Grain Storage Silo Warehouse : सायलोमध्ये अन्नधान्याची सुरक्षित साठवणूक

Silo Warehouse : ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, त्या ठिकाणी पारंपरिक गोदाम उभारणीपेक्षा सायलो उभारणी फायदेशीर ठरली आहे. सायलोची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते.
Silo Warehouse
Silo WarehouseAgrowon

Safe Storage of Food Grains : भारतीय अन्न महामंडळासोबतच केंद्रीय वखार महामंडळ, राज्य शासन, राज्य वखार महामंडळ व जागतिक बँक अर्थ साह्यित स्मार्ट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने सायलो उभारणीचा निर्णय अन्नधान्य व उपलब्ध जागेच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने घेतला. त्यानुसार देशात स्मार्ट प्रकल्पासह साठवणूक उद्योगाशी निगडित सर्व संस्था सायलो उभारणीच्या विषयात जागरूक झाल्या आहेत.

त्याची अंमलबजावणी करू लागल्या आहेत. सायलो, गोदाम व त्यासोबतच इतर साठवणुकीच्या प्रकारांतील व्यवस्थापनाच्यादृष्टीने पूरक सुविधेचा उपयोग पाहून त्यानुसार देशपातळीवर गरजेनुसार व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून साठवणुकीशी निगडित पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सायलो उभारणीबाबत संपूर्ण भारतात अन्नधान्य साठवणुकीचे नियोजन करताना भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ व राज्यशासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या साठवणूक सुविधा या तीन स्तरावर सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सायलो उभारणीचा कालावधी ठरविण्यात आला.

साठवणूक क्षमतेचे आधुनिकीकरण व शेतीमालाची साठवणूक क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अन्नधान्य वर्ष २००५ मध्ये एक पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्रीय वखार महामंडळाने (FCI) पुढाकार घेतला होता. त्यानुसार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर ५.५ लाख मेट्रिक टन क्षमतेचे स्टील सायलो बांधण्यात आले होते.

Silo Warehouse
Silo Construction : अन्नधान्य साठवणुकीसाठी सायलो उभारणी

खासगी गुंतवणूकदाराद्वारे चालविले जाणारे सायलो

राज्य ठिकाण क्षमता (लाख टन)

पंजाब मोगा २.००

तमिळनाडू चेन्नई ०.२५

तमिळनाडू कोइमतूर ०.२५

कर्नाटक बंगळूर ०.२५

हरियाना कैथल २.००

महाराष्ट्र नवी मुंबई ०.५०

पश्‍चिम बंगाल हुगळी ०.२५

एकूण ५.५०

२०१५ मध्ये उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष शांताकुमार यांनी दिलेल्या शिफारशीनुसार देशभरात १०० लाख टन क्षमतेचे स्टील सायलो सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याच्या सूचनेस केंद्र शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. सायलो उभारणीचा भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), केंद्रीय वखार महामंडळ (सीडब्ल्यूसी) व राज्य शासन यांना पुढीलप्रमाणे १०० लाख टनांचा लक्ष्यांक देण्यात आला होता.

अन्नधान्य साठवणुकीचा लक्ष्यांक (लाख टन)

शेतीमाल/संस्था एफसी-

आय सीड-ब्ल्यूसी राज्य सरकार एकूण

गहू २७.७५ २.५० ६१.०० ९१.२५

तांदूळ १.२५ ० ७.५० ८.७५

एकूण २९.०० २.५० ६८.५० १००.००

देशभरात सायलो उभारणी

भारतीय अन्न महामंडळामार्फत २९ लाख टन क्षमतेच्या सायलो उभारणीसाठी ५९ ठिकाणांसाठी निविदा मागविण्यात आल्या. ३१ मार्च २०२४ अखेर एकूण लक्ष्यांकांपैकी १८ ठिकाणी ९.२५ लाख मेट्रिक क्षमतेची सायलो उभारणी पूर्ण झाली आहे. अन्नधान्य साठवणुकीसाठी सायलोचा वापर सुरू करण्यात आला आहे. तसेच १४ ठिकाणी ७ लाख मेट्रिक क्षमतेची सायलो उभारणी पूर्ण होत आली आहे. उर्वरित २७ ठिकाणी १३.२५ लाख टन क्षमतेची सायलो उभारणी रद्दबातल/ पुरवठा आदेश माघारी घेणे/ निविदा रद्द या कारणांमुळे रद्द करण्यात आली.

केंद्रीय वखार महामंडळाचा २.५ लाख टन लक्ष्यांक व राज्य सरकारांना प्राप्त सायलो उभारणी लक्ष्यांक ६८.५० लाख टन यापैकी ६ लाख टन क्षमतेच्या सायलोची १२ ठिकाणी उभारणी पूर्ण झाली आहे. ३ ठिकाणी १.५ लाख टन क्षमतेची सायलो उभारणी प्रक्रियेत आहे.

३१ मार्च २०२४ अखेर संपूर्ण १०० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या सायलो उभारणीचा विचार केला, तर भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ व राज्य शासन या तीनही संस्थांची १५.२५ लाख मेट्रिक टन क्षमतेची सायलो उभारणी पूर्ण झाली आहे. ८.५० लाख मेट्रिक टन सायलो उभारणी प्रक्रियेत आहे. यासोबतच भारतीय अन्न महामंडळाने हब आणि स्पोक मॉडेलचा उपयोग करून नव्याने आणखी १११.१२५ लाख मेट्रिक टन क्षमतेच्या सायलोची उभारणी करण्याचे ठरविले आहे.

Silo Warehouse
Grain Storage Silo Technology : पोतेविरहित धान्य साठवणुकीसाठी सायलो तंत्रज्ञान

हब आणि स्पोक मॉडेल

भारतीय अन्न महामंडळाने सायलो उभारणीकरिता हब आणि स्पोक मॉडेलचा उपयोग करण्याचे ठरविले. सायलो उभारणीकरिता करताना रेल्वे सायडिंगसाठी भूसंपादनासारख्या अनेक समस्या असल्याने, यापूर्वी प्रस्तावित केलेल्या रेल्वे सायडिंग सायलोच्या विकासाची गती मंदावली होती.

अ) शेतीमालाच्या अन्नधान्याची रेल्वे स्टेशनच्या बाजूला सायलो उभारणी करून सायलो आणि रेल्वे स्लायडिंगच्या साह्याने अन्नधान्य पुरवठा साखळी नियंत्रित करणे.

ब) शेतीमालाच्या अन्नधान्याची रस्त्याच्याकडेला सायलो उभारणी करून सायलो व कंटेनरच्या साह्याने अन्नधान्य पुरवठा साखळी नियंत्रित करणे.

दोन प्रकारच्या सायलो उभारणीतून कोणत्या माध्यमातून शाश्‍वत व्यवसायाची उभारणी होऊ शकते? या विषयाचा अभ्यास करण्यासाठी व व्यवहार्यता तपासण्यासाठी मेसर्स राइट्स संस्थेची नेमणूक करण्यात आली. यानंतर प्राप्त निरीक्षणांचा अभ्यास करून भारतीय अन्न महामंडळाद्वारे प्रस्तावित हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत सायलोचे बांधकाम करण्यासाठी मान्यता देण्यात आली. प्रत्येक राज्यातील अन्नधान्य साठवणूक क्षमता, शेतीमालाचे उत्पादन व साठवणुकीची गरज तसेच प्रत्येक राज्याच्या राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार भारतीय अन्न महामंडळाने १२ राज्यांत २४९ ठिकाणी १११.१२५ लाख मेट्रिक टन क्षमतेचे सायलो विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळामार्फत हब आणि स्पोक मॉडेलद्वारे उभारण्यात येणाऱ्या २४९ सायलो उभारणीच्या निविदा काढण्यात आल्या असून, सायलो उभारणीची प्रक्रिया सर्वत्र योग्य रीतीने सुरू आहे.

राज्यनिहाय सायलो उभारणी

राज्य सायलो (संख्या) क्षमता (लाख टन)

पंजाब ४७ १९.५

हरियाना ३७ ११

मध्य प्रदेश १० ४.२५

उत्तर प्रदेश ४३ १९.७५

राजस्थान २१ १०.५

महाराष्ट्र २३ १३.२५

बिहार २५ १३

पश्‍चिम बंगाल १८ ८.७५

गुजरात १९ ८.८७५

जम्मू- काश्मीर २ १.२५

उत्तराखंड २ ०.५

केरळ २ ०.५

एकूण २४९ १११.१२५

सायलोमधील धान्याची सुरक्षितता

ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, त्या ठिकाणी पारंपरिक गोदाम उभारणीपेक्षा सायलो उभारणी फायदेशीर ठरू शकते.

सायलोची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. स्वच्छता, पाण्याच्या गळतीबाबतची तपासणी, जागेचे निर्जंतुकीकरण या सर्व प्रक्रिया सायलोमध्ये पारंपरिक गोदामाप्रमाणेच राबविल्या जातात. पाण्याच्या गळतीबरोबरच सायलोची अंतर्गत व बाहेरील भागाची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असून, सायलोमध्ये धान्य साठून राहिले तर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे मोकळ्या सायलोची काळजीपूर्वक तपासणी, स्वच्छता, व योग्य औषधांनी निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे असते.

काढणी केलेल्या शेतीमालाची सायलोमध्ये साठवणूक केली जाते. पारंपरिक साठवणुकीच्या बाबतीत गोदामात संपूर्णपणे साठवणूक केलेल्या शेतीमालाची तपासणी केली जाते, परंतु एक सायलोबीन्स हा एक घटक गृहीत धरून त्यातील शेतीमालाची तपासणी केली जाते.

संपूर्ण सायलोबीन्स हे एक साठवणुकीचे युनिट असते. यामुळे शेतीमाल साठवणुकीची आकडेवारी ही सायलो बीन्सनुसार केली जाते. जेव्हा सायलोबीन्स अन्नधान्याने संपूर्ण क्षमतेने भरले जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने सायलोबीन्सची साठवणूक ही व्यवहार्य असते असे मानले जाते. ज्या वेळेला सायलोबीन्स पूर्ण क्षमतेने भरले असेल अथवा संपूर्ण मोकळे असेल त्या वेळेस त्यात कोणीही व्यक्तीने उतरणे धोकादायक असते. यामुळे सायलोबीन्समध्ये उतरणाऱ्या व्यक्ती एकतर त्यात गुदमरून मरण्याची शक्यता असते किंवा सायलोबीन्समधील अन्नधान्यात व्यक्ती बुडण्याची शक्यता असते.

जेव्हा सायलोबीन्समध्ये अन्नधान्य भरले जाते तेव्हा त्यात धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असते. जर या भागात आगीचा प्रादुर्भाव झाला तर मोठा स्फोट होऊन नुकसान होऊ शकते. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सायलोबीन्सच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान करण्यास मनाई असते, तसेच आगपेटी अथवा लायटर बाळगण्यास मनाई असते. आगरोधक साधनांचा आग विझविण्यासाठी उपयोग होऊ शकतो, परंतु अशावेळेस आगरोधक साधने सुस्थितीत असणे आवश्यक असते.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com