Pune News : सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातही त्याने वादळी हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांची विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांची पुरती दैना उडाली आहे. तसेच रब्बी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून नुकसानीची तीव्रता आणि क्षेत्र वाढतच चालले आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत अवकाळी हजेरी लावत आहे. अकोला जिल्ह्यात वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी (ता.१०) सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका लिंबू बागा, आंब्याला बसला. अनेकांच्या बागा उन्मळून पडल्या.
त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. पावसासह जोरदार वारा वाहिल्याने नुकसान अधिक झाले. कांदा, ज्वारी, भाजीपाला, आंबा, लिंबू, पपई, केळी, गहू, टरबूज-खरबूज अशा विविध पिकांचे हे नुकसान झाले आहे. सर्वाधिक तडाखा पातूर तालुक्याला बसला आहे.
दहा वर्षांपूर्वी तीन एकरांत लिंबाची लागवड केली होती. वादळी पावसाने तीन एकरांतील ३५० झाडांपैकी फक्त २५ ते ३० झाडे उभी राहिली आहेत. इतर सर्व झाडे उन्मळून पडली. गावातील इतरही शेतकऱ्यांच्या बागा उखडल्या. गावात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत द्यावी.हरीश धोत्रे, लिंबू उत्पादक, विवरा, जि. अकोला
...असे झाले नुकसान
आंबा, लिंबू, संत्रा, केळी बागांचे सर्वाधिक नुकसान
गहू, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान
अकोल्यात पिके जमीनदोस्त, लिंबू बागा उन्मळून पडल्या
अवकाळीच्या निशान्यावर यवतमाळ, अमरावती, अकोला, परभणी, जळगाव, लातूर जिल्हा
जळगाव जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.