Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Act : निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद यशस्वी

Agriculture Input Sellers Strike : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‍स, सीड्‍स डीलर्स असोसिएशनने (माफदा) बंदची हाक दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यभर जोरदार तयारी सुरू होती.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना निकृष्ट कृषी निविष्ठांची होणारी विक्री रोखण्यासाठी राज्य शासनाकडून येणारे प्रस्तावित कायदे मागे घेण्यासाठी ७० हजार कृषी सेवा केंद्रचालकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला गुरुवारी (ता. २) पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. बंद मागे घेण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेला प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‍स, सीड्‍स डीलर्स असोसिएशनने (माफदा) बंदची हाक दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यभर जोरदार तयारी सुरू होती. मंगळवारी रात्री कृषिमंत्र्यांनी माफदाशी संपर्क साधला.

‘‘प्रस्तावित कायद्यांच्या अनुषंगाने ‘माफदा’ने यापूर्वी सादर केलेल्या सूचना, मागण्या राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत सकारात्मक विचार चालू आहे. त्यामुळे बंद मागे घ्यावा,’’ असा प्रस्ताव कृषिमंत्र्यांनी चर्चेत मांडला.

परंतु माफदाने बंदबाबत ठाम असल्याचे स्पष्ट केले. ‘‘राज्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांमध्ये प्रस्तावित कायद्यांबाबत भीती आहे. हे कायदे मागे घेण्याची मागणी आमची असून, ते लागू केले जाणार नसल्याचे ठोस आश्‍वासन आम्हाला हवे आहे. तसेच सरकार त्यासाठी राजी असल्याचा पुरावा आम्हाला आंदोलनकर्त्यांना दाखवावा लागेल,’’ असा युक्तिवाद माफदाकडून करण्यात आला. कृषिमंत्र्यांनी कोणतेही लेखी आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे राज्यभर पहिल्याच दिवशी कडकडीत बंद झाला.

निविष्ठा विक्रेत्यांच्या या आंदोलनामुळे राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांची विक्री ठप्प झाली. विविध जिल्ह्यांमध्ये निविष्ठा विक्रेत्यांनी एकत्र येत कायदे रद्द करण्याच्या मागणीची निवेदने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर केली. दुसरीकडे कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी माफदाचे अध्यक्ष विनोद पाटील तराळ यांच्याशी बंद तत्काळ मागे घेण्याबाबत चर्चा केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

‘‘राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे. निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. शासन याबाबत लवकरच निर्णय घेईल. त्यानंतरही हरकत असल्यास तुम्हाला पुन्हा आंदोलन करता येईल. परंतु आताचे आंदोलन मागे घ्यावे,’’ असे कृषी संचालकांनी सांगितले. मात्र शासनाला आम्ही वारंवार संधी दिल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने आता मागे हटता येणार नाही, असे ‘माफदा’कडून सांगण्यात आले.

दरम्यान, निविष्ठा विक्रेत्यांच्या बंदला मराठवाड्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे आज व उद्यादेखील बंद राहतील, असे परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघाचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात निविष्ठा विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.

विविध बाजार समित्या, बाजारपेठांमधील निविष्ठा विक्री केंद्रे सकाळपासून बंद होती. नव्या निविष्ठा कायद्यातून विक्रेत्यांना वगळावे, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील ५५० विक्रेत्यांनी विक्री केंद्रे बंद ठेवत शासनाचा निषेध केला. जिल्ह्यातील साडेपाचशे केंद्रे या बंदमध्ये सहभागी झाली.

आम्ही शेतकऱ्यांची सेवा करीत असल्याने आमच्यावर कायदे लादू नयेत, अशी मागणी सातारा जिल्हा खते, बियाणे व कीटकनाशके डीलर असोसिएशनचे अध्यक्ष शशांक शहा यांनी केली. ‘आम्हाला आरोपी ठरवून शिक्षा ठोठावण्याबाबत नव्या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी त्वरित मागे घ्या; अन्यथा आम्ही बेमुदत बंद पुकारू,’ असा इशारा पश्‍चिम महाराष्ट्रातील विक्रेत्यांनी दिला आहे.

निविष्ठा विक्रेत्यांचे संसार उजाड करणारे प्रस्तावित कायदे आम्ही अजिबात होऊ देणार नाही. राज्यात आज पहिल्या दिवशी कडकडीत बंद झाला. त्यातून विक्रेत्यांची एकजूट दिसून आली आहे. शुक्रवारी (ता. ३) व शनिवारी (ता. ४) राज्यभर या कायद्याच्या विधेयकांची होळी करणार आहोत.
- विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, माफदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT