. पाच वर्षांपासून भर उन्हाळ्यात शिवार हिरवेगार असते. पूर्वी खरीप व रब्बीची पिके शिवारात असायची. आता पेरणीलायक १३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४०० हेक्टर ऊस, ४०० हेक्टर कांदा, १०० हेक्टर फळबागा, कापूस २०० हेक्टर, १०० हेक्टरवर अन्य पिके आहेत.

यंदा ४०० हेक्टरच्या जवळपास उन्हाळी, तर शंभर हेक्टरपर्यंत चारा लागवड झाली. गावात सुमारे साडेचारशे कुटुंबे आहेत.

आठ वर्षांपूर्वी गावात दररोज बाराशे लिटरपर्यंत दूध संकलन व्हायचे. शेतकऱ्यांना पाणी-चारा टंचाईला सामोरे जावे लागे. आता पशुधनाची संख्या वाढली.
दररोज पाच हजार लिटरहून अधिक दूध संकलन होत आहे.

उपक्रमशील गाव

पाणी उपलब्धततेनंतर काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. मात्र कोरोना संसर्ग सुरू झाल्याने भाजीपाला विकता आला नाही. मग पोलिस, माध्यम प्रतिनिधी, बँक कर्मचारी यांना सुमारे सतरा टन भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. गरजू कुटुंबांना किराणा साहित्य, भाजीपाला दिला.

सध्या सुस्मिता उमेश भालसिंग या लोकनियुक्त सरपंच असून, सुखदेव शेळके उपसरपंच आहेत. राजेंद्र जमधडे, नलाबाई अल्हाट, निर्मला दातीर, कांताबाई बोरुडे, हिराबाई शिंगटे, कल्पना भालसिंग, मोहन गवळी, घनशाम वांढेकर हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. जे. एम. फटाले या ग्रामसेविका आहेत.

दोन मारुतींचे एकमेव मंदिर (चौकट)

वाघोलीत एकाच मंदिरात दोन मारुती असलेले मंदिर आहे. भारतातील असे हे एकमेव मंदिर असावे असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. सर्व भागांतून भाविक येथे येतात. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, वृद्धेश्‍वर, भागात पांडवांचे वास्तव्य होते. त्यांनीच मंदिराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते.

पांडवकालीन या मंदिरात ११ व्या शतकातील शिलालेख आढळतो. गावांतील वाघेश्‍वरी देवीचे मंदिरही १२ व्या शतकातील असल्याचा शिलालेख आहे. या दोन्ही मंदिरांसह यादवबाबा मंदिराचा लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आहे.

वर्षाला मोठी आर्थिक बचत

गावात सुमारे दीडशे कुटुंबांनी बायोगॅस निर्मिती युनिट उभारले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून त्यास अनुदान मिळाले आहे. त्यामुळे एवढ्या कुटुंबांकडील इंधनावरील होणाऱ्या वर्षभरातील खर्चात काही लाख रुपयांची बचत होत आहे. युनिटमधील स्लरीचा वापर शेतासाठी होत
आहे.

माझी वसुंधरा- सन्मान

-महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा योजनेत अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी व जल या पंचमहाभुतांच्या आधारावर कार्य करणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात येतो. वाघोलीने त्यात राज्यात दोन वेळा पहिला क्रमांक मिळवला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रत्येकी दीड कोटी रुपयांच्या पारितोषिकाने हा सन्मान झाला.


-२०१४ मध्ये कै. मेजर वसंतराव भालसिंग यांच्या पुढाकाराने तंटामुक्त अभियान पुरस्कार.
-प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्याकडून अनेक गावांमधून याच गावची निवड होऊन विकासकामांसाठी मदतनिधी.

लक्षवेधी उपक्रम

-ग्रामस्थांकडून शाळा, रस्ते, स्मशानभूमी आदी भागांत ५० हून अधिक प्रकारच्या सुमारे तीन हजार झाडांची लागवड. सर्व ठिकाणी ठिबक. पूर्वजांच्या आठवणी जपत झाडे जगवण्याचा प्रयत्न.


-ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी अंधमुक्त गाव संकल्पना. साठ नागरिकांची पुण्यातील बुधराणी हॉस्पिटलच्या मदतीने मोफत नेत्र शस्त्रक्रिया.
-वेळोवेळी रक्तदान शिबिर. उमेश भालसिंग यांच्याकडून तब्बल २९ वेळा रक्तदान.
-स्मशानभूमीचे लोकवर्गणी व श्रमदानातून सुशोभीकरण.


-शंभर टक्के वैयक्तिक शौचालयांचा वापर.
-सिमेंट कॉँक्रीट व पेव्हिंग ब्लॉक्सद्वारे पाच पक्के रस्ते. ग्रामपंचायतीच्या देखण्या इमारतीचे
बांधकाम.
-जमिनीखालून नाले. जागोजागी शोषखड्डे.
-सुमारे पंधरा महिला बचत गट कार्यरत.


-‘आरओ’ यंत्राद्वारे पाच रुपयांना वीस लिटर शुद्ध पिण्याचे पाणी.
-नदी खोलीकरणातील मुरमाचा वापर करत वस्त्या व शेतांना जोडणारे आठ पाणंद रस्ते खुले व रुंद केले.
-जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी शुद्ध पाणी. पाच वर्गांना पाच संगणक भेट.

संपर्क ः सुस्मिता उमेश भालसिंग (सरपंच), ९९२१९९९९००
राजेंद्र जमधडे - (ग्रामपंचायत सदस्य), ९४२१५५५९००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT