Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : बीजोत्पादनासह प्रक्रियेतील ‘सोनपाऊल’

 गोपाल हागे

गोपाल हागे

Producer Company : अंजनी खुर्द (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथील सोनपाऊल ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने पाच वर्षांत विविध क्षेत्रांत काम करीत आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. खरीप व रब्बी हंगामातील मुख्य पिकांचे बीजोत्पादन, शासकीय हमीभाव खरेदी यात सक्रिय कार्य करताना प्रक्रिया उद्योगातही उतरण्याच्या दृष्टीने शीतगृह तसेच डाळ मिल यंत्रणाही उभारण्यास सुरुवात केली आहे.


औरंगाबाद- नागपूर महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात अंजनीखुर्द (ता. लोणार) गाव आहे. या छोट्या गावात २४ एप्रिल २०१८ मध्ये सोनपाऊल ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा व चिखली अशा पाच तालुक्यांत कंपनीचे कार्यक्षेत्र आहेत. संस्थेचे १० संचालक असून, याच तालुक्यांतील विविध गावांतील मिळून एक हजारांपर्यंत शेतकरी सभासद आहेत. श्रीनंदना महिला शेतकरी उत्पादक कंपनीही या कंपनीची सभासद आहे. सध्या २० लाख रुपये भागभांडवल आहे. मेहकर स्थित लक्ष्मीकांत विष्णू वायाळ कंपनीचे अध्यक्ष आहेत.

बीजोत्पादन- मुख्य उपक्रम

‘सोनपाऊल’ कंपनी मुख्यतः बीजोत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. खरीप व रब्बी हंगामांतील
मुख्य पिकांचे पायाभूत व प्रमाणित बियाणे कंपनी उत्पादित करते. कंपनीने परभणी, अकोला व राहुरी येथील कृषी विद्यापीठांसोबत त्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून नव्या, सुधारित वाणांच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला जातो.

प्रातिनिधिक उदाहरणे सांगायची तर सोयाबीनच्या फुले दूर्वा, फुले किमया, एमएयूएस ६१२, तसेच हरभऱ्याच्या फुले विक्रांत, फुले विक्रम, फुले विश्‍वराज, पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक, गव्हाचे नेत्रावती आदी विविध वाणांचा समावेश आहे. जबलपूर, इंदूर, ग्वाल्हेर, कानपूर येथील तसेच पुणे येथील आघारकर आदी संस्थांकडील वाणांचाही वापर केला जातो.

चार हजार क्विंटलचे उत्पादन

अलीकडील वर्षांत ‘सोनपाऊल’ने खरिपात ५०० ते ६०० एकरांत तर रब्बीत ३०० ते ४००
एकरांत बीजोत्पादन कार्यक्रम राबविला आहे. यात खरिपात ३०० ते ४००, तर रब्बीत २०० ते २५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. विदर्भात कंपनीने सुमारे १५ वितरक नेमले आहेत.

खरिपात चार हजार ते पाच हजार क्विंटल, तर रब्बीतील तीन हजार ते चार हजार क्विंटल बियाण्याची विक्री करण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे. बाजारात शेतीमालाचे दर पडले, की पुढे त्याच्या बियाणे विक्रीवर परिणाम होतो. बियाण्यावरील खर्चात वाढ होते. यंदा सोयाबीनच्या बियाण्यासंबंधी असा अनुभव आल्याचे कंपनीचे अध्यक्ष श्री. वायाळ यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योग

कंपनीने बियाणे प्रक्रियेवरही लक्ष केंद्रित केले. सन २०१९ मध्ये केंद्र पुरस्कृत ‘एसएमएसपी’ योजनेअंतर्गत अंजनी खुर्द येथे त्यासंबंधीचा यंत्रणा प्रकल्प उभारला. तसेच १४०० मे. टन क्षमतेचे गोदाम उभारले. एक कोटी पाच लाख रुपयांचा हा प्रकल्प होता. यासाठी शासनाचे
६० लाखांचे अनुदान मिळाले. उर्वरित अर्थसाहाय्य स्टेट बँकेने उपलब्ध केले. सन २०२० मध्ये
‘पोकरा’अंतर्गत १७०० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम केले. त्याची किंमत एक कोटी रुपये असून, त्यालाही ६० लाख रुपये अनुदान मिळाले. संस्‍थेने हे गोदाम ‘वेअर हाउसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ॲथॉरिटी’कडे नोंदणीकृत केले आहे.

नाफेड खरेदीत सहभाग

बीजोत्पादनाच्या बरोबरीने कंपनी २०१८-१९ पासून नाफेड अंतर्गत साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) व अंजनी या दोन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्र चालवण्यात येतात. तूर, मूग, उडीद, हरभरा, मका व ज्वारी आदींची खरेदी शेतकऱ्यांकडून होते. प्रातिनिधिक आकडेवारी सांगायची तर २०१९-२० च्या हंगामात २३, ४०० क्विंटल तूर, ५६, ९०० क्विंटल हरभरा खरेदी केला. सन २०२२-२३ मध्ये ३६ हजार ९४५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली. दोन्ही केंद्रांवर मोजमापासाठी मोठ्या संख्येने वजनकाट्यांची सुविधा उभारली आहे. संबंधित माल शासकीय गोदामात तत्काळ पोहोचवून शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

लक्ष्मीकांत वायाळ, ७५८८०८०४४७
(अध्यक्ष, सोनपाऊल कंपनी)


शीतगृह व डाळ मिल उभारणी (इन्फो १)

-कंपनीकडून मिरची, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू आदी शेतीमाल प्रक्रियेत उतरण्यासाठी हालचाली सुरू.
-सन २०२२ पासून त्यासाठी ‘मॅग्नेट’ अंतर्गत साह्य. त्या अंतर्गत अडीच हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारणीचे काम सुरू.
-त्यासाठी शासनाकडे सहा कोटी ५३ लाख लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल सादर. तीन कोटी पाच लाख रुपये अनुदान उपलब्ध होणार.
-मेहकर, लोणार, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा या चार तालुक्यांतील एवढ्या मोठ्या क्षमतेचे हे पहिलेच शीतगृह असावे. त्यामुळे शेतकऱ्यांना माल साठवणुकीची सुविधा नजीकच उपलब्ध होणार.
-‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत डाळ मिल उभारणीसाठी प्रस्तावही दाखल. त्यासाठीची यंत्रसामग्री, शेड व गोदाम बांधकामाचा समावेश. सव्वातीन कोटींचा हा प्रकल्प मंजूर.

वार्षिक उलाढाल

वर्ष उलाढाल (रुपये)

२०१८-१९ एक कोटी ५२ लाख ३४,१५१
२०१९-२० दोन कोटी ७० लाख ६७,०२१
२०२०-२१ चार कोटी १० लाख ६६, ४६३
२०२१-२२ चार कोटी ६९ लाख ९९, ०९५
२०२२-२३ तीन कोटी ७८ लाख ९६०

सदस्यांच्या नियमित सभांद्वारे कंपनीचे महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जातात. वर्षाला काही लाखांचा नफा कंपनी कमावीत आहे. येत्या पाच वर्षांत वार्षिक उलाढाल दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

SCROLL FOR NEXT