Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : धूळ पेरण्या टाळाव्यात, कृषी आयुक्तांचा सल्ला; मॉन्सून रेंगाळल्यामुळे नियंत्रण कक्ष स्थापन

Team Agrowon

Pune News : मॉन्सून कोकणात अडकल्यामुळे राज्यातील खरीप पेरण्यांच्या नियोजनाची चिंता वाढली आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी या स्थितीचा आढावा घेतला आहे. आयुक्तालयात २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

शेतकऱ्यांनी धूळ पेरणी टाळावी. तसेच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मॉन्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या आसपास होते. यंदा मॉन्सूनचे आगमन कोकणात ११ जूनला झाले. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी त्याचे आगमन झालेले नाही.

राज्यात आतापर्यंत १३८.४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १६.४० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या केवळ ११ टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात खरिपाचा पेरा अवघा १.९८ लाख हेक्टरवर झाला आहे. हा पेरा केवळ १.३० टक्के आहे. अजून जवळपास १५० लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यामध्ये मॉन्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी काळजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी, आपत्कालीन पीकपेऱ्याचे नियोजन कसे असावे, या बाबत कृषिमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली.

चर्चेत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, भारतीय हवामान विभागाचे के. एस. हौसळीकर तसेच सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.

राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे व कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने आता राज्यभर स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येत आहे. क्षेत्रिय यंत्रणांना याबाबत प्रचार व प्रसार वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी मॉन्सूनचा अंदाज घेत पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व कीटकनाशके वापरण्याचे नियोजन करावे. या निविष्ठा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करून देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

२४ जूननंतर सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता

हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. यामुळे नवीन सामान्य पाऊस येण्याचा कालावधी २४ ते २५ जून असेल, असा वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे.

त्यानुसार २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीनंतर सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

कृषी आयुक्तालयाचा सल्ला असा...

- शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये.

- ८० ते १०० मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी नको.

- लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी.

- धुळ पेरणी करू नये.

- पेरणीवेळी २० टक्के जादा बियाण्यांचा वापर करावा.

- सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक नको

- आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.

- पेरणी करताना ‘रुंद सरी वरंबा’ पद्धतीने (बीबीएफ ) पेरणी करावी.

- जमिनीतील ओल राखण्यासाठी आच्छादन तंत्राचा वापर करावा.

शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आम्ही कृषी आयुक्तालय स्तरावर २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे शेतकरी १८००-२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
सुनील चव्हाण, कृषी आयुक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT