Mulberry Management Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Management : तुती बागेचे कीटक संगोपनातील काटेकोर व्यवस्थापन

Mulberry Farming : परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील राधेश्याम खुडे यांनी अभियांत्रिकीतून शिक्षण पूर्ण केले. गावातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेत तेही रेशीम शेतीकडे वळले.

Team Agrowon

शेतकरी नियोजन

रेशीम शेती

शेतकरी नाव : राधेश्याम खुडे

गाव : बोरगव्हाण, ता.पाथरी, जि. परभणी

एकूण क्षेत्र : २.५ एकर

तुती लागवड : १.५ एकर

परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील राधेश्याम खुडे यांनी अभियांत्रिकीतून शिक्षण पूर्ण केले. काही काळ पुणे येथे खासगी नोकरी केल्यानंतर गावी येऊन स्वतःची अडीच एकर शेती करू लागले. पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन आणि उत्पन्नाची फारसी शाश्‍वती वाटत नसल्याने पूरक उद्योगाची चाचपणी सुरू केली.

गावातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेत तेही रेशीम शेतीकडे वळले. अभ्यासू वृत्तीमुळे गेल्या दहा वर्षांत चांगले रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून राधेश्‍याम यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनामध्ये तुती बागेचे काटेकोर व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे राधेश्‍याम सांगतात.

तुती बाग व्यवस्थापन...

सन २०१३ मध्ये दीड एकर क्षेत्रावर उत्तम मशागत करून ७ ट्रॉली शेणखताचा वापर केला. त्यानंतर ३ फूट बाय २ फूट अंतरावर जोडओळ पद्धतीने तुतीची लागवड केली असून, दोन जोडओळींमध्ये ५ फूट अंतर ठेवले. त्यात महाराष्ट्रातील वातावरणानुसार योग्य मानल्या जाणाऱ्या तुतीच्या ‘व्ही- १’ या वाणाचे बेणे गावातील शेतकऱ्याकडूनच खरेदी केले.

या वाणापासून पानांचे एकरी साधारण २७ ते ३० टन उत्पादन मिळते. चार डोळे असलेला अंदाजे ८ ते १० इंच आकाराच्या काड्यावर प्रथम बुरशीनाशकाच्या द्रावणाची प्रक्रिया केली. त्यानंतर अर्ध्या तासाने जैविक संवर्धक घटकांची प्रक्रिया केल्यानंतर बेण्याची लागवड केली. जून महिन्यात लागवड केल्यामुळे लागलीच पाणी देण्याची गरज पडली नाही.

पावसाळा संपल्यानंतर पाणी देण्यासाठी दोन ओळींमध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरून घेतल्या होत्या. लागवडीनंतर १५ दिवसांनी बुरशीनाशकांची आळवणी केली. साधारण साडेचार ते पाच महिन्यांनी पहिली छाटणी केली. त्या वेळी १८ टन पानाचे उत्पादन मिळाले. त्यावर २०० अंडिपुंजाची बॅच घेतली. १६४ किलो कोष उत्पादन मिळाले.

त्यानंतर साडेतीन महिन्यांनी दुसरी छाटणी केली. तिसऱ्या छाटण्यापासून दर ४० दिवसांनी छाटणी करून बॅच घेतली जाते. त्यानंतर दोन जोडओळीमध्ये नांगरणी करून खतांची मात्रा दिली जाते. नत्र, स्फुरद, पालाश मिळून एकरी ७० ते ७५ किलो खत देतात. खताची मात्रा दिल्यानंतर लागलीच वखरणी करून खत झाकून घेतले जाते.

त्यानंतर ठिबकद्वारे पाणी दिले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जैविक घटकाची (बायोमिक्स) फवारणी करतात, त्यामुळे तुतीवर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. दर्जेदार पाला उपलब्ध होतो. तुतीची दीड फूट वाढ झाल्यानंतर १५ व्या दिवशी सूक्ष्म अन्नद्रव्याची पहिली फवारणी प्रति एकरी १ लिटर यानुसार फवारणी केली जाते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘वेस्ट डी कंपोझर’ची मात्रा एकरी ५०० लिटर या प्रमाणानुसार ठिबकद्वारे दिली जाते. तुती वाढीच्या २५ ते ३० दिवसां दरम्यान सूक्ष्म अन्नद्रव्यांची दुसरी फवारणी केली जाते. ४२ दिवशी छाटणी सुरू होते. या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्याने वाढ मंदावते.

त्यामुळे नियमित खतांव्यतिरिक्त १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांची मात्रा २० व्या दिवशी दिली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्याची एक जास्त फवारणी केली जाते. छाटणीचा कालावधी ५ ते १० दिवसांनी वाढतो. या पद्धतीमुळे दर्जेदार पाला उपलब्ध होत असल्याने दर्जेदार कोष उत्पादन घेणे शक्य होते.

चालू बॅचमधील कामकाज

जानेवारीमधील ३०० अंडीपुंजाच्या बॅचला २१४ किलो कोष उत्पादन मिळाले. रामनगरम येथील मार्केटमध्ये प्रतिकिलो ४६५ रुपये दर मिळाला. त्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता करून २० फेब्रुवारीपासून ३०० अंडीपुंजाची बॅच सुरू केली आहे. चौथा मोल्ट पास झाला असून, सकाळ व संध्याकाळी शूट फिडींग सुरू आहे.

रविवारी (ता.१७) रेशीम कीटक कोष तयार करण्यास सुरू करतील. गुरुवारी किंवा शुक्रवार (ता.२१ किंवा २२) कोष काढणीला सुरुवात होईल. शनिवारी (ता.२३) कोष मार्केटला पाठविण्याचे नियोजन आहे. या बॅचपासून २५० ते २७० किलो कोष उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान तुती बागेत छाटणी सुरू आहे. सोमवारी (ता. १८) छाटणी संपेल.

आगामी नियोजन...

कोष काढणीनंतर कीटक संगोपनगृहाची स्वच्छता केली जाईल.

तुतीचे बागेची आंतरमशागत करून खते दिली जातील.

पुरेशा प्रमाणात पाने उपलब्ध झाल्यानंतर एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला ३०० अंडीपुंजाची पुढील बॅच घेण्याचे नियोजन आहे.

रेशीम कीटक संगोपनगृह

रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २६ बाय ६० फूट आकाराचे कीटक संगोपनगृह उभारले आहे. वर्षभरात बायव्होल्टाइन जातीच्या २८० ते ३०० अंडीपुंजापासून २५० ते ३०० किलो कोष उत्पादन घेत आहे. कोषापासून उत्पन्नाची शाश्वती असल्याने आत्मविश्‍वास वाढला. आजवरच्या अनुभवातून काही प्रयोग करत, व्यवस्थापनात सुधारणा करत दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहे.

दोन वर्षांपूर्वी २२ फूट बाय ६६ फूट आकाराचे आणखी एक संगोपनगृह उभारले आहे. दोन संगोपनगृह असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन सलग बॅच घेणे शक्य होते. थंडी, उन्हे, वारे यापासून संरक्षणासाठी निवाऱ्याभोवती गोणपाट (तागाचे पोते) लावले आहेत. बेंगलोर जवळील रामनगरम, पूर्णा (जि. परभणी) येथील बाजारपेठेमध्ये कोष विक्री केली जाते.

राधेश्याम खुडे, ८८८८९३१७९३, (शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT