Chandrakant Jadhav Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Journalism: तेव्हापासून ‘अॅग्रोवन’शी बंध जुळले

Journalist Experience in Agrowon: जळगावमधून सुरू झालेला एक पत्रकारितेचा प्रवास ‘अॅग्रोवन’च्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा भाग बनला. या लेखात ‘अॅग्रोवन’शी जुळलेल्या बंधांची आणि शेतकऱ्यांशी संवादाची प्रेरणादायक गोष्ट मांडली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Journalist Chandrakant Jadhav Journey: ‘अॅग्रोवन’ हे नाव मला जळगावात महाविद्यालयीन शिक्षण घेताना ऐकिवात आले. नूतन मराठा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होतो. रोज एसटी बसने जळगावला ये-जा करायचो. गावात कुठलेही वृत्तपत्र येत नव्हते. आमच्या वर्गबंधूंनी जळगावमधील वाचनालयात जाऊन वृत्तपत्र वाचायला मिळतील, असा प्रस्ताव मांडला. साने गुरुजी वाचनालय, व. वा. वाचनालयात मराठी वृत्तपत्र चाळायचो. या वेळी ‘अॅग्रोवन’ हाती आला. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने ‘अॅग्रोवन’ वाचताना आनंद वाटला. अॅग्रोवन वाचण्याची पुढे जणू सवय झाली.

पदवीचे शिक्षण घेतले. पुढे काय करायचे हा प्रश्‍न होता. काही परिचयातले, माझ्या गावाशी संबंधित दोघे पत्रकारितेचे शिक्षण घेऊन दैनिकांत कामाला रुजू झाले होते. आपणही पत्रकारितेचे शिक्षण घ्यावे, असे वाटले. जळगावातील मु. जे. महाविद्यालयात त्यासाठी प्रवेश घेतला. एक वर्ष मु. जे. त पूर्ण केले. पुढच्या वर्षाचे शिक्षण कुठल्याशा कारणाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (आताचे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ) घेतले.

दुसऱ्या वर्षाला प्रत्येक विद्यार्थ्याला शोधप्रबंध सादर करायचा असतो. मिनी पीएचडी किंवा पीएचडीची पूर्वतयारी या शोधप्रबंधास म्हटले जाते. आपल्याला झेपेल आणि त्यावर काम करताना आनंद येईल, असा विषय घेण्याचा माझा विचार सुरू होता. विभागप्रमुखांना त्याबाबत विचारले. त्यांनी परवानगी दिली आणि अॅग्रोवन या विषयावर शोधप्रबंधाचे काम सुरू केले.

त्या वेळच्या ‘अॅग्रोवन’च्या वाचक, शेतकऱ्यांशी संपर्क केला. यासाठी एक प्रश्नावली तयार केली. सर्वेक्षण, चर्चा, निष्कर्ष असे अनेक टप्पे पार केले. यानिमित्ताने ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या जळगावच्या कार्यालयाशी संपर्क आला. जळगावचे अॅग्रोवनमधील तत्कालीन बातमीदार शैलेंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले आणि शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला. त्यात यश मिळाले. तेव्हापासून ‘अॅग्रोवनशी’ बंध जुळले.

पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर मुख्य प्रवाहातील दैनिकांत काम करण्याची संधी मिळाली. सुरवातीला काम करताना एका दैनिकात शेतीचा विषय हाताळण्याची, त्यावर लक्ष देण्याची सूचना मिळाली. मी ते काम आनंदाने केले. शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीचे प्रश्न, त्यातील अडचणी, नफा-तोटा, किडनाशके, खते, हंगाम याची माहिती होती. सुमारे आठ ते १० महिने एका दैनिकात काम केल्यानंतर अन्य दैनिकात कामाची संधी मिळाली. या दैनिकात शेतीविषयक बातम्या, काम सांभाळण्याची जबाबदारी मिळाली.

यानिमित्त जिल्हा परिषदेतील कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात संपर्क वाढला. पण येथेही शेतीविषयक बातम्यांना दुय्यम स्थान असायचे. राजकीय, गुन्हेगारी विषयक बातम्यांना अधिक महत्त्व दिले जायचे. अनेकदा माझ्या शेतीसंबंधीच्या बातम्या कापून, छाटून लावल्या जायच्या. अशा वेळेस हिरमोड व्हायचा. पुढे जावून राजकीय, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ यासंबंधीच्या बातमीदारीची जबाबदारी मिळाली. पण त्यात स्वारस्य, मनमुराद आनंद नव्हता.

पुढे २०१७ मध्ये ‘अॅग्रोवन’मध्ये बातमीदारीसंबंधी  कामाची संधी मिळाली. धुळे, नंदुरबार व जळगाव या तिन्ही जिल्ह्यांत जाण्याची संधी मिळाली, संपर्क तयार झाला. यातून शेतकऱ्यांशी कौटुंबिक संबंध तयार झाले. राजकीय कृषी पत्रकारितेनिमित्त शेतकरी नेते संपर्कात आले. यातील कडूअप्पा पाटलांसारख्या नेत्यांकडून अनेक बाबी शिकायला मिळाल्या. यशोगाथा व अन्य विषयांच्या निमित्ताने ज्या शेतकऱ्यांशी संपर्क आला, त्यातील अनेक शेतकरी मित्र बनले. काही शेतकरी अगदी हक्काचे झाले आहेत. असा अनुभव मेन स्ट्रीम मीडियात काम करताना एकदाही आला नाही.

काही गावांची केळीसह अन्य पिकांत ओळख तयार झाली. अशी गावे पुढे आणण्यात ‘अॅग्रोवन’ने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील केळी, केळी उत्पादक गटाचा विषय यशोगाथेनिमित्त पुढे आणता आला. गावातील शेतकरी पद्माकर जगन्नाथ पाटील यांच्याकडे मागील काही महिन्यांत चार हजार शेतकऱ्यांनी भेट देवून केळीच्या शेतीची माहिती घेतली. अॅग्रोवनमुळेच आम्हाला ही संधी मिळाल्याचे पद्माकर अनेकदा बोलून दाखवितात.

आदर, सत्कारासंबंधी अनेक अनुभव आहेत. त्यातील ताजा अनुभव म्हणजे लोहाऱ्यात (ता.पाचोरा) आमचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण सरांसोबत जाण्याचा योग आला. लोहाऱ्यातील विश्वासरावभाऊ पाटील हे अॅग्रोवन फार्मर. भाऊंनी आदिनाथ चव्हाण सरांसोबत माझाही सत्कार, आदर केला. आदिनाथ चव्हाण सरांचे गावातील माध्यमिक विद्यालयात व्याख्यान घेतले. हा सत्कार ‘अॅग्रोवन’मुळेच मिळाला आणि मिळत आहे, असे कितीतरी चांगले अनुभव आहेत. ते सांगताना शब्द व जागाही अपुरी पडेल...!

: ९८६०५ ४९३२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT