Soybean Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Productivity : काही शेतकऱ्यांनी संकटातही राखली सोयाबीन उत्पादकता

 गोपाल हागे

Akola News : शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम चांगला राहिलेला नाही. त्यातही सोयाबीन उत्पादकांना अधिकच अडचणींना सामोरे जावे लागले. ऑगस्टमधील पावसाचा सलग खंड, मूळ-खोडकुजनंतर शेवटच्या टप्प्‍यात आलेला पिवळा मोझॅक यामुळे सोयाबीनची उत्पादकता गेल्या वर्षीपेक्षा अर्धीच आहे. अशाही वर्षात खर्च कमी करीत केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून काही शेतकऱ्यांनी उत्पादकता टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे.

अकोला जिल्ह्यातील नकाशी येथील शशिकांत पाटील-नकासकर (मो. ८६९८२१०७३६) यांनी प्रयोग म्हणून यंदा दोन एकरांत बेडवर ‘फुले संगम’ या वाणाची लागवड केली. यासाठी घरचेच बियाणे वापरले.

हस्तचलित टोकण यंत्राने एकरी ११ किलो बियाण्यांची लावण केली. लागवडीपूर्वी बियाण्याला ‘एस-९ कल्चर’ची बीजप्रक्रिया व नंतर ड्रिचिंग केली. पिकाला एकवेळ निंबोळी अर्काची फवारणी व एक निंदण काढले. तर लागवडीपूर्वी स्वतः तयार केलेले बायोडायनामिक कंपोस्ट शेतात टाकले.

या भागात यंदा पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन सरासरी ५ ते ६ क्विंटलपेक्षा अधिक नाही. मात्र कुठल्याही रासायनिक खताची मात्रा न देता व कीडनाशकांची फवारणी न करताही त्यांना एकरी १० क्विंटल उत्पादन घेतले.

बेडवर लागवड असल्याने पावसाच्या खंडाच्या काळातही त्यांचे सोयाबीन तरले. एकरी नऊ हजारांपर्यंत सर्व खर्च त्यांना आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत यंदाच्या अडचणीच्या काळात त्यांनी समाधानकारक उत्पादन मिळविले.

शंकरराव बाजड (नेतन्सा, ता. रिसोड, जि. वाशीम, मो. ९६२३६८४१२३) यांनी यंदा दोन एकरांत बेडवर सोयाबीनची लागवड केली. त्यातील पिकाची नुकतीच काढणी झाली आहे. या क्षेत्रात एकरी साडेआठ क्विंटल सोयाबीन झाले.

गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी पूर्णतः रासायनिक घटकांचा वापर थांबविला आहे. फक्त कंपोस्टचा वापर करीत आहेत. यंदा दोन एकरांत बाजड यांनी एकरी १५ किलो बियाणे लावून पेरणी केली.

या भागात ऑगस्टमध्ये २२ दिवसांचा खंड पडला. त्याही परिस्थितीत बेडवरील लागवड असल्याने पिकाने तग धरला. या पिकावर तीन वेळा केवळ तरल खतांच्या फवारण्या घेतल्या. शेवटपर्यंत पीक हिरवेगार होते.

पानांमध्ये लुसलुशीतपणा कमी राहिल्याने पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव नगण्य झाला. तरीही कमी पावसामुळे शेंड्यावरील शेंगेतील दाणे कमी भरले. एकरी साडेआठ क्विंटल उत्पादकता आली आहे, असे जड यांनी सांगितले. या भागात यंदा सोयाबीनची उत्पादकता सरासरी ५ ते ६ क्विंटल आहे.

अंत्री देशमुख (ता. मेहकर जि. बुलडाणा, मो. ८२०८०७३३७३) येथील बी. के. देशमुख हे मागील अनेक वर्षांपासून रसायन अवशेषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यंदा त्यांनी दोन एकरांत सोयाबीनच्या दोन वाणांची ट्रॅक्टरच्या साह्याने लागवड केली.

यापैकी एक एकरात ‘फुले संगम’ वाणापासून ११ क्विंटल, तर ‘९३०५’ या वाणाचे एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळाले. देशमुख हे मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत आहेत. कुठल्याही प्रकारच्या निविष्ठा ते वापरत नाहीत. या वर्षी सोयाबीनचे व्यवस्थापन फक्त एकवेळ डवरणी व एकवेळ निंदण एवढेच केले. शेताचा कर्ब वाढलेला असल्याने रसायनांची आता गरज नसल्याचे ते म्हणाले.

...यामुळे वाढली उत्पादकता

- बहुतांश लागवड बेडवर (यामुळे पावसाच्या खंड काळात ताण सहन झाला)

- बियाण्याचा वापर कमी

- रासायनिक निविष्ठांचा वापर नाही

- सेंद्रिय-जैविक घटकांचा वापर

- पिकाची पाने लुसलुशीत न राहिल्याने पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव तुलनेने कमी

- पीक शेवटपर्यंत हिरवेगार

- उत्पादन खर्चात मोठी बचत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT