
डॉ. मनोज माळी
Turmeric Farming Technique: हळद पिकांत उत्पन्नाचा मुख्य स्रोत जमिनीत वाढणारा कंद असतो. त्यामुळे लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड महत्त्वाची ठरते. मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन हळद पिकासाठी योग्य असते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही काळ सहन करू शकते. मात्र, जास्त पिकात पाणी साचून राहिल्यास पिकावर विपरित परिणाम दिसून येतात. पाण्याचा निचरा न झाल्यास कंदकुज होण्याची शक्यता असते.
हळद पिकाच्या वाढीसाठी सरासरी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी आवश्यक असते. उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद वाढीसाठी २० ते २५ अंश सेल्सिअस, तर कंद पोसण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. कोरडे व थंड हवामान कंद वाढीस पूरक ठरते. जास्त तापमान असलेल्या भागात तापमानाची तीव्रता कमी झाल्यानंतरच हळद लागवड करावी. अन्यथा, कमाल तापमानामुळे उगवणीवर विपरित परिणाम होतो.
सुधारित वाण :
हळद लागवडीसाठी फुले हरिद्रा, फुले स्वरूपा, सेलम, राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा, वायगाव, आंबे हळद हे सुधारित वाण विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय भारतीय मसाला पिके संशोधन केंद्र, कोझीकोड (केरळ) यांनी सुवर्णा, सुगुणा, सुदर्शना, प्रभा, आयआयएसआर प्रतिभा, आयआयएसआर केदारम हे वाण विकसित केल्या आहेत. तसेच तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईंमबतूर यांच्यामार्फत बीएसआर-१, बीएसआर-२ हे वाण विकसित करण्यात आले आहेत. लागवडीसाठी सुधारित वाणांची निवड महत्त्वाची आहे. कारण, सुधारित वाण हे अधिक उत्पादनक्षम, अधिक उतारा देणारे तसेच कीड-रोग प्रतिकारक असतात. त्यामुळे एकूण उत्पादन दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळण्यास मदत होते.
लागवड पद्धती :
पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीच्या प्रामुख्याने सरी- वरंबा आणि रुंद वरंबा या दोन पद्धती आहेत.
१) सरी - वरंबा पद्धत :
पाटपाणी पद्धतीने सिंचन द्यावयाचे असल्यास सरी- वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवडीसाठी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सरी पाडून घ्यावी. त्यापूर्वी स्फुरद आणि पालाशची मात्रा जमिनीत द्यावी. कारण स्फुरद आणि पालाश खते जमिनीत दिल्यानंतर पिकांस लगेच उपलब्ध होत नाहीत. जमिनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे या प्रमाणे वाकुरी बांधून घ्यावी. वाकुऱ्याची लांबी ही शेताची लांबी आणि जमिनीचा उतार लक्षात घेऊन ५ ते ६ मीटर ठेवावी. सोईप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
सरीच्या दोन्ही बाजूंस ३७.५० बाय ३० सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागवड करावी. गड्डे कुदळीने आगऱ्या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गड्डे खोल लावले गेले, तर उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
२) रुंद वरंबा पद्धत :
ठिबक सिंचन सारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते.
रुंद वरंबा तयार करताना १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. नंतर त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सें. मी. माथा असलेले २० ते ३० सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य लांबी रुंदीचे वरंबे (गादीवाफे) तयार करावेत.
वरंब्याचा माथा सपाट करून त्यानंतर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर बेणे लागवड करावी. लागवडीवेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. एका गादीवाफ्यावर दोन ओळी या प्रमाणे लागवड करावी. या पद्धतीने लागवड करण्यासाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.
लागवड :
लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीस उशीर होईल तसा उत्पादनावर परिणाम होतो. एक हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (म्हणजेच मातृकंद आकाराने त्रिकोणाकृती) बेणे पुरेसे होते. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी जेठे गड्डे वापरावेत. बेणे वजनाने ५० ग्रॅमपेक्षा अधिक, सशक्त, निरोगी, रसरशीत, नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावे. जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील, तर बगल गड्डे (४० ते ५० ग्रॅम वजनाचे) किंवा हळकुंडे (वजनाने ३० ग्रॅमपेक्षा मोठे) बेणे म्हणून वापरावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान (भेसळमुक्त) असावीत. हळकुंडे जमिनीमध्ये समांतर वाढतात. अशावेळी दोन ओळींत शिफारस केल्याप्रमाणे पुरेसे अंतर ठेवावे. लागवड जमिनीच्या समांतर करावी.
लागवडीपूर्वी बेण्यास रासायनिक आणि जैविक बेणेप्रक्रिया अवश्य करावी. प्रथम रासायनिक बेणेप्रक्रिया करून नंतर जैविक बेणेप्रक्रिया करावी. कोणत्याही परिस्थितीत जैविक बेणेप्रक्रिया रासायनिक प्रक्रिये अगोदर करू नये. रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवून नंतर जैविक बीजप्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन :
हळद पिकांस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास उत्पादन वाढीस मदत मिळते. त्यासाठी पूर्वमशागतीवेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३५ ते ४० टन प्रमाणे चांगले मिसळावे. शेणखतामुळे गड्ड्यांची वाढ चांगली होते. पुरेसे शेणखत उपलब्ध नसल्यास, इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर करावा.
हळद पिकास हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी, तर नत्राची मात्रा २ समान हप्त्यांत विभागून द्यावी. नत्राचा पहिला हप्ता (१०० किलो नत्र) लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावे. त्यासोबत फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी १२ किलो द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच १०० किलो नत्र भरणीवेळी (लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावे.
फर्टिगेशन :
रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबकचा वापर करावयाचा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. दोन लॅटरमध्ये ४ ते ५ फूट, तर दोन तोट्यांमध्ये जमिनीच्या प्रतीनुसार ३० ते ४० सें.मी. अंतर ठेवावे.
ठिबक सिंचनामधून पीक वाढीच्या अवस्थेनुसार खते देता येतात. त्यासाठी माती परीक्षण करून विद्राव्य खते वापरावीत. कारण एखादा अन्नघटक शिफारशीत प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक पडला तरी त्याचा परिणाम त्वरित पिकाच्या वाढीवर झालेला दिसून येतो.
फर्टिगेशन करतांना युरिया, फॉस्फोरीक ॲसिड आणि पांढरा पोटॅश किंवा ०:५२:३४, १३:०:४५ व ०:०:५० या विद्राव्य खतांचा वापर करावा.
फर्टिगेशनची सुरुवात लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा ही वेगवेगळी आहे.
पाणी व्यवस्थापन :
हळद पिकास सुरुवातीच्या काळ हा मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्याचा काळ असतो. या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे.
हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. सिंचन कमी पडले तर कंदांची योग्य वाढ होत नाही.
तण नियंत्रण :
लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन (५० डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाठीमागे चालत फवारणी करावी. - तणनाशक फवारणीपूर्वी हळद गड्डे उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. फवारणीनंतर २० ते २५ दिवस आंतरपीक लागवड करू नये.
तणनाशक फवारताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे. हळदीची उगवण झाल्यानंतर (१५ दिवसांनी) कोणतीही तणनाशक फवारणी करू नये.
आंतरपिकांची निवड :
- हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
- तुरीसारख्या पिकांचा वापर सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते.
- आंतरपिके उंचीने तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत.
- हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते.
- आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी.
- हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मका लागवड टाळावी. कारण, मका पिकामुळे हळदीच्या उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.
- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, क. डिग्रज सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.