Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Nutrient Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात स्थिरीकरण महत्त्वाचा टप्पा

Organic Farming: जमिनीत खते दिली, पाणी दिले, खते पाण्यात विरघळली, ते द्रावण पिकाने शोषण केल्याने पोषण झाले. असे आपल्याला वाटते, वास्तवात ते तसे नसते. कोणतेही खत दिल्यानंतर त्याचे जमिनीत कायिक, रासायनिक आणि जैविक अशा तीन प्रकाराने स्थिरीकरण होते.

प्रताप चिपळूणकर

Indian Agriculture: व्यक्तिपरत्वे अन्नासंबंधित आवडीनिवडी बदलत जातात. मग प्रत्येक व्यक्ती उपलब्ध अन्नातील आपल्या आवडीनिवडीनुसार कमी-जास्त सेवन करते. अशीच काहीशी परिस्थिती वनस्पतीबाबतही असते. प्रत्येक जाती-प्रजातींची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते; तर एकाच पिकाच्या दोन जातींची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते.

मग अशा गरजा नेमक्या कशा भागविल्या जातात याचा अभ्यास भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विज्ञान शाखेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांचे हे काम आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. जगभरात भू-सूक्ष्मजीवशास्त्र काहीसे दुर्लक्षित आहे. याविषयीचे सर्व साहित्य इंग्रजी भाषेत असल्याने ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अपघाताने मला या शास्त्राच्या अभ्यासाची गोडी लागली आणि पिकाकडून अन्नद्रव्यांचे सेवन नेमके कसे होते हे माहिती झाले.

शेतकऱ्यांना असे वाटत असते, की आपण जमिनीत खते दिली, पाणी दिले, खते पाण्यात विरघळली, ते द्रावण पिकाने शोषण केल्याने पोषण झाले. वास्तवात ते तसे नसते. कोणतेही खत दिल्यानंतर ती प्रथम तीन प्रकारे जमिनीत साठविली जातात. मराठीत याला स्थिरीकरण असे म्हणतात. जमिनीत असे स्थिरीकरण कायिक, रासायनिक आणि जैविक अशा तीन प्रकाराने होते.

कायिक स्थिरीकरण

मातीच्या कणावर अनेक विजातीय विद्युत भार असतात. अन्नद्रव्यांचे कण या भारामुळे मातीच्या कणांना चिकटून बसतात. खडक झिजून तयार झालेल्या खनिज कणापेक्षा सेंद्रिय कणांवर हे विद्युत भार कित्येक पटीने जास्त असतात. म्हणून हरितक्रांतीनंतर १५ ते २० वर्षे आपल्याला जी उत्पादन वाढ मिळाली ती सेंद्रिय कर्बाची टक्केवारी चांगली असल्याने कायिक स्थिरीकरणामुळेच मिळाली. पुढे जसजशी सेंद्रिय कर्बाची पातळी कमी होत गेली, तसतसे असे स्थिरीकरण कमी होत गेले. उत्पादन पातळी घसरत गेली.

एका शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख केला आहे, की तुम्ही सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाकडे कितीही दुर्लक्ष केले तरी निसर्गाने जमिनीला दिलेल्या सेंद्रिय कर्बाचे जिवावर १५ ते २० वर्षे जमिनीतून चांगले उत्पादन मिळेल. हरितक्रांतीनंतर १५ ते २० वर्षांनी जगभर उत्पादन पातळी घसरत गेली आहे. इथे हरित क्रांतीचा कोणताही दोष नव्हता. दोष सेंद्रिय खत व्यवस्थापनाचा होता. त्या काळात आपण फक्त सुधारित जाती, खते आणि कीडनाशकांच्या वापरावर जास्त लक्ष दिले. सेंद्रिय खतांचे नेमके जमिनीत काय कार्य चालते, याबाबत अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांत अज्ञान आहे.

रासायनिक स्थिरीकरण

जमिनीत सतत अनेक रासायनिक क्रिया चालू असतात. या क्रियेतील रसायनांशी अन्नद्रव्यांचा संबंध येतो आणि काही नवीनच पदार्थ तयार होतात, याला रासायनिक स्थिरीकरण असे म्हणतात.

जैविक स्थिरीकरण

अन्नद्रव्ये दिल्यानंतर सूक्ष्मजीव अशी अन्नद्रव्ये खातात. पुढे हे सूक्ष्मजीव मेल्यानंतर त्यांची मृत शरीरे म्हणजे आपण त्याला सेंद्रिय खत असे म्हणतो ती अन्नद्रव्यांचा जैविक स्थिरीकरण साठा होय.

अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण

मराठीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या तिन्ही प्रकारांना आपण स्थिरीकरण हा शब्द वापरतो. इंग्रजी भाषेत यासाठी फिजिकल ॲडसॉप्शन, केमिकल फिक्सेशन आणि बायोलॉजिकल इममोबिलायझेशन असे स्वतंत्र शब्दाचे नियोजन आहे. या तिन्ही स्थिरीकरणाचा सविस्तर अभ्यास केल्यास इंग्रजी भाषेतील तीन वेगवेगळे शब्द अगदी चपलख बसतात. कायिक स्थिरीकरण हे सैल आहे. एखाद्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर यात चिकटून बसलेली अन्नद्रव्ये वाहून जाऊ शकतात. असे असले तरीही याची उपयुक्तता कमी लेखता येत नाही. हरितक्रांतीच्या सुरुवातीचे यश केवळ याच स्थिरीकरणामुळे होते. यातूनच भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण तर झालाच आणि पुढे अन्नधान्ये निर्यातही करू लागला.

रासायनिक स्थिरीकरण : जमिनीतील वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेतून स्थिरीकरण झालेली अन्नद्रव्ये सहजासहजी गरजेप्रमाणे पिकाला उपलब्ध अवस्थेत येऊ शकत नाहीत. म्हणून हे स्थिरीकरण काहीसे कडक आहे.

जैविक स्थिरीकरण : अन्नद्रव्ये सूक्ष्मजीवांनी खाल्ल्यानंतर त्यांची मृत शरीरे म्हणजेच जैविक स्थिरीकरण. सूक्ष्मजीवांचे आयुष्य केवळ २० ते २५ मिनिटांचे असते. यामुळे त्यांच्या सतत नवीन पिढ्या तयार होत असतात आणि जुन्या मरत असतात. १२ महिने २४ तास अनुकूल अवस्थेत त्यांचे काम चालू सते. दिवसाकाठी किती जन्मतात आणि मरतात याची मोजदाद करता येणार नाही, इतके हे काम मोठे असते. जमिनीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीवांचे गट असतात. एक गट कच्चा पालापाचोळा, सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करतो. दर दुसरा गट पिकाला गरजेप्रमाणे पोषण देण्याचे काम करतो. या दोन्ही गटात कित्येक जाती- प्रजाती कार्यरत असतात. यांपैकी पहिला कुजविणाऱ्या गटाचे सूक्ष्मजीव जैविक स्थिरीकरणाचे काम करतात. कुजविण्याच्या कामातून सेंद्रिय खतांची निर्मिती होते. या कुजण्याच्या क्रियेचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत.

जैविक स्थिरीकरण झालेली अन्नद्रव्ये ना उडून जाऊ शकतात ना निचरून जाऊ शकतात. त्याच बरोबर पिकाच्या गरजेनुसार जलद स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात येऊ शकतात. यामुळे हे स्थिरीकरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वांत फायदेशीर आहे. असे असले तरीही आजवर पिढ्यान् पिढ्या हजारो वर्षे आपण जमिनीबाहेर सेंद्रिय पदार्थ कुजवून चांगले कुजलेले खत वापरण्याची शिफारस आणि वापर करीत आलो आहोत. यामुळे आपल्या पारंपरिक शेतीत जैविक स्थिरीकरणाला वाव ठेवलेला नाही.

चांगल्या कुजलेल्या खतामुळे कायिक स्थिरीकरणास वाव मिळतो. यामुळे हरितक्रांतीच्या सुरुवातीचे यशाचे श्रेय कायिक स्थिरीकरणालाच जाते. पुढे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी होत गेली तसे दिलेली अन्नद्रव्ये स्थिरीकरण होण्याची पहिली पायरी गायब झाली.

सेंद्रिय खतातील अन्नद्रव्ये जैविक स्थिरीकरण झालेली असतात; परंतु रासायनिक खतातून दिलेली अन्नद्रव्ये हरितक्रांतीच्या उत्तर काळात कोणत्याच प्रकारे स्थिरीकरण होऊ शकली नाहीत, ती नाशिवंत अवस्थेत राहिली. त्यामुळे सूर्यप्रकाशात उडून अगर जास्त ओलीत अगर पावसात ती निचरूनही जातात.

आज नत्रयुक्त क्षार निचरून गेल्याने ते पुढे पाणीसाठ्यात जाऊन पाणी प्रदूषित करतात, अशी तक्रार केली जाते, यामागे हेच कारण आहे. एसआरटी अगर शून्य मशागत पद्धतीत मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष दीर्घकाळ कुजत राहतात. पुढील पिकाच्या रासायनिक खताचे हप्ते देण्याच्या काळात ही कुजण्याची क्रिया चालू राहिल्याने रासायनिक खतातील अन्नद्रव्यांचे जैविक स्थिरीकरण होते, त्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते.

आज दिलेल्या रासायनिक खतातील फक्त १८ ते २० टक्केच खत पीक घेऊ शकते आणि बाकी विविध मार्गाने नाश पावते. भारतामध्ये विविध रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागतात. या खतांची निर्मिती करताना नाप्ता हे इंधन मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. यामुळे खते तयार करण्याचा उत्पादन खर्च खूप मोठा आहे. शेतकऱ्यांना परवडावे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सरकार यासाठी अनुदान देते.

मागील काही वर्षांत स्फुरद व पालाशयुक्त खतावरील अनुदान काही प्रमाणात कमी केल्यामुळे त्याचे दर दुप्पट, तिप्पट आहेत. त्यामुळे रासायनिक खते ही अत्यंत अभ्यासपूर्वक व जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरणे गरजेचे आहे. रासायनिक खत व्यवस्थापनामध्ये स्थिरीकरण ही पहिली पायरी आहे. प्रथम स्थिरीकरण व्यवस्थित झाले तरच पुढील उपलब्धीकरणाच्या पायरीला वाव शिल्लक राहतो.

- प्रताप चिपळूणकर ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT