
Amaravati News : राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत. त्याकरिता एका समितीचे गठण करण्यात आले आहे. मात्र या पुढील काळात शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही, याकरिता शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटीरणावर राज्य सरकारने भर दिला असून त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भुमिपूजन रविवारी (ता. ३) श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, कुलगुरू डॉ. नितीन पाटील, मत्स्य व्यवसाय सचिव रामासामी, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, सौम्या शर्मा यांच्यासह मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शासनाने शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाचा पर्याय दिला. यात मासेमारी करीत अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत अनेकांनी तयार केला. मासेमारी व्यवसाय अशाप्रकारे फायद्याचा ठरत असल्यानेच शासनाने या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शेतीसाठीच्या सवलती आता मासेमारी क्षेत्रालाही उपलब्ध होतील. त्यामध्ये सवलतीच्या दरात कर्ज व इतर अनुदानात्मक योजनांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने सातत्याने शेती विकासाला प्राधान्य दिले असून, यातूनच वैनगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २०२५ च्या अखेरीस या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल.’’ केंद्राने नीलक्रांतीची गरज लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता केली आहे. सध्या गोड्या पाण्यातील मासेमारीत आंध्र प्रदेशची आघाडी आहे. महाराष्ट्रात देखील तलाव, नद्या आणि समुद्राचा पर्याय मासेमाकरिता उपलब्ध आहे. यातून मत्स्य व्यवसायाला चालना देत महाराष्ट्र देखील या क्षेत्रात आघाडी घेईल, असेही ते म्हणाले.
सध्या देशात गोड्या पाण्यातील मासेमारीत महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावर आहे. २०२९ पर्यंत राज्य पहिल्या पाचमध्ये असेल, असा विश्वास मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. मोर्शी येथे प्रस्तावित हे महाविद्यालय ४.८ हेक्टरवर उभारले जाणार असून याकरिता २०२ कोटींची तरतूद केली आहे. येत्या दोन वर्षांत हे महाविद्यालय पूर्ण होईल व ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता यात आहे. या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एआय ईन फिशरी सायन्स’ हा नावीन्यपूर्ण विषय येथे शिकविला जाणार असल्याचे श्री. राणे म्हणाले.
गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी ः बावनकुळे
राज्यातील बड्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मोठमोठे फार्म हाउस उभारले आहेत. त्याकरिता अधिक कर्जाची उचल त्यांच्याद्वारे करण्यात आली. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये, तो केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. त्यातूनच कर्जमाफीसाठी समितीचे गठण करण्यात आले आहे. ही समिती निश्चितच गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.