Rice On Cancer : देशात दैनंदिन आहारात तांदळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तांदळाबद्दल मात्र अनेक गैरसमज आहेत. परंतु आता काही तांदळाच्या प्रकारामध्ये अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचा दावा फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था अर्थात आयआरआरआयने केला आहे.
याबाबतचं संशोधन 'फूड हायड्रोकॉलॉइड्स अँड हेल्थ' या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. भारत आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये मोठ्या आतड्यात आणि मलाशयाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढू लागले आहे. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे या तांदळाला थेट शिजवलं तर सुमारे ७०% कर्करोग प्रतिबंधक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म टिकून राहतात.
या संशोधनामध्ये जगभरातील १ लाख ३२ हजार तांदळाच्या नमुन्यांवर संशोधकांनी अभ्यास केला. त्यामध्ये सहा रंगीत तांदळाच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तांदळाच्या सहाही प्रकारांमध्ये उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळले आहेत. त्यामुळे तांदळाचा वापर मानवी आरोग्यासाठी करता येईल, असा संशोधकांचा दावा आहे.
पुढील काळात तांदळाचे सहा प्रकार कर्करोगावर प्रभावी ठरतील, असा विश्वास आयआरआरआयमधील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नेसे श्रीनिवासुलू यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, "या संशोधनासाठी सुरुवातीला ८०० रंगीत तांदळाच्या प्रकारांची तपासणी केली. ज्या प्रकारांमध्ये मेणबिंदूंचे सखोल विश्लेषण व अँटीऑक्सिडंट गुणधर्म तपासले. तसेच सहा प्रकारांमधून तयार केलेली अर्क वापरुन मोठ्या आतड्याच्या व स्तन कर्करोगाच्या पेशींवर चाचणी घेण्यात आली. या प्रकारांच्या तांदळाचे अर्क कर्करोगाच्या पेशींवर प्रभावी ठरले आहेत. तसेच ८०० पैकी सहा प्रकारांमध्ये अँटीऑक्सिडंटची पातळी ब्लूबेरी आणि चिया सीड्स इतकी जास्त आहे.” असंही श्रीनिवासुलू यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे या तांदळाच्या अर्काने फक्त कर्करोगाच्या पेशींवर परिणाम केला. सध्याच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये निरोगी पेशीदेखील नष्ट होतात. या चाचणीत मात्र निरोगी पेशींवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. ही गोष्ट रासायनिक कर्करोग उपचारांपेक्षा वेगळी आणि सुरक्षित असल्याचं श्रीनिवासुलू म्हणाले. पुढील टप्प्यात या संशोधनाची चाचणी उंदीरावर घेतली जाणार आहेत. उंदरावरील चाचणी यशस्वी झाली तर जीवशास्त्रातील तज्ज्ञासोबत मानवी चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे.
संशोधकांनी निवडलेल्या तांदळाच्या साळीपासून (ब्रान) उपयुक्त घटक काढण्यासाठी सुरक्षित पद्धत वापरली. त्यासाठी इथेनॉलचा वापर केला. हे घटक वेगळे केल्यानंतर त्यांना टिकवण्यासाठी एक खास प्रक्रिया (मायक्रोएन्कॅप्स्युलेशन) केली गेली आणि त्यातून एक पूरक घटक (सप्लिमेंट) तयार करण्यात आला.
प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीत हे पूरक घटक फक्त ७.५ मायक्रोग्रॅम प्रति मिलिलिटर इतक्या कमी मात्रेत दिले असतानाही ते कर्करोग पेशींवर परिणामकारक ठरले. याचा परिणाम काही केमोथेरपी औषधांइतकाच प्रभावी असल्याचं दिसून आलं, असं डॉ. श्रीनिवासुलू यांनी सांगितलं.
३०० ग्रॅम ब्रानपासून साधारण १ किलो पूरक घटक तयार होतात. तसेच इंडोनेशियाचा केतान हिटाम, तसेच फिलिपिन्सचा बलाटिनो, किंटुमान या जातींमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. जेणेकरून त्यातील जनुकीय गुणधर्माचा अधिक उत्पादन देणाऱ्या तांदळाच्या जातींमध्ये करता येईल, असा प्रयत्न आयआरआरआयचे शास्त्रज्ञ करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.