Silo Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Silo Management : सायलोमधील धान्य साठवणुकीचे उपाय

Grain Storage Silo Warehouse : सायलोमध्ये जेव्हा धान्य खराब होण्यास चालू होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे धान्य खराब होण्याचा तसेच त्याचा प्रसार होण्याचा वेग मंदावतो.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

Grain Storage Measures : सायलोबीन्समधील अन्नधान्याच्या तापमानात वाढ होणे हे अन्नधान्य खराब होण्याच्या प्रक्रियेचे दिशादर्शक असते. सायलोबीन्स मधील तापमानाची वाढ ही किटकांचे प्रजनन किंवा धान्यातील ओलाव्याचे अतिरिक्त प्रमाणामुळे होते. कीटक शक्यतो सायलोच्या वरच्या भागात असतात.

याकरिता साठविलेल्या अन्नधान्याच्या तापमानाची रोजच्या रोज नोंद ठेवणे आवश्यक असते. ओलाव्याचे प्रमाण जास्त आढळल्यास धान्यातील हवेचे प्रमाण वाढविणे गरजेचे असते.

जर सायलोमध्ये साठविलेल्या अन्नधान्याच्यावरील भागात जास्त कीटकांचे प्रमाण आढळले तर धान्यामध्ये हवेचे प्रमाण वाढविण्यासाठी २० अंश सेल्सिअसपर्यंत तपमान कमी करणे आणि १२ टक्के पर्यन्त ओलाव्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. २० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान, हवेचे प्रमाण आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ७० टक्के पर्यन्त नियंत्रित ठेवल्यास धान्याचे वजन नियंत्रित राहते.

सायलोमध्ये जेव्हा धान्य खराब होण्यास चालू होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते. त्यामुळे धान्य खराब होण्याचा तसेच त्याचा प्रसार होण्याचा वेग मंदावतो. सायलोतील धान्य साठवणुकीत वेगाने तापमान वाढणे अथवा धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण वेगाने वाढणे हा धान्य वेगात खराब होण्याचा दिशादर्शक आहे. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेणे आवश्यक असून, धान्याची उलथापालथ करावी अथवा धान्य खाण्यासाठी वापरण्यात यावे.

योग्य रीतीने धान्याची उलथापालथ करण्यासाठी एक सायलो रिकामा असणे गरजेचे असते. धान्याची उलथापालथ करताना त्यातील धुळीच्या उडण्यामुळे धान्यातील दाण्यांचे तुकडे होऊ शकतात अथवा त्याचे वजन कमी होऊ शकते.

सायलोमधील धान्यामध्ये धुरळणी

सायलोमध्ये धान्य भरताना सुरवातीला कीड सापडत नाही, याकरिता पुढील साठवणुकीच्या काळात कीड लागू नये यासाठी सुरुवातीच्या वेळेसच सायलोमध्ये धान्य भरताना शिफारशीत औषधांची धुरळणी करणे अत्यंत आवश्यक असते. सायलोच्या बाबतीत औषधांच्या धुरळणी व्यतिरिक्त कोणतेही कीटकनाशकाचे उपचार करण्यात येत नाही.

सायलोमध्ये औषधांची धुरळणी करताना कोणीही सायलोमध्ये प्रवेश करू नये. धुरळणी करण्यात येत असलेल्या औषधांची हाताळणी काळजीपूर्वक करावी. हे कामकाज एकाच वेळेस दोन व्यक्तींनी करणे गरजेचे असते. सायलोमध्ये औषधांची धुरळणी अथवा सायलोमध्ये हवा सोडण्याची प्रक्रिया ढगाळ वातावरण किंवा आर्द्रता असताना बिलकूल करू नये.

मार्गदर्शक सूचना

धान्य साठवणुकीपूर्वी सायलो स्वच्छ असल्याची खात्री करावी. त्याचे निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. सायलोला छिद्र असल्यास ते बंद करावे. सायलोचे संपूर्ण स्टील आतल्या बाजूने गंजविरहित असावे.

सायलोमध्ये ओलाव्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असून हा अत्यंत महत्त्वाचा साठवणुकीचा भाग आहे. सायलोत साठविण्यात येणाऱ्या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्यांपेक्षा जास्त नसावे. प्रत्यक्ष साठवणुकीच्या वेळेस हेच प्रमाण किमान ११ ते १२ टक्के अथवा त्याहून कमी असावे. भात साठवणुकीच्या वेळेस त्यातील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

औषधांच्या धुरळणीच्या बाबतीत सायलोमध्ये धान्य साठविताना व चढविताना जिवंत कीड असो वा नसो कन्व्हेअरमध्ये योग्य प्रमाणात औषधांचा वायू तयार करणाऱ्या गोळ्या ठेवणे आवश्यक असते, जेणेकरून सायलो बिन्समध्ये धान्य साठविताना योग्य प्रकारे औषध संपूर्ण धान्यापर्यंत पोहोचून किडीचा नाश होण्यास मदत होते.

सायलोमध्ये धान्य भरताना ओले धान्य साठवणुकीत येत नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. फक्त वाळलेले, थंड व योग्य ओलाव्याचे प्रमाण असलेले धान्य साठविले जाईल याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक पंधरा दिवसांनी व महिन्याने तज्ञ व्यक्तिमार्फत साठवणूक करण्यात येणाऱ्या धान्याची तपासणी करावी. या तपासणीत धान्यातील ओलाव्याचे प्रमाण, धान्याची तापमान वाढ, सायलोतील ओलाव्याचे योग्य प्रमाण व किडीचे प्रमाण पाहणे आवश्यक आहे. वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रक अधिकाऱ्याने वेळोवेळी धान्याची तपासणी करून तपासणी अहवाल मंजूर नमुन्यात वरिष्ठ कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

सायलोमध्ये जास्तीत जास्त धान्य भरल्यानंतर वरील भागात कमीतकमी जागा ठेवावी.

सायलोबिन्समध्ये दिवस आणि रात्रीतील तापमानात होणाऱ्या बदलामुळे धान्यातील ओलावा एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करताना धान्याच्या गोळ्या होण्याची संभावना असते. सायलोबिन्समधील धान्याच्या थंड भागातील ओलाव्याचे द्रव पदार्थात रूपांतर होताना धान्य व जीवजंतूंच्या श्वसनामुळे अंतर्गत भागात तापमानात वाढ होते. अशावेळेस वेळोवेळी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण तपासणे आवश्यक असते.

धान्यात एका जागेवर जमा झालेला ओलावा कमी करण्यासाठी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढविणे आणि यांत्रिक पद्धतीने हवेचा धान्यातील संचार वाढविण्याच्या उपाययोजना कराव्यात. सापेक्ष आर्द्रता ७० टक्के पेक्षा कमी ठेवल्याने धान्यात कोरडेपणा टिकून राहतो.

सायलोबिन्समधील विविध स्तरांवरील अंतर्गत तापमान वाचक यंत्रणेच्या माध्यमातून सायलोच्यावरील, मध्य व खालील स्तरावरील तसेच इतर भागातील तापमानाची नोंद घेतली जाते. अशाप्रकारची यंत्रणा उपलब्ध नसेल तर थर्मोसॅम्पलरद्वारे धान्याच्या विविध भागांचे तापमान घेतले जाते. सायलोच्या आतील भागातील सापेक्ष आर्द्रतेची नोंद हायग्रोमीटरद्वारे घेतली जाते. सायलोमधील धान्य आणि बाहेरील वातावरण यातील तापमानातील फरक ५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर तत्काळ धान्यातील वातावरण हवेशीर ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात. सायलोबिन्समध्ये डीह्यूमिडीफायर जर हवा पुरविणाऱ्या यंत्रणेस जोडलेला असेल तर सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास या यंत्रणेचा उपयोग करावा. मिलिंग झालेल्या भाताची नमुना चाचणी घेतल्यानंतर सापेक्ष आर्द्रतेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डीह्यूमिडीफायरचा उपयोग केला जातो.

धान्य भरण्यापूर्वी सायलोबिन्स व्यवस्थित प्रमाणित औषधाने निर्जंतुक न केल्यास साठविण्यात येणाऱ्या धान्यात कीटक किंवा बुरशी यांचे विविध भागात प्रमाण वाढत जाण्याची शक्यता असते. सायलोमधील अशी बाधित ठिकाणे शोधण्यासाठी कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात कीकडशोधक अथवा बुरशीशोधक सेन्सर्स यंत्रणा बसविलेली असते. या यंत्रणेतील अहवालानुसार किडीचा प्रकार व किडीची तीव्रता यानुसार सायलोमधील किडीच्या ठिकाणावर प्रमाणित औषधांचा प्रमाणित मात्रा मोठ्या लांबीच्या पंपाने वापरण्यात येते.

सायलोतील अन्नधान्यात असणाऱ्या किडीचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी संपूर्ण धान्यसाठा एका सायलोमधून दुसऱ्या सायलोमध्ये भरावा. पहिल्या सायलोमध्ये औषधांची प्रक्रिया करावी. तसेच धान्यासाठी औषधांचा वापर करावा. सायलोमध्ये धान्य भरताना धान्य उचलणाऱ्या कन्व्हेअरच्या प्रत्येक बादलीमध्ये गॅस तयार करणाऱ्या औषधांच्या गोळ्या टाकाव्यात म्हणजे संपूर्ण सायलोमध्ये व्यवस्थित औषधे योग्य प्रमाणात सर्वत्र पसरली जातात.

सायलोमधील धान्याचे आग, कीड, बुरशीपासून संरक्षण

कन्व्हेअर आणि एलेव्हेटर (सायलोमध्ये धान्य भरणारी यंत्रणा) कामकाज चालू असताना सायलोमधील धूळ नियंत्रण करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असावी. अशा वेळेस धूर निर्माण होऊ न देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आगीचा धोका टाळता येईल.

सायलोच्या यातील भागातील मोकळी जागा प्रत्येक पंधरा दिवसांनी स्वच्छ करावी.

सायलोमध्ये तपासणी आणि उपाययोजना करण्याकरिता प्रवेश करताना सायलोमध्ये हवेशीर वातावरण निर्माण करावे, जेणेकरून धान्य आणि औषधांच्या धुरळणीमुळे जमा झालेला वायू बाहेर पडण्यास मदत होईल. सायलोच्या सर्व खिडक्या आणि दारे सायलोत प्रवेश करताना उघडी ठेवावीत.

सायलोतील धान्याचे तापमान सर्व हंगामात किमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असावे. बुरशी आणि कीडनियंत्रण करावे.

सायलोमध्ये प्रवेश करताना सर्व सावधगिरीचे उपाय करावेत. हातमोजे घालावेत, नाकाला मास्क लावावा.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT