Reading Agrowon
ॲग्रो विशेष

Pratap Pawar : काही वाचन, चिंतन

Team Agrowon

Pratap Pawar Article : फालतू चर्चेत, आळसात की एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेत? इतरांना दोष देण्यात की इतरांच्या आणि स्व-उन्नतीसाठी? की आपल्या कामात? हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. त्यामुळे आपल्या विचारांवर, ध्येयावर लक्ष ठेवा. कारण, याच बाबी तुमच्या उपयोगाला येतील.

अनेकदा काही पुस्तकं, काही वाचन, काही संवाद, भेटीगाठी यांतून खूप शिकायला मिळतं. त्या गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तर काही गोष्टी तुमच्या आचरणात, आयुष्यात, तुमच्या विचारांत परिवर्तन घडवून आणतात. यासाठी आपण विद्यार्थी असायला हवं. दुसरी अथवा वेगळी भूमिका, वेगळा दृष्टिकोन समजून मन किंवा वृत्तीही तयार हवी. गेली सुमारे ५५ वर्षं मी अनेक सामाजिक न्यासांबरोबर काम केलं, अनेक छोट्या उद्योजकांबरोबर वेगवेगळ्या कारणांनी एकत्र काम केलं.

व्यवसायही केला. या सर्व गोष्टींमध्ये - भले त्या पूर्णतः सामाजिक असोत -  अनेक लोकांशी संपर्क होतो, संवाद होतो आणि त्यातून ज्ञानाचं, त्यांच्या विचारांचं भांडारच आपल्याला उपलब्ध होतं. उदाहरणादाखल मी फक्त काही नावं सांगेन. अर्थात, तशी अनेक उदाहरणं सांगू शकतो. पहिले शंतनूराव आणि यमूताई किर्लोस्कर, अच्युतराव पटवर्धन, अच्युतराव आपटे, एन. दांडेकर, डॉ. एफ. सी. कोहली, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, यशवंतराव चंद्रचूड, डॉ. रॉसी... उल्लेखिलेली प्रत्येक व्यक्ती ही ज्ञानाचं, अनुभवाचं भांडारच. त्यांच्या पदांपेक्षा त्यांच्या मानवी चेहऱ्यामुळे मी जास्त आकर्षित झालो होतो.

त्यांच्या संपर्कातील एक तास हा दहा पुस्तकं वाचण्यासारखा असतो, सामाजिक कामांमध्ये अशा लोकांबरोबर अनौपचारिक गप्पा, चर्चा होतात. त्यांच्या आठवणी, त्यांचे संस्कार आपल्याबरोबर कायमचे राहतात. माझी आई पुस्तकी (अभ्यासक्रमातील) शिक्षणापेक्षा, आम्ही काय वाचतो, कोणत्या विषयांवर चर्चा करतो, आमचा मित्रपरिवार कोण आहे, व्यायाम, खेळ यांत किती भाग घेतो यांवरच अधिक लक्ष ठेवत असे. कदाचित, त्याचमुळे तिच्या दोन मुलांना ‘पद्मश्री’ आणि एका मुलाला ‘पद्मविभूषण’ या किताबानं सन्मानित केलं गेलं असावं!


खरं म्हणाल, तर हे केवढं मोठं भाग्य, की माझ्यासारख्याला गेली ५५ वर्षं या सर्व व्यक्तींचा सातत्यानं लाभ झाला आणि त्यांतल्या काही जणांच्या स्मृतींमधून आजही होत आहे. अशा लोकांच्या सहवासामुळे आपलीसुद्धा वृत्ती देण्याची होते. मागणे, स्वार्थ या बाबी केव्हाच गायब झालेल्या असतात. त्यामुळे मनःशांती लाभते, म्हणजेच सुखी आयुष्य! यापेक्षा मनुष्याला काय हवं असतं?

सध्याच्या जगातील अनेक देशांमध्ये जी नेतृत्वे उदयाला आलेली आहेत, त्यांच्यात सत्तेचं केंद्रीकरण ही वृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसते. अशा वेळी जनतेला भुरळ पाडणारं व्यक्तिमत्त्व असेल तर हे नेतृत्व अनिर्बंध वृत्तीकडे जातं. त्यात देशाभिमान, धर्माभिमान आणि आपल्या विरुद्धच्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करणं -  भले त्यात अनेक असत्य गोष्टी घुसडून का होईना - या बाबी सातत्यानं केल्या जातात. हिटलरच्या गोबेल्सचं एक तत्त्व होतं. एखादी गोष्टी; मग ती किती का खोटी असेना, जीव तोडून शंभर वेळा सांगितली,  की लोकांचा विश्‍वास बसायला लागतो त्या गोष्टीवर.

याच अनुषंगानं एक गोष्ट वाचनात आली. ती माझ्या मनात घर करून बसली. त्या गोष्टीत विचारवंतानं म्हटलं आहे, की ‘शिक्षण म्हणजे काय हो? आपण इतिहास शिकवतो म्हणजे काय? उदाहरणार्थ : हिटलरनं साठ लाख ज्यू लोकांची - त्यात बायका-मुलं-तरुण-म्हातारे असे सर्व प्रकारचे लोक होते - निर्घृणपणे हत्या केली. त्यांत विविध प्रकारची अमानुषता होती. हे करण्यात जर्मन लोकांमध्ये युवक, बायका, पुरुष, डॉक्टर्स, सैनिक, पोलिस असे सर्व जण सामील होते. मग हे फक्त ऐकून घ्यायचं, की हिटलरसारखा माणूस हे सर्वसामान्य जर्मन लोकांकडून कसं करून घेऊ शकला हे समजून घ्यायचं?

केवळ घोकंपट्टी नको, तर घटनेच्या मुळाशी जाऊन चिंतन करा असं शिक्षण सांगतं. त्याचबरोबर शिक्षण म्हणजे, अशी लक्षणं दिसल्याबरोबर जागरूक होऊन, हिटलरशाहीची पुनरावृत्ती; मग ती कुठल्याही स्वरूपात का असेना, होणार नाही याची समाजानं काळजी घ्यायला हवी. हे किती जणांना समजतं किंवा समजलं, तेही सुशिक्षित लोकांना? की भावनांच्या प्रलयात तुम्हीही वाहून जाणाऱ्यांपैकी एक असणार आहात? अशा प्रश्नांचं चिंतन म्हणजे शिक्षण.


एखाद्या समुदायाबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल द्वेषाची भावना पेरण्याऐवजी आपलं कर्तृत्व, वक्तृत्व समन्वयासाठी का वापरलं जाऊ नये, असाही आपण विचार करायला हवा. कदाचित्, त्यामुळे जगात, समाजात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याऐवजी शांततामय परिस्थिती होऊ तयार होऊ शकते. मात्र त्याचबरोबर स्वशक्ती, स्वावलंबन वाढवत राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सशक्त व्यक्तीच शांततेचा पुरस्कार करू शकते, हे जगन्मान्य आहे.


हुकूमशाही-वृत्तीच्या लोकांमध्ये एक साधर्म्य दिसतं. ‘आपण अत्यंत प्रामाणिक आहोत,’ या गोष्टीचा ते वक्तृत्वशैलीच्या जोरावर जनतेवर प्रभाव टाकतात. मात्र त्यांचे सहकारी, निवडलेले सरकारी अधिकारी हे बहुतांशी भ्रष्ट असतात. त्यांच्या साह्यानं ते विरोधी पक्षाला नामोहरम करतात; परंतु स्वतःच्या भ्रष्ट नसण्याच्या गोष्टीचं सतत भांडवल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, त्यांचे सर्व कुटुंबीय, हितचिंतक यांच्यावर धाडी टाकून खोटेनाटे आरोप करत जनतेची  दिशाभूल करण्यात ते यशस्वी होतात.

प्रसारमाध्यमांना ते कधीच भेटत नाहीत आणि त्यांच्यावर सर्व प्रकारची नियंत्रणं आणण्याचा प्रयत्न करतात. निदान लोकशाहीत तरी जनतेनं आपले डोळे, कान, उघडे ठेवणं आवश्यक ठरतं. अशा नेत्यांचा मानवी चेहरा शोधल्यावर सत्य समजतं. मुखवट्यांना भुलून जाऊ नका. तो जाणीवपूर्वक घडवलेला असतो.

उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता असलेले सरकारी किंवा औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश अधिकारी हे एखाद्या उद्योगपतीच्या किंवा मंत्र्याच्या आज्ञेनुसार अंमलबजावणी करत असतात. याचाच फायदा वेगळ्या प्रकारे ब्रिटिशांनी घेतला. आपल्याच लोकांना त्यांच्या पद्धतीनं हुकमाचे ताबेदार, गुलाम बनवलं गेलं; मग तो सैनिक असो वा आयएएस अधिकारी. आश्‍चर्य वाटू घेऊ नका...पण या ब्रिटिशांनी फक्त एक लाख ब्रिटिश पाठवून पाच हजार मैलांवरून आपल्याच भारतीय लोकांच्या साह्यानं भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं. आपल्या देशाची पूर्ण लूट केली. आम्ही यातून काय शिकलो, अगदी आजही?


असंच वाचनात आलं की (जे गोष्टीरूप आणि रूपकात्मक होतं) एकदा जंगलात एक मस्तवाल, तरुण गाढव आरडाओरड करत वाघासमोर उभं राहिलं. वाघोबा आराम करत होते. गाढवानं आरडाओरड करत, थोडाफार थयथयाट करत वाघाला त्याच्याशी वाद घालण्यास भाग पाडलं. प्रश्‍न असा होता, की गवत हे हिरव्या रंगाचं की निळ्या? गाढवाचं म्हणणं होतं, ‘गवत निळं असतं या निष्कर्षापर्यंत खूप संशोधन केल्यावर मी पोहोचलो आहे.’


त्यामुळे गाढव एक प्राथमिकता म्हणून वाघाचं वाद-वजा-शिक्षण करण्यासाठी अतिशय उत्साहात आलेलं असतं. वादविवादात वाघानं सांगितलं, ‘गवत हिरवंच असतं.’ त्यावर गाढवानं खूप वाद घातला. आरडाओरडा केला. मात्र वाघानं आपलं मत बदललं नाही व अशा परिस्थितीत त्यानं एक पर्याय सुचवला. त्यानुसार, दोघंही जंगलच्या राजाकडे - म्हणजे सिंहाकडे - न्यायनिवाड्यासाठी गेले.

सिंहराजापुढं गाढवानं आपली कैफियत जोरजोरात मांडली. ‘वाघाला हे साधं कसं कळत नाही’ वगैरे त्यानं सिंहाला सांगितलं आणि न्याय मागितला.
सिंहानं विचारपूर्वक उत्तर दिलं : ‘गाढवाचं म्हणणं बरोबर आहे. गवत हे निळंच असतं.’ सिंहाचा हा ‘निवाडा’ ऐकल्याबरोबर गाढव हुंदडायला लागलं...मोठमोठ्यानं खिंकाळून आनंद व्यक्त करायला लागलं आणि सिंहराजाचे आभार मानून, ‘वाघोबा, तुम्ही किती गाढव आहात...’ असं सांगत जोरात पळत गेलं.
तक्रारीबरोबर वकील जसे ‘सर्व खर्चसुद्धा द्यावा’ अशी न्यायाधीशांना विनंती करतात, त्याच धर्तीवर ‘पुढील पाच वर्षं मला तोंड दाखवायचं नाही,’ अशी शिक्षा सिंहराज वाघाला सुनावतात. हे सर्व झाल्यावर वाघ काही मिनिटं तिथंच थांबतो. तो सिंहाला म्हणतो : ‘‘महाराज, तुम्हाला माहीत आहे, की गवत हिरवं आहे... तरीसुद्धा तुम्ही माझ्याविरुद्ध निकाल तर दिलातच; परंतु मला शिक्षाही केलीत. असं का?’’
सिंह महाराज उत्तरतात : ‘‘होय, तू म्हणतोस ते खरं आहे. गवत हे हिरवंच असतं; परंतु तुझ्यासारख्यानं गाढवाबरोबर वाद घातला आणि माझा वेळ वाया घालवला यासाठी मी तुला शिक्षा केली. जा आता!’’
तात्पर्य, आपण कुणाबरोबर किती वाद घालतो हे प्रत्येकानं तपासावं.
आता व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमांमध्ये अनेकदा राजकीय अथवा धार्मिक टोकाच्या भूमिका असलेली माहिती येते. सुरुवातीला ‘या गोष्टी मित्रांमध्ये आणू नका’ अशी मी विनंती केली. एक-दोन ग्रुपमधून मी बाहेरही पडलो. आता मी असे मेसेजेस न वाचता सरळ काढून टाकतो. कशासाठी मनाला ताप करून घ्यायचा? अर्थात, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला जे पटेल तेच तुम्ही विचारपूर्वक करा एवढंच सुचवायचं आहे.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्यानुसार, आपला एक तास कुणाबरोबर घालवायचा, शहाण्या व्यक्तीबरोबर, चांगल्या वाचनात की गाढवाबरोबर? जरूर विचार करा. उत्तर प्रत्येकाकडे आहे.(तुम्हाला मान्य आहे?)
वेळ कुठल्या गोष्टीत वाया घालवायचा? फालतू चर्चेत, आळसात की एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेत? इतरांना दोष देण्यात की इतरांच्या आणि स्व-उन्नतीसाठी? की आपल्या कामात? हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. त्यामुळे आपल्या विचारांवर, ध्येयावर लक्ष ठेवा. कारण, याच बाबी तुमच्या उपयोगाला येतील. तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवतील. आपल्या कार्यावर, म्हणजे कर्मावर, लक्ष ठेवा. कारण, त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्त्व निर्माण होईल. म्हणून ठरवा, प्रत्येक तास कुठं घालवायचा! पाहा शांतपणे विचार करून.
आजही माझ्यासारख्याला रोज नवीन काही तरी शिकण्याची भूक असते. त्यातून आनंद मिळतो. समाजासाठी रोज थोडं का होईना योगदान देण्याची प्रवृत्ती निर्माण होते. वरील नमूद केलेल्या आणि तत्सम अनेक व्यक्तींमुळे, आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव तर होतेच; परंतु पाय जमिनीवर राहतात, वृत्ती विनयशील होते. 

(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
 ८४८४९ ७३६०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT