Fruit Crop Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Cultivation : फळबागेसह बहुविध पीक पद्धतीमुळे शेतीतील जोखीम कमी झाली

माणिक रासवे

माणिक रासवे

Fruit Crop : परभणी जिल्ह्यातील देवनांद्रा येथील संयुक्त थोरे कुटुंबाने फळबाग केंद्रित बहुविध पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीतील जोखीम कमी करण्याबरोबर आर्थिक बाजू भक्कम केली आहे. सिंचनाची शाश्‍वती, शेडनेट तंत्रज्ञान, सौर पंप आदी सुविधा व चोख व्यवस्थापनातून शेतीची उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश आले आहे.

परभणी जिल्ह्यात देवनांद्रा (ता. पाथरी) येथील विश्‍वनाथ मनोहरराव थोरे यांची संयुक्त कुटुंब पद्धतीची शेती व जीवनव्यवस्था आहे. त्यांचे शिक्षण बी.एस्सी. (गणित)पर्यंत झाले आहे. त्यांना धनंजय व संजय हे जुळे तर धाकटे विजय अशी तीन मुले आहेत. धनंजय ‘बी.ई. मेकॅनिकल’ असून, परिवहन निरीक्षक आहेत. विजय एम.एस्सी. (कृषी विस्तार) असून, पाथरी येथील कृषी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत. संजय पूर्णवेळ शेतीत आहेत.

बहुविध शेतीचे व्यवस्थापन

थोरे यांची विविध ठिकाणी मिळून ८५ एकर शेती आहे. त्यातील २० एकर बटईने देत जोखीम कमी केली आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात देवनांद्रा येथील ५५ एकर क्षेत्र आहे. हवामान, दर व अन्य बाबींच्या अनुषंगाने एका पिकातील जोखीम वा नुकसान दुसऱ्या पिकातून भरून काढण्यासाठी फळबाग केंद्रित बहुविध पीक पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यातील काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे.

- दहा वर्षांहून अधिक काळापासून उती संवर्धित रोपांची लागवड होते. खुल्या जागेसह शेडनेटमध्येही हे पीक आहे. त्याची पार्श्‍वभूमी म्हणजे एक एकराची दोन शेडनेट्‍स यापूर्वी उभारली. त्यातील एकात २०२० मध्ये खरबूज घेतले. मात्र लॉकडाउनमुळे विक्री व्यवस्था कोलमडली. मग परभणी, जालना आदी भागांत किलोला ५० ते त्यापुढील दराने विक्री केली. सन २०२२ मध्ये टोमॅटोचेही चांगले उत्पादन झाले. पण शेतीचा पसारा मोठा असल्याने शेडनेटमधील पिके, व्यवस्थापन व एवढे करून मिळणारा दर यांचा ताळमेळ बसेना. अखेर मागील दोन वर्षांपासून बाकी पिके बंद करून शेडनेटमध्ये केवळ केळी घेतली जात आहे. दीर्घ मुदतीचे पीक असल्याने त्याकडे लक्ष देणे सोपे होते. शिवाय वादळी, उष्ण वारे, किडी यांच्यापासून केळीचे संरक्षण होते. पाने फाटत नाहीत. उंच झाडे पडत नाहीत. घडांचे वजन सरासरी २५ ते २८ किलोपर्यत मिळते. दर्जा चांगला असल्याने बाजारभाव अधिक मिळतात.

सीताफळ उत्पादन....

परभणी येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विजय यांना राज्य सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांच्याकडून सीताफळ लागवडीबाबत मार्गदर्शन मिळाले. त्यातून २०१३-१४ मध्ये बालानगर सीताफळाची हलक्या जमिनीवर सव्वा एकरांत १४ बाय ७ फूट अंतरावर लागवड केली. नव्या बागेत आंतरपीक म्हणून शेवग्याचे दोन ते तीन वाण घेतले. सन २०१७ -१८ मध्ये पुन्हा दोन एकरांत १५ बाय ८ फुटांवर सीताफळाची नवी लागवड केली. या बागेत पपईचे आंतरपीक घेत मुख्य पिकाचा खर्च कमी केला. विजय सीताफळ महासंघाचे सदस्यही झाले आहेत.


पेरू व पपई

सन २०१९-२० मध्ये सरदार (एल ४९) जातीच्या पेरूची अडीच एकर लागवड केली आहे. सीताफळ व पेरू या बागा हुंडी पद्धतीने व्यापाऱ्यांना दिल्या जातात. त्यातून एकूण तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळते. सन २०१४-१५ पासून पपई घेण्यात येते. एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. दोन वर्षांपासून आइस बेरी जातीची लागवड होत आहे. व्यवस्थापन, हवामान व दर या बाबी अनुकूल राहिल्या, तर पपईपासून किमान एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकते असा थोरे यांचा अनुभव आहे.

कांदा बीजोत्पादन व अन्य प्रयोग

-विविध फळबागांच्या जोडीला रब्बी हंगामात दरवर्षी दीड ते दोन एकरांत कांदा बीजोत्पादन कार्यक्रमात सातत्य.
-एकरी ४ ते ४.५ क्विंटलपर्यंत उत्पादन.
-बियाणे कंपनीसोबत करार. प्रति किलो ५०० रुपये दराने विक्री.
-उत्पन्नाचे आणखी स्रोत जोडताना १५ ते २० एकरांत ऊस. त्याचे एकरी ५० ते ५५ टन उत्पादन.
-पारंपरिक पिके आहेतच.
-मदतीला सहा गडी, गावरान ४० ते ५० गायी, तीन बैलजोड्या, ट्रॅक्टर आदी सुविधा. दरवर्षी घरचे २० ट्रॉली शेणखत उपलब्ध.

सिंचन शाश्‍वती व वीजपुरवठा

थोरे यांचे क्षेत्र पाथरी ते सेलू रस्त्यावर तसेच जायकवाडी डाव्या कालव्याजवळ आहे. दोन शेततळी असून, एकूण साठवण क्षमता अडीच कोटी लिटर आहे. कालव्यावरून पंपाव्दारे उपसा करून शेततळ्यात पाणी भरून घेण्यात येते. तीन विहिरी आहेत. झरी येथील तलावाजवळील विहिरीतून तीन किलोमीटर पाइपलाइन केली आहे. बोअर्स आहेत. विविध ठिकाणी सात सौरपंप बसविले आहेत. संरक्षित पाणीसाठा व अखंडित वीजपुरवठा यामुळे शेतीतील महत्त्वाची चिंता मिटली आहे. विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेती विकसित केली आहे.

कामांचे नियोजन

विश्‍वनाथ थोरे यांचे १४ सदस्यांचे कुटुंब आहे. एकमेकांच्या विचार विनिमयातून शेतीचे नियोजन
होते. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या क्षेत्रांची जबाबदारी प्रत्येकाकडे दिली आहे. संजय यांच्या पत्नी संध्या बीएस्सी हॉर्टिकल्चर असून, त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो.

संजय थोरे, ९४२२११२८३५
विजय थोरे, ९४०३६४५०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT