Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation: ट्रॅक्टरचलित यंत्राने हळद लागवडीवर भर

Turmeric Farming: नांदेडच्या वडेपुरी येथील संभाजी काळेवाड यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करून यांत्रिकीकरणाच्या मदतीने हळद लागवडीमध्ये क्रांती घडवली आहे. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे वेळ, श्रम आणि खर्चात बचत करून उत्पादन व दर्जा वाढविण्याचा त्यांचा प्रयोग इतरांसाठी आदर्श ठरत आहे.

कृष्णा जोमेगावकर

Turmeric Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : हळद

शेतकरी : संभाजी रामचंद्र काळेवाड

गाव : वडेपुरी ता. लोहा, जि. नांदेड.

एकूण क्षेत्र : चाळीस एकर

हळद लागवड : आठ एकर

नांदेड जिल्ह्यातील वडेपुरी (ता. लोहा) शिवारात संभाजी रामचंद्र काळेवाड यांच्या एकत्रित कुटुंबाची चाळी एकर जमीन आहे. त्यात आठ एकरांवर हळद लागवड, तर उर्वरित ८ एकरांत कापूस, ४ एकर भाजीपाला आणि २० एकर सोयाबीन लागवड आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने हळद लागवड केली जात असे. त्यात संभाजी काळेवाड यांनी २००८ पासून बदल करून बेडवर लागवड करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पीक व्यवस्थापन करणे अधिक सोईचे झाले आहे. योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे हळद गड्डे चांगले पोसण्यास मदत होते. शिवाय हळदीचा दर्जा उत्तम मिळण्यास मदत होते. हळद लागवडीमध्ये मागील काही वर्षांत ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे बेणे लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मजुरी खर्चासह वेळेत बचत होते. यावर्षी ३ एकरांतील लागवड ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे, तर उर्वरित लागवड मजुरांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे.

लागवड नियोजन

या वर्षी सुमारे आठ एकरांत हळद लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार १० जून ते १५ जून दरम्यान लागवड करण्यात आली. लागवडीपूर्वी दोन महिने अगोदर ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची खोल नांगरणी केली.

चांगले कुजलेले शेणखत एकरी चार ते पाच ट्रॉली प्रमाणे शेतात मिसळून पुन्हा रोटाव्हेटर फिरविण्यात आला.

लागवडीसाठी चार फूट अंतरावर बेड तयार करण्यात आले. बेडवर दोन ओळींत सहा इंच, तर दोन बेण्यात चार इंच अंतर राखत लागवड केली.

संपूर्ण क्षेत्रात लागवडीसाठी सेलम जातीची निवड करण्यात आली आहे.

साधारण ३ एकरांतील लागवड ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे करण्यात आली. तर उर्वरित क्षेत्रातील लागवड मजुरांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे.

लागवडीसाठी एकरी सात क्विंटल बेणे वापरले आहे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

हळद पिकामध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार शिफारशीत रासायनिक घटकांचा पुरवठा करण्यावर भर असतो. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन गड्डे अधिक चांगले पोसले जातात.

लागवडीपूर्वी बेण्यास शिफारशीत बुरशीनाशक व रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया करण्यात आली.

बेसल डोसमध्ये डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड यांच्या प्रति एकर मात्रा देण्यात आल्या.

लागवडीनंतर साधारण ३० आणि ६० दिवसांनी पिकास निंबोळी पेंड, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया खताची मात्रा दिली जाईल.

लागवडीनंतर ४५ दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट आणि १९:१९:१९ या खताची मात्रा दिली जाईल.

लागवडीनंतर १२० दिवसांनी ०:५२:३४ हे विद्राव्य खत २५ किलो दिले जाते. हे

०:०:५० या विद्राव्य खताची मात्रा तीन समान टप्प्यात दिली जाते.

हळद लागवडीमध्ये पीक संरक्षणावर भर दिला जातो. त्यासाठी पिकांचे प्रत्येक अवस्थेत नियमितपणे निरिक्षण केले जाते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव जाणून त्यानुसार उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. आवश्यकतेनुसार रासायनिक बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाची फवारणी घेतली जाते.

आगामी नियोजन

सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पिकामध्ये आगामी काळात अन्नद्रव्ये आणि पीक व्यवस्थापनावर भर दिला जाईल.

हळद पिकात कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्कतेनुसार शिफारशीत रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

हळद पिकात ओलिताची विशेष काळजी घेतली जाते. कारण, पिकात पावसाचे पाणी साचून राहिल्यास कंदकूज होण्याची शक्यता असते. त्यासाठी आगामी काळात पिकात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल. पिकाची गरज, हवामान व जमिनीचा मगदूर लक्षात घेऊन ओलिताचा कालावधी कमी जास्त केला जाईल.

यांत्रिकीकरणावर भर

हळद पिकामध्ये यांत्रिकीकरणावर भर दिला जातो. लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित हळद लागवड यंत्राचा वापर केला जातो. यंत्राद्वारे ४ फुटांचे बेड तयार करून एकाच वेळी रासायनिक खताची मात्रा दिली जाते. यातून ४ इंच अंतरावर बेणे पडते. यंत्राद्वारे हळद लागवड केवळ दोन व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होते. एका दिवसात दोन व्यक्ती साधारणपणे तीन एकरात हळद लागवड पूर्ण करतात. त्यामुळे लागवडीसाठी मजुरांच्या समस्येवर मात करणे शक्य होते. तसेच कमी वेळेत अधिक क्षेत्रावर लागवड करणे शक्य होत असल्याचे संभाजी काळेवाड यांनी सांगितले.

- संभाजी काळेवाड, ९९६०४९५३६०

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Internation Agri Market: दापचरी येथील जागेसाठी ११ सदस्यीय समिती

Agriculture Department: आकृतिबंध तयार करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Banana Market: केळीच्या आवकेत किंचित वाढ

Crop Insurance: विमा भरपाईचे ४१५ कोटी आठवडाभरात मिळणार

India Shrimp Export: कोळंबी निर्यातीतील अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT