ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

ST Mahamandal Issue: एसटी वाहतुकीचा राज्यात बट्ट्याबोळ

ST Bus Update: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी कधीकाळी सेवेस तत्पर असलेली एसटी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झाली आहे. तर लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसऐवजी खासगी बस धावत आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी कधीकाळी सेवेस तत्पर असलेली एसटी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झाली आहे. तर लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसऐवजी खासगी बस धावत आहेत. गेल्या दोन- अडीच वर्षांत राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला असून, त्याकडे लक्ष देण्याऐवजी दरवाढ करून जखमेवर मीठ चोळले आहे.

खासगी बस वाहतुकीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने वारेमाप लूट सुरू आहे. तर खेडोपाडी सुरू असलेल्या फेऱ्या तोट्याच्या नावाखाली बंद केल्याने ग्रामीण भागात प्रचंड हाल सुरू आहेत. १४ हजार ३०० बसगाड्या, २५१ बस डेपो आणि ८३ हजार कर्मचारी संख्या असलेल्या एसटी महामंडळाची सेवा कधी काळी देशात अव्वल दर्जाची होती. देशातील सर्वोत्कृष्ट महामंडळाचा सर्वाधिक पतनाचा काळ सध्या सुरू असून गेल्या पाच वर्षांत ते वेगाने सुरू आहे.

कोरोना काळात राज्यातील बस वाहतूक पूर्ण बंद होती. कोरोनाचा प्रादूर्भाव संपल्यानंतर लगेचच एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी दीर्घ काळ संप पुकारला. आधी तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार या आंदोलनात उतरले. त्यानंतर कष्टकऱ्यांचा आवाज बनलेले तथाकथित नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी हे आंदोलन कह्यात घेतले. त्यानंतर आंदोलन चिघळत गेले.

दरम्यान सहा महिन्यांच्या काळात राज्यातील जनता बेहाल झाली होती. कालांतराने पगारवाढ झाल्याने हा संप मागे घेतला. मात्र, तेव्हापासून विस्कळीत झालेली बससेवा अद्याप सुरळीत झालेली नाही. खेड्यांमध्ये सध्या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून केवळ आठवडी बाजारादिवशी ही सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे आजारी, वयोवृद्ध नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असून प्रचंड खर्च करून खासगी वाहतुकीने परगावी जागे लागत आहे.

मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असे घोषवाक्य होते. विनाअपघात प्रवास आणि महिला सुरक्षेसाठी ओळख असलेली बससेवाच बंद झाल्याने राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सायंकाळच्या टप्प्यात महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या मुलींना पायी जावे लागत आहे. तर रात्री उशिरा परतणाऱ्या महिला आणि मुलींना जीव मुठीत घेऊन पायपीट करत घर गाठावे लागत आहे.

जबाबदाऱ्यांची चालढकल

सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत कुणाचा पायपोस कुणात नाही अशी अवस्था आहे. एका बस स्थानकातील कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांशी संवाद नाही. एखादी बस कधी येईल, याची ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे बस स्थानकात वाट पाहण्याशिवाय प्रवाशांच्या हातात काहीच राहत नाही. राज्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच बस वेळेत धावतात. चार्जिंग पॉइंट नसल्याने इलेक्ट्रिक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जातात. तर बस स्थानकातून निघालेली शिवशाही बस कुठे बंद पडेल याची शाश्‍वती नाही, अशी अवस्था सध्या आहे.

आरक्षण सुविधेचा बट्ट्याबोळ

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ बुकिंग केले जाते. त्यामुळे जवळच्या बस स्थानकात ती सुविधा दिली जात होती. मात्र आता तीही सुविधा बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणीच आरक्षण सुविधा देण्यात आली आहे. नव्याने एव्हिसकॅश ही कंपनी प्रणाली विकसित करणार आहे. मात्र याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, जसजशी मागणी येईल तशी आरक्षण सुविधा दिली जाईल. मागील अनुभव लक्षात घेऊन ती सुरू करू असे मोघम उत्तर देण्यात आले.

ॲप सुविधेसाठी की असुविधेसाठी?

राज्य परिवहन महामंडळाने तिकीट बुकिंगसाठी एमएसआरसीटीसी हे मोबाइल ॲप तयार केले आहे. या ॲपवर बस निवडून तिकीट बुक करता येते. मात्र हे आरक्षण सर्वसाधारण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे करता येते. अन्य आरक्षित जागा बुक करता येत नाहीत. त्यासाठी बस स्थानकावर जावे लागते. मात्र बस स्थानकावरील सुविधाच बंद असल्याने गैरसोयीचा सामना सुरू आहे. तसेच एखादी बस जिथून सुटते तेच स्थानक निवडावे लागते. परिणामी, प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आधी महामंडळाची बस कुठून सुटते आणि कुठे जाते याची माहिती करून घ्यावी लागत आहे. महामंडळाची भाषा सामान्य प्रवाशाला माहीत नसल्याने आणि आरक्षणाची पुरेशी सोय नसल्याने हे ॲप असून अडचण आणि नसून खोळंबा आहे.

एसटी महामंडळ दृष्टिक्षेपात

एकूण बसेस : १४ हजार ३००

डेपो : २५१

तिकिटापोटी जमा होणारी रक्कम : २९ कोटी

दरवाढ होण्याआधी जमा होणारी रक्कम : २५ कोटी

एकूण कर्मचारी- ८३ हजार

चालक- वाहक : ६० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT