Silo Management : धान्य साठविण्यासाठी सायलो व्यवस्थापन

Grain Storage Silo Warehouse : भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ इत्यादी यंत्रणांच्या माध्यमातून सायलो उभारणी करण्यात आली आहे.
Silo Management
Silo ManagementAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Technical Knowledge about Silo Management : शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच महिला बचत गटांचे फेडरेशन आणि शेतकरी कंपन्यांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्था व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करीत आहेत. काही संस्थांनी जागतिक बँक अर्थसहाय्यीत स्मार्ट आणि पोकरा प्रकल्पातून तसेच एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्पातून गोदाम व शीतगृह उभारणी केली आहे. तसेच काही संस्था सायलो उभारणीसाठी प्रयत्न करीत आहेत.

सायलो या साठवणूक व्यवस्थेतबाबत खासगी क्षेत्राला माहिती आहे, परंतु शेतकरी आणि त्यांच्याशी निगडित यंत्रणेकडे सायलोच्या उपयोगाबाबत माहितीचा अभाव आहे. मागील तीन भागांमधून आपण सायलो विषयक माहिती घेत आहोत. भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ इत्यादी यंत्रणांच्या माध्यमातून सायलो उभारणी करण्यात आली आहे. परंतु या यंत्रणांशी संलग्न होऊन समुदाय आधारित संस्थांनी काम करावयास सुरवात केल्यास त्यांना व्यवसाय उभारण्यास मदत होऊ शकते.

साठवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, त्या ठिकाणी पारंपारिक गोदाम उभारणीपेक्षा सायलो उभारणी केव्हाही फायदेशीर ठरू शकते. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन साठवण्यासाठी सायलोचा वापर कृषी क्षेत्रात केला जातो.

तसेच सिमेंट, कार्बन किंवा प्लॅस्टिक संबंधित उत्पादने, इत्यादी सामग्री साठविण्यासाठी सायलो वापरले जाऊ शकतात. सायलो शक्यतो दंडगोलाकार आकारात व धातूच्या साहाय्याने बनविण्यात येतात, तथापि, ते आयताकृती आणि चौरस आकारामध्ये देखील तयार केले जातात. लाकूड, धातू, स्टेनलेस स्टील, काँक्रिट, फायबरग्लासचा वापर करून सायलो बांधले जातात.

Silo Management
Silo Construction : सायलो उभारणीसाठी मॉडेल

टॉवर सायलो

टॉवर सायलो हा शेतातील सायलोचा वापर होणारा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे सायलो शक्यतो लाकूड, सिमेंट, काँक्रिट आणि स्टीलसह इतर सामग्रीच्या माध्यमातून बांधले जातात.

धान्य, आंबलेले खाद्य, सिमेंट, स्लरी आणि वुडचिप्स साठविण्यासाठी टॉवर सायलोचा वापर करतात.

टॉवर सायलो ट्रक किंवा रेल्वे गाडीमध्येही उतरवता येतात.

शेतकरी टॉवर सायलोमध्ये धान्य साठविणे पसंत करतात कारण त्यांची साठवणूक क्षमता कमी असते.

मोठ्या क्षमतेचे टॉवर सायलो खासगी संस्था, प्रक्रिया उद्योग, अन्न महामंडळ आणि वखार महामंडळ यांच्यामार्फत उभारण्यात येतात.

टॉवर सायलोचे अ) हॉपर बॉटम सायलो ब) फ्लॅट बॉटम सायलो असे दोन प्रकार आहेत. यासोबत ओपन टॉप सायलो, ऑक्सिजन लिमिट सायलो, उभे सायलो, आडवे सायलो, ट्रेन्च सायलो, स्टॅक सायलो असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

बंकर सायलो

बंकर सायलो हे जमिनीखाली बांधलेले असून ते खंदक स्वरूपात असतात.

हे सायलो ट्रॅक्टर आणि लोडरचा वापर करून भरण्यात येतात.

बंकर सायलो काँक्रिटपासून बनवले जातात आणि वरून झाकण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. क्षेपणास्त्र ठेवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी लष्करामध्ये बंकर सायलोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

मोठे शेतकरी बंकर सायलो बांधतात, कारण जलदपणे धान्य भरणे व काढणे करू शकतात, मोठ्या क्षमतेने धान्य साठवू शकतात. हे सायलो पारंपरिक शेती उपकरणे वापरून भरता येतात.

Silo Management
Silo Construction : अन्नधान्य साठवणुकीसाठी सायलो उभारणी

बॅग सायलो

बॅग सायलो म्हणजे प्लास्टिक आणि हर्मेटिक पिशव्या किंवा नळ्या ज्या शेतात धान्य आणि चारा साठवण्यासाठी वापरल्या जातात.

बॅग सायलो यंत्र वापरून अत्यंत जड आणि एकसंध केलेले असतात. तसेच ते दोन्ही टोकांना सील केलेले असतात. बॅग सायलोसाठी कमी भांडवली गुंतवणूक, साठवणुकीसाठी जागा आणि काही प्रमाणात सुरक्षितता याची आवश्यकता असते. हे तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आवश्यक आहेत परंतु त्यामध्ये धान्य साठविण्यात मोठा धोका असू शकतो, कारण पिशवी फाटल्यास मोठे नुकसान होते.

सायलेज पाइल्स

हे सायलो कमी खर्चिक असून कमी कालावधीच्या साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त असतात.

सायलोमधील धान्य सुरक्षितता आणि गुण नियंत्रण

सायलोची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. स्वच्छता, पाण्याच्या गळतीची तपासणी, जागेचे निर्जंतुकीकरण या सर्व प्रक्रिया सायलोमध्ये पारंपरिक गोदामाप्रमाणेच राबविल्या जातात. पाण्याच्या गळतीबरोबरच सायलोची अंतर्गत व बाहेरील भागाची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. सायलो आणि यंत्रांच्या भेगांमध्ये धान्य साठून राहिले तर त्या धान्यामुळे सुद्धा किटकांचा प्रसार होऊन धान्य खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे मोकळ्या सायलोची काळजीपूर्वक तपासणी, स्वच्छता आणि योग्य औषधांनी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते.

काढणी केलेल्या शेतमालाची सायलोबिन्समध्ये साठवणूक केली जाते. पारंपरिक साठवणुकीच्या बाबतीत गोदामात संपूर्णपणे साठवणूक केलेल्या शेतमालाची तपासणी केली जाते, परंतु सायलोबीन्सच्या बाबतीत फक्त एक सायलोबीन्स हा एक घटक गृहीत धरून त्यातील शेतमालाची तपासणी केली जाते.

सायलोबीन्समध्ये संपूर्ण सायलोबीन्स हे एक साठवणुकीचे युनिट असते. यामुळे शेतमाल साठवणुकीची आकडेवारी ही सायलो बीन्सनुसार ठरविली जाते. जेव्हा सायलोबीन्स अन्नधान्याने संपूर्ण क्षमतेने भरले जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने सायलोबीन्सची साठवणूक व्यवहार्य असते.

ज्यावेळेला सायलोबीन्स पूर्ण क्षमतेने भरले असेल अथवा संपूर्ण मोकळे असेल त्यावेळेस त्यात कोणीही व्यक्तीने उतरणे धोकादायक असते. यामुळे सायलोबीन्समध्ये उतरणाऱ्या व्यक्ति एकतर त्यात गुदमरून मरण्याची शक्यता असते किंवा सायलोबीन्समधील अन्नधान्यात बुडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत व्यक्ति वाचण्याची शक्यता अत्यंत नगण्य असते.

जेव्हा सायलोबीन्समध्ये अन्नधान्य भरले जाते तेव्हा त्यात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. जर या भागात आगीचा प्रादुर्भाव झाला तर मोठा स्फोट होऊन नुकसान होऊ शकते. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सायलोबीन्सच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान करण्यास मनाई आहे. आगपेटी किंवा लायटर बाळगण्यास मनाई असते. आगरोधक साधनांचा आग विझविण्यासाठी उपयोग होऊ शकतो परंतु अशावेळेस आगरोधक साधने सुस्थितीत असणे आवश्यक असते.

सायलोमध्ये साठवणूक करण्यात आलेले धान्य बऱ्याच कालावधीपर्यंत कोणतीही हाताळणी न करता साठविण्यात आलेले असते. सायलोमधील कामकाज शक्यतो दोन व्यक्तींमार्फत करणे अपेक्षित आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नसते. जर सायलोबीन्स वेळोवेळी उघडले नाही तर सायलोच्या वरच्या भागात कार्बन-डायऑक्साइडचे प्रमाण वाढत जाते. यामुळे सायलोबीन्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही वेळ सायलोबीन्स उघडे ठेवणे आवश्यक आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com