Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing 2025: सोयाबीन, कापूस, तुरीची पेरणी कमी; मक्याच्या लागवडीत मोठी वाढ

Kharif Season: देशात यंदा खरिपाची गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी पेरणी आघाडीवर आहे. ४ ऑगस्टपर्यंत देशात ९३३ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. आतापर्यंत देशात कापूस, सोयाबीन, तूर आणि उडीदाची लागवड पिछाडीवर आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशात यंदा खरिपाची गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी पेरणी आघाडीवर आहे. ४ ऑगस्टपर्यंत देशात ९३३ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. आतापर्यंत देशात कापूस, सोयाबीन, तूर आणि उडीदाची लागवड पिछाडीवर आहे. तर भात, मका आणि उसाची लागवड आघाडीवर आहे. भात आणि मक्याला खरिपात शेतकऱ्यांची जास्त पसंती असल्याचे सरकारने जारी केलेल्या पेरणीच्या अहवालातून स्पष्ट होते.

देशात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ हजार ९६ हेक्टर आहे. यंदा मे महिन्यातच काही राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला. माॅन्सूनही लवकर आला. देशात जून आणि जुलै महिन्यात पाऊस हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. असे असले तरी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाचे वितरण असमान झाले आहे. राज्यातील सव्वादोनशे तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे.

पाऊस वेळेत आल्याने खरिपाचा पेरा मात्र वेळेत होत आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा खरिपाचा पेरा आघाडीवर आहे. देशात ४ ऑगस्टअखेर ९३३ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. गेल्यावर्षी याच तारखेला ८८८ लाख हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झाली होती. म्हणजेच यंदाचा पेरा ५ टक्क्यांनी आघाडीवर आहे. उसाची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३ टक्क्यांनी आघाडीवर आहे. उसाखाली आतापर्यंत ५७ लाख हेक्टरवर झाली आहे.

कापूस २ टक्क्यांनी पिछाडीवर

खरिपात भातानंतर कापसाचे सरासरी क्षेत्र जास्त आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र १२९ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत १०६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. ही लागवड गेल्यावर्षी याच काळात झालेल्या लागवडीपेक्षा २ टक्क्यांनी कमी आहे. गेले वर्षभर कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसत आहे.

सोयाबीनकडे पाठ ?

देशात गेले वर्षभर सोयाबीनचे भाव दबावात राहीले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कमी कल दिसत आहे. सोयाबीनची लागवड आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी पिछाडीवर दिसत आहे. सोयाबीनचा ११८ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तेलबियांमध्ये केवळ सोयाबीनच नाही तर भुईमूग, सूर्यफूल, तीळ, कारळ्याची लागवड पिछाडीवर आहे. त्यामुळे एकूण तेलबिया पिकांचे क्षेत्रही ४ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तेलबियांची लागवड १७१ लाख हेक्टरवर झाली आहे.

मका, भाताला पसंती

खरिपात शेतकऱ्यांची मका आणि भाताला चांगली पसंती दिसत आहे. मक्याची लागवड तब्बल १२ टक्क्यांनी वाढली आहे. मक्याखाली आतापर्यंत जवळपास ९२ लाख हेक्टर क्षेत्र आले आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा मक्याची लागवड तब्बल १५ टक्क्यांनी वाढली आहे. अंतिम आकडा येईपर्यंत ही टक्केवारी आणखी वाढणार आहे. ज्वारी, बाजरी आणि रागीची लागवड मात्र पिछाडीवर आहे. भाताची लागवडही आतापर्यंत १७ टक्क्यांनी आघाडीवर आहे. भाताखाली आतापर्यंत ३१९ लाख हेक्टरवर लागवड झाली.

तुरीची लागवड पिछाडीवर

शेतकऱ्यांना गेल्या खरिपातील तुरीसाठी भाव मिळाला नाही. त्यामुळे तुरीची लगवड साडेसात टक्क्यांनी पिछाडीवर आहे. आतापर्यंत लागवड ३८ लाख हेक्टरवर झाली आहे. केवळ तूरच नाही तर उडदाची लागवडही पिछाडीवर आहे. मूग आणि इतर कडधान्याची लागवड काहीशी आघाडीवर आहे. त्यामुळे एकूण कडधान्य लागवड गेल्यावर्षीच्या पातळीवर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू

Floriculture Management: सणासुदीसाठी झेंडू, शेवंती, निशिगंध फुलांचे नियोजन कसे करावे? उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा सल्ला

PM Kisan Yojana : दुहेरी नोंदणीमुळे पीएम किसानचा लाभ मिळेना

SCROLL FOR NEXT