
Pune News: अमेरिकेतील कापूस उत्पादकांनाही यंदा पीक आतबट्ट्याचं ठरत आहे. यंदा कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. सरकारचाही अपेक्षित आधार कापूस उत्पादकांना मिळला नाही. त्यामुळे २०२५ मध्ये अमेरिकेतील शेतकरी कापसाची १४.५ टक्क्यांनी लागवड कमी करतील, असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल काॅटन काऊंसीलने व्यक्त केला.
जागतिक पातळीवर २०२४ हे वर्ष कापूस उत्पादकांसाठी तोट्याचं ठरत आहे. अमेरिकेच्या कापूस उत्पादकांचं अर्थकारण कोलमडले आहे. अनेक अडचणींचा सामना कापूस उद्योगाला करावा लागला. महत्वाचे म्हणजे कापसाचे भाव यंदा पडले आहेत. दुसरीकडे कापसाचा उत्पादन खर्चही वाढला आणि मागणीही कमी राहीली. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेतील कापूस उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले. चालू हंगामात कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे २०२५ मध्ये कापूस लागवड कमी करणार असल्याचे अमेरिकेतील शेतकऱ्यांनी कळवले आहे, असे नॅशनल काॅटन काऊंसीलने म्हटले आहे.
२०२४ मध्ये केवळ कापूसच नाही तर जवळपास सर्वच पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. शेतकऱ्यांना मका आणि सोयाबीनच्या तुलनेत यंदा कापसामधून कमी परतावा मिळाला. त्यामुळे शेतकरी कापूस लागवड कमी करण्याच्या निर्णयावर आल्याचे काऊंसीलचे म्हणणे आहे. २०२५ मध्ये मागणी वाढून जागतिक पातळीवर कापसाचा वापर वाढण्याचा अंदाज आहे. पण चालू हंगामात जागतिक पातळीवर कापसाचे भाव कमी आहेत. त्यामुळे जागतिक कापूस उत्पादनात पुढील हंगामात लागवड कमी राहून उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज काऊंसीलने व्यक्त केला.
अमेरिकेत कापसाचे उत्पादन होते त्या तुलनेत वापर कमी होतो. अमेरिकेचा कापूस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. पण महत्वाच्या ग्राहक देशांमध्ये कापसाची मागणी यंदा कमी आहे. जागतिक पातळीवर आर्थिक समस्या असल्याने मागणी अपेक्षेप्रमाणे यंदा वाढलेली नाही. त्यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत. त्यातच डाॅलरच्या तुलनेत इतर देशांच्या चलनाचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे अमेरिकेचा कापूस महाग ठरतो आहे. याचा परिणाम अमेरिकेतील दरावर झाला.
चालू हंगामात अमेरिकेच्या बाजारात कापसाला सरासरी ७० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी भाव मिळाला. मागच्या दोन महिन्यांपासून बाजार ६८ सेंटच्या खाली दिसतो आहे. चालू हंगामात कमी भाव मिळाला. उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे आम्ही कापूस लागवड कमी करणार. मका आणि सोयाबीनच्या तुलनेत कापसाचे भाव कमी राहीले. इतर पिकांच्या तुलनेत कापसातून मिळालेला परतावा कमी होता, असे शेतकऱ्यांनी सांगितल्यचेही अमेरिकेच्या नॅशनल काॅटन काऊंसीलने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.