Mango Orchard Management :
शेतकरी नियोजन
शेतकरी सुशील रामपाल बलदवा
गाव : घारी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
एकूण शेती : ३७ हेक्टर
केसर आंबा बाग : २० एकर
शील रामपाल बलदवा यांची पैठण तालुक्यातील घारी शिवारात ३७ हेक्टर शेती आहे. त्यांनी साधारणतः १९९० ते २००८ दरम्यान ही संपूर्ण शेती घेतली आहे. अत्यंत नियोजनपूर्वक शेती करत मोसंबी, जांभूळ, केसर आंबा या प्रमुख फळपिकांवर लक्ष केंद्रित करत फळबाग लागवड यशस्वी केली आहे.
सध्या आंबा रोपवाटिका दीड एकर, मोसंबी ५ हेक्टर, जांभूळ २ हेक्टर, केसर आंबा ८ हेक्टर याप्रमाणे फळबाग केंद्रीत शेती ते करत आहेत. आतापर्यंत जवळपास आठ वेळा निर्यातक्षम केसर आंबा उत्पादन त्यांनी घेतले आहे. उत्पादित आंब्याची जपान, इंग्लंड, चीन व गल्फमध्ये निर्यात केली आहे. महाकेसर आंबा बागायतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून सुशील बलदवा कार्यरत आहेत.
आंबा लागवड
सुशीलराव यांची जवळपास २० एकर क्षेत्रावर आंबा बाग आहे. सुरुवातीला घन व त्यानंतर अतिघन अशा दोन पद्धतीने आंबा लागवड त्यांनी केली आहे. १९९३ मध्ये सर्वप्रथम केसर आंब्याची ८ एकरांत २० बाय २० फूट अंतरावर घन पद्धतीने लागवड केली. त्यानंतर २०१३ मध्ये १२ एकरांत १२ बाय ६ फूट अंतरावर अतिघन पद्धतीने लागवड केली. अशी सध्या त्यांच्याकडे एकूण २० एकरांत केसर आंबा बाग आहे.
सिंचन सुविधा
शाश्वत उत्पादनासाठी सिंचन व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचे श्री. बलदवा यांनी ओळखून सिंचनाच्या शाश्वत सुविधा निर्माण केल्या. त्यासाठी दहा विहिरी खोदल्या असून, बोअरवेल व जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून सिंचनासाठी पाइपलाइन करून शाश्वत सिंचन सुविधा तयार केल्या आहेत.
खत, पाणी व्यवस्थापन
जून, जुलै महिन्यांत शेणखत व रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा रासायनिक खते आणि सिंचनाद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. पावसाळा संपल्यानंतर ८० टक्के मोहर बाहेर येईपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर शेवटपर्यंत आणि ७५ टक्के मोहर बाहेर पडल्यावर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. फळे वाटाणा आकाराची झाल्यानंतर मोकळे पाणी दिले जाते. फळांचा आकार वाढेल तसे पाण्याचे प्रमाणही वाढविले जाते. सध्या ठिबकद्वारे प्रतिदिन ४ तास सिंचन करत आहे.
कीड, रोग नियंत्रण
श्री. बलदवा यांच्या अनुभवानुसार आतापर्यंत बागेत प्रामुख्याने तुडतुडे किडीचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. कीड-रोग नियंत्रणासाठी आंबा व फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक कीडनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर केला जातो.
उत्पादन
घन पद्धतीने लागवड केलेल्या बागेतून १९९६-९७ पासून, तर अतिघन लागवडीमधून २०१६ पासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. घन लागवड केलेल्या आंबा बागेतून प्रति झाड ७० किलो, तर एकरी साधारण ७ टन उत्पादन मिळते. तर अतिघन आंबा लागवडीतून प्रति झाड १५ किलो तर एकरी साधारणतः १० टन आंबा उत्पादन त्यांना मिळते.
आगामी नियोजन
सध्या बागेतील झाडांवर कोय धरण्याच्या अवस्थेतील फळे लगडलेली आहेत. सध्या फळांचा दर्जा टिकवण्यावर भर देण्यात येत आहे. कीड,रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार फवारणीचे नियोजन केले आहे.
बागेमध्ये आच्छादन आणि पाणी व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे पाणी बचत तसेच फळांची गुणवत्ता टिकून रहाण्यास मदत होत आहे.
पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणार आहे.
पुढील पंधरवड्यात झाडांवरील फळांची विरळणी करून एक मोकळे पाणी देण्याचे नियोजन आहे.
सुशील बलदवा, ९४२३१५०३७१ (शब्दांकन : संतोष मुंढे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.