
श्रद्धा चमके
Satisfaction in Marathi Journalism: अनेक वर्षे एखाद्या क्षेत्रात काम करीत असताना, कधी तरी वेगळं काम करण्याची वेळ येते. अशा वेळी सुरुवातीला येणारं अवघडलेपण स्वाभाविक असतं. नैसर्गिक असतं. ‘ॲग्रोवन’चा माझा सुरुवातीचा अनुभव तसाच काहीसा. यापूर्वी मी जे काम केलं ते शहरी जीवनपद्धतीशी संबंधित. तर, ‘ॲग्रोवन’चं काम हे शेती, शेतकरी, ग्रामीण जीवनाशी संबंधित. माझा या जीवनाशी अगदीच काही संबंध नव्हता असंही नाही. यापूर्वी काम करताना ग्रामीण भागाशी संबंधित वार्तांकन केलं, पण ते एखाद-दुसऱ्या बातमीपुरतं. फरक इतकाच की दररोज कृषी विषयक बातमीदारी कधी केली नव्हती. ‘ॲग्रोवन’मध्ये रुजू झाल्यावर इथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना काहीसं दडपण होतं. कारण काम नवीन होतं. सर्व काही नवीन होतं.
मी पत्रकारितेतं काम सुरू केलं ते ‘प्रभात’ या दैनिकापासून. नंतर ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि पुन्हा ‘सकाळ’च्या ‘ॲग्रोवन’साठी. या दैनिकांत काम करताना राजकीय, सांस्कृतिक, महिलांविषयक, शिक्षण अशा विविध विषयांवर मी काम केलं. विविध आवृत्त्यांतही काम केलं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचा नाही म्हटलं तरी अनुभव होताच. मात्र दररोज शेतीशी संबंधित काम नव्हतं केलेलं. पत्रकारितेत तुम्हाला कोणताही विषय वर्ज्य नसतो. प्रत्येक विषयाची थोडी बहुत माहिती असतेच. किंबहुना असावी लागते.
त्याप्रमाणेच मलाही शेतीची माहिती होतीच. त्यात तज्ज्ञ नसले तरी बऱ्यापैकी जाण होती. पुण्यासारख्या ठिकाणी आल्यावर ग्रामीण भागाशी संपर्कात राहणं अवघड असतं, पण हे सगळं जमून आलं ते माझ्या वडिलांमुळे. कारण ते स्वतः ग्रामीण भागातून आले असल्याने त्यांनी शेवटपर्यंत आपली नाळ ग्रामीण भागाशी, शेतीशी जोडून ठेवलेली. ग्रामीण जीवनपद्धतीची माहिती असावी यासाठी आम्हा मुलांबाबत ते आग्रही असायचे. कधी हेतुपुरस्सर, तर कधी सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यात अनेक ग्रामीण शब्द असायचे. ग्रामीण जीवनाची, तिथल्या समस्यांची, प्रत्यक्ष गावी जाऊन तेथील माहिती ते आम्हाला सतत देत असायचे. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी राहूनही मी कृषी जीवनाच्या संपर्कात होते. घरातच असं वातावरण असल्याने नकळत शेतीबद्दल मनात आवड होतीच.
‘ॲग्रोवन’मध्ये आल्यावर काही बातम्या प्रत्यक्ष फिल्डवर (शेतावर) जाऊन करता आल्या. काम करताना त्यातून मिळणारा आनंद हा सर्वांत मोठा असतो. तो आनंदच आपल्याला अधिकाधिक उत्तम काम करण्यास उद्युक्त करीत असतो. पत्रकारितेत एखादी विशेष बातमी किंवा लेख केल्यावर त्यातून मिळणारं समाधान खूप वेगळं असतं. ‘ॲग्रोवन’मध्ये काम करण्यापूर्वी मी अनेक विशेष बातम्या, लेख, मुलाखती केल्या त्याचे समाधान त्या-त्या वेळी मला मिळाले. त्याचा आनंद तेव्हाही वाटला होता. तसेच ‘ॲग्रोवन’मध्येही तीन वर्षांच्या काळात काही बातम्या, लेख करण्याची संधी मिळाली.
मात्र, त्यातून मिळणारं समाधान यापूर्वी केलेल्या बातम्यांपेक्षा निश्चितच कैकपटीनं जास्त आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद इतरांपेक्षा नक्कीच मोठा असतो. शेतीसंबंधी बातमी, शेतकऱ्याची यशोगाथा वृत्तपत्रात छापून आल्यावर त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते. कारण आपली बातमी, लेखाला प्रसिद्धी मिळावी, तो छापून यावा याचा विचारही त्यानं केलेला नसतो. अशा प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या शेतकऱ्याला वाटणारा आनंद माझ्यासाठी नेहमीच आनंददायक असतो.
शेतकऱ्याच्या कार्याची दखल घेताना एक बाब प्रकर्षानं जाणवते, ते म्हणजे तो त्याचा साधेपणा. प्रामाणिकपणा. कुठलाही तामझाम नाही. दुसरे म्हणजे शेतात राबताना कष्ट खूप आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती नाही. मात्र त्यावरचा खर्च निश्चित आहे. अशाही स्थितीत तो तितकाच शांत, समाधानी आहे. तो अन्नदाता असूनही त्याच्याकडे प्रत्येक वेळी होणारं दुर्लक्ष अस्वस्थ करतं. यामुळेच की काय समाजातील या घटकासाठी काम करावसं वाटतं. आज मागे वळून पाहताना ‘ॲग्रोवन’चा प्रवास नक्कीच समाधान देणारा आहे. काम करणे आनंददायी असेल तर त्याचा भार कितीही मोठा असला तरी तो समाधान देणारा असतो. ते समाधान आज ‘ॲग्रोवन’मुळं मिळतयं, हेच इथं सांगावसं वाटतं... !
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.