Paddy Farming : भाताच्या विविध वाणांची लागवड करणारे गाव

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरुक्टे (ता. भुदरगड) हे अरण्याच्या कुशीत वसलेले गाव भाताच्या विविध वाणांची लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय ‘बायोगॅस’ निर्मिती, ग्राम स्वच्छता व विकास, उपलब्ध नैसर्गिक साधनांची जपणूक आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याकडे गावाने विशेष भर दिला आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

को ल्हापूर जिल्ह्यातील किल्ले भुदरगडच्या पूर्वेस तीन किलोमीटरवर मुरुक्टे (ता. भुदरगड) हे छोटेखानी म्हणजे सुमारे ७६९ लोकसंख्या आणि १२५ कुटुंबसंख्या असलेले गाव आहे. कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) असतो. याच पट्ट्यात मुरुक्टे गाव असून, सुमारे ४०० एकर शेतजमीन आहे. भातपीक (Paddy Crop) हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून नाचणीही (Ragi) असते. प्रत्येक शेतकऱ्याकडे वीस गुंठ्यांपासून चार एकरांपर्यंत शेती आहे. पंधरा ते २० प्रकारच्या भाताच्या पारंपरिक वाणांची इथे लागवड (Paddy Verity) होते. सुधारित वाणही असतातच. आंबेमोहोर, घनसाळ, काळा जिरगा, हावळा आदींसह विविध सुगंधी वाणांची लागवड गावात पाहण्यास मिळते.

भातशेतीचे नियोजन

खरीप हंगामात मुरुक्टे गाव भातशेतीत व्यस्त असते. ऑक्टोबरच्या सुमारास काढणी सुरू झाली, की नोव्हेंबरनंतर व्यापारी व राइस मिल व्यावसायिकांना विक्री सुरू होते. सुगीच्या काळात एक महिना गावात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची सतत रेलचेल पाहण्यास मिळते. मळणी होईल तसा गावातून दररोज एक टेम्पो भात बाहेरील बाजारपेठेत जातो. दुर्मीळ वाण असल्याने अन्य वाणांपेक्षा दरही चांगले मिळतात.

Paddy Farming
Biogas Plant : ‘स्मार्ट मीटर’ दाखवणार बायोगॅस संयंत्राची कार्यक्षमता

सुमारे सव्वाशे घरांच्या या छोट्या गावातील शेतकऱ्यांचे भात हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. अरण्याच्या कुशीत गाव असल्याने शुद्ध हवेबरोबरच मातीची प्रतही चांगली राहते. परिणामी, भाताला चवही चांगली येते. गावाला पश्‍चिम देवस्थान समितीची जमीन आहे. तेथेही उत्पादन घेऊन समितीला काही भाग खंड म्हणून देण्यात येतो. त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीचाच आधार आहे.

Paddy Farming
Biogas Plant : राज्यात उभारणार पाच हजार बायोगॅस संयंत्रे

‘बायोगॅस’साठी अग्रेसर

गाव वसले त्या वेळी पूर्वजांनी सुटसुटीतपणे गावाची रचना केली. अनेक गावांमध्ये एकेरी रस्त्यामुळे दोन वाहनेही जात नाहीत अशी परिस्थिती असते. पण या गावात दोन वाहने सहजपणे एकमेकांना ओलांडून जाऊ शकतील अशी रचना आहे. घरे सुटसुटीत आहेत. या पार्श्‍वभूमीचा उपयोग गावात जैवइंधन (बायोगॅस युनिट) यंत्रणा उभारणीसाठी झाला.

Paddy Farming
Paddy Procurement : सात-बारावर नोंदीअभावी भात विक्रीत अडचणी

सन १९९० पासून शासन अनुदानावरील ‘बायोगॅस’ युनिट गावातील ५० टक्के कुटुंबांकडे दिसतात. त्यातून स्वयंपाकासाठीच्या इंधनऊर्जेत बचत झाली आहे. घरटी दोन ते चार जनावरे असल्याने हे शक्य झाले आहे. सुमारे ३२ वर्षांपासून सातत्याने ‘बायोगॅस’ वापरणारे जिल्ह्यातील अग्रेसर गाव म्हणून मुरुक्टेचे नाव आहे. तयार होणाऱ्या स्लरीचा शेतीसाठी वापर होतो.

Paddy Farming
Paddy MSP : शेतकऱ्यांचा भात हमीभावाने घेण्याची मागणी

गावाचा लौकिक

गावात अनेक कडक निर्बंध आहेत. दारूचे एकही दुकान नाही. शंभर टक्के शौचालय वापर आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतात. या वेळी केवळ एका जागेसाठी मतदान झाले. गावाला संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले निर्मल गाव. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट दिली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन योजना राबवण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर गाव म्हणून गावाचा सन्मान झाला आहे.

कोरोनामुक्त गाव

दोन वर्षांपूर्वी कोरोनाची सर्वत्र गंभीर समस्या उद्‍भवली असताना गावात एकही मृत्यू अथवा संसर्ग झालेली व्यक्ती आढळली नाही. अरण्याच्या कुशीत असलेल्या गावाला शुद्ध ऑक्सिजनचा मोठा पुरवठा होतो. शिवाय स्वच्छ पाण्याची सोय आहे. मागील वर्षापर्यंत गावाला जंगलाच्या झऱ्याचे पाणी सायफन पद्धतीने यायचे. आता टाकीत संकलन करून ते पुरवण्यात येते. गेल्या वर्षी गावापासून जवळच बारवे दिंडेवाडी लघू प्रकल्प तयार झाला. त्यामुळे पाण्याची कोणतीही समस्या उरलेली नाही.

गावाशेजारी अरण्य असले तरी जंगलतोड होत नाही. नैसर्गिक घटकांना बाधा आणली जात नाही. परिणामी, गावचे वातावरण नैसर्गिक, आल्हाददायक आहे
रंजना कांबळे, सरपंच ७६६६४२७६४३
गावाजवळ बारवे -दिंडेवाडी धरण पूर्ण झाले आहे. गावशिवारात आता सिंचन सुविधा होतील. जुन्या चांगल्या प्रथा येथे जपल्या जातात. पुढील काळातही नवीन विकास योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
दयानंद ऱ्हाटवळ, उपसरपंच ९४२०९ ३४०२७
जुन्या पिढीने गाव वसवताना त्याची रचना पद्धतशीर केली आहे. आज गावच्या जागेत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतो. त्यामुळे रस्ते प्रशस्त वाटतात. गावची परंपरा पुढेही जपणार आहोत.
अरुण बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य ८३०८३ ३५१५१
गावातील नवी पिढी व्यसनापासून दूर आहे. नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी या संकल्पना अमलात आणल्या जातात. गावात बारा महिला स्वयंसाह्यता समूह आहेत. महिलांना लघुउद्योगासाठी स्वयंसाह्यता समूहाकडून आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो.
सौ. गीता खोचारे, गटप्रेरिका उमेद अभियान ९४२२३३६४८३
गावात जैवइंधनाचा वापर करणारी कुटुंबे पन्नास टक्के आहेत. वृक्षारोपणासारखे प्रयत्नही सुरू आहेत.
जयराम पाटील, माजी सरपंच मुरुक्टे
गावातील भात उत्तम प्रतीचा असल्याने मागणी चांगली आहे. ग्राहकांना ज्या विशिष्ट वाणाचा भात हवा आहे तो मिळवून देण्याचा प्रयत्न असतो.
प्रमोद पाटील, प्रगतिशील शेतकरी व सुगंधी भातविक्रेते, ९५९५८ ८७२७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com