
Agricultural Reporting: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सन २००० मध्ये दानोळी गावासाठी ‘सकाळ’चा बातमीदार म्हणून काम सुरू केले. ग्रामीण भागातील विषय म्हणजे शेतीशिवाय फारसं काहीच नसायचं. वडील शिक्षक असल्याने घरची शेती भागाने दिलेली होती. भागधारक शेतकरी घराकडे यायचे आणि दररोज सांगायचे, की हे काम आहे, हा रोग पडला आहे, ही खते घालायची आहे, असं हवामान आहे, इतके पाणी लागणार आहे. ते घरी आले, की त्यांच्याशी बोलायचं आणि मग बातमी द्यायची. माझ्या कृषी पत्रकारितेची सुरुवात अशी झाली.
पुढे शिवाजी विद्यापीठात एमजेसी झाल्यानंतर ‘सकाळ’च्या इचलकरंजी कार्यालयात सहायक बातमीदार म्हणून रुजू झालो. तिथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यांच्या शेतीवर लिखाण करायची संधी मिळाली. इचलकरंजीतून पुन्हा जयसिंगपूर बातमीदार म्हणून काम करू लागलो. पुढे २००८ ला ‘ॲग्रोवन’च्या कोल्हापूर विभागाचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन फक्त शेतीविषयक बातम्या द्यायचे हे आव्हान होते. इतर पत्रकारांच्या तुलनेत कमी ग्लॅमर असलेली पत्रकारिता.
अन्य विषयांवर लिखाण करता येत नसल्याने आपला विषय नसलेल्या ठिकाणी जाता येत नाही ही मर्यादा. ज्या ठिकाणी शेतीविषयक घटक आहे त्या ठिकाणी भरपूर आणि सखोल लिहिण्याची संधी. अशा वातावरणात ॲग्रोवनसाठी लिखाण सुरू केले. मुळात ‘सकाळ’साठी लिहिणं आणि ॲग्रोवनसाठी लिहिणं यात कमालीचा फरक जाणवला. आपण शेतकरी केंद्रित लिखाण करायला हवे, हे कळायला काही वेळ जावा लागला. एखादा विषय हाताळताना यात शेतकऱ्याला काय फायदा होणार, असाच पहिला प्रश्न असायचा आणि त्या भोवतालीच लिखाण करावे लागायचे.
बातमी म्हणजे काय, हे माहिती नसलेल्या, शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याला राज्यभर प्रसिद्धी द्यायचं काम माझ्याकडून सुरू होतं. विभागाची जबाबदारी असल्याने शंभर शंभर दीडशे किलोमीटर प्रवास करून शेतकऱ्याच्या शिवारात जायला लागायचं. शेतकरी घाबरायचा, माझ्या शेतीची स्टोरी करण्यासाठी हा पत्रकार एवढ्या लांबून आलाच कसा, त्याच्या दुसऱ्या अपेक्षा आहेत काय? बातमी देण्यासाठी स्वतःच्या खर्चाने एवढ्या लांबून कोणी येतं का, असे प्रश्न बहुतांशी गरीब आणि कधीही कुणाशी संपर्क नसलेल्या शेतकऱ्यांना पडलेले असायचे.
याचाच अर्थ बातमी देण्यासाठी पैसे लागतात ही संकल्पना त्याच्या मनात घट्ट बसलेली. शेतात गेल्यानंतर त्याच्याशी त्याच्या भाषेत बोललं, त्याच्याबरोबरच जमिनीवर बसलं की मात्र तो निवांत व्हायचा. त्याच्याच घरातून आणलेली भाजी, भाकरी खाल्ली की त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसायचं. आपणही त्याच्याच कुटुंबातले आहोत असं जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मनात येत नाही, तोपर्यंत तो तुमच्यात मिसळत नाही, हा माझा आजपर्यंतचा अनुभव. एकदा जर आपल्या बोलण्यातला अकृत्रिमपणा त्याला कळाला की तो खुलून माहिती देतो.
हा संवाद साधण्यासाठी ॲग्रोवनची प्रतिमा खूपच महत्त्वाची ठरली. अगदी माहिती घेतल्यानंतर जाताना अनेक शेतकरी सांगत, ‘साहेब बातमी येऊ द्या नाही तर राहू द्या, पण तुम्ही आमच्यापर्यंत आलात आणि आमची माहिती घेतली हेच खूप महत्त्वाचे आहे.’ हे सांगताना त्याचा चेहरा भावनिक व्हायचा. कधी कधी माहिती घेणे संपल्यावर ही डायरी बंद करून तास-तासभर गप्पा रंगायच्या.
त्यातून त्याच्या आयुष्याची माहिती मिळायची. ही शिदोरी स्टोरी लिहिताना उपयोगी पडायची. केवळ तांत्रिक विषयच महत्त्वाचे नसून कुटुंबातील संवाद, एकमेकांना दिलेले प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे हे त्यातून उमजायचे. विशेषतः जनावरांच्या गोठ्यासारखी स्टोरी करताना आजही मी माहिती देण्यासाठी कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्य समोर असतील याची दक्षता घेतो. त्यांना बोलते करतो. यातूनच कोण किती काम करतो हे समजतं. काम करणाऱ्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यातून साध्य होतो.
जिथे कृषिविषयक विषय आहेत तिथे ॲग्रोवनच्या पत्रकारासाठी एक वेगळा सन्मान आहे. हा अनुभव आजपर्यंतचा आहे. बऱ्याच वेळेला शेतीविषयक कार्यक्रमासाठी पहिल्यांदा ‘ॲग्रोवन’ला निमंत्रण दिले जाते, ही बाब ॲग्रोवने मिळवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे असे वाटते. एका वाचकाचा चंद्रपूरहून फोन आला. त्याने मला पहिलाच प्रश्न विचारला, ‘साहेब, तुम्ही कोणत्या साखर कारखान्यात काम करता?’ मला काही समजेना, हा असा का विचारत आहे?
तर तो म्हणाला, की तुम्ही जी माहिती देता ती नियमित पत्रकाराला समजणे अशक्य आहे. तुम्ही जर दिवसभर कारखान्यात बसून असाल तरच तुम्हाला हे बारकावे समजू शकतात. मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. असे अनुभवही आपल्याला प्रेरित करतात. अनेकदा शेतकरी आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत हे जाणवते. आपल्या बातम्यांमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे दैनिकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी आजही पदोपदी घ्यावी लागते.
ॲग्रोवनच्या वतीने जे कार्यक्रम होतात, त्यामध्ये वरिष्ठांकडून संबंधित बातमीदाराच्या कामाची थेट नावासह दखल घेतली जाते. माझे काम समोरच्या प्रेक्षकांना आवर्जून सांगितले जाते. सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करून बातमीदारांचे मनोबल वाढविण्याची ही पद्धत कदाचित दुसऱ्या दैनिकात नसावी. विशेष म्हणजे इतर दैनिकाच्या पत्रकारितेतील परिस्थिती पाहता ॲग्रोवनच्या न्यूज रूममधली परिस्थिती अतिशय वेगळी आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल.
तिथे फक्त बातम्यांच्या ‘कंटेंट’वरच चर्चा होते. बातमीदाराने कशी बातमी चुकीची लिहिली आहे यावर चर्चा न होता काय अपेक्षित आहे, असे सांगत त्याचा आत्मविश्वास वाढवला जातो. कंटेंटवर चर्चा करत असताना बातमीदाराच्या बातमी मिळविण्याच्या प्रयत्नांना कधीही धक्का पोहोचू दिला जात नाही. मी इतर बऱ्याच पत्रकारांच्या सान्निध्यात असतो, पण त्यांचा दृष्टिकोन व ॲग्रोवनमधील सहकाऱ्यांचा दृष्टिकोन यात कमालीचा फरक असल्याचे जाणवते.
प्रतिकूल लिखाणाबद्दल काही घटकांकडून टीकेलाही सामोरे जावे लागते. पण टीकाकाराला वाईट न ठरवता त्याच्यातील मुद्द्यावर काम करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला. टीका सकारात्मक घेण्याची सवय ॲग्रोवनमुळेच लागली. ॲग्रोवनच्या वीस वर्षांच्या वाटचालीमध्ये सुमारे १७ वर्षांचा कालावधी हा माझा ॲग्रोवनसोबतचा आहे. नियमित पत्रकारितेतून कृषिकेंद्रित पत्रकारितेत जाताना मानसिकतेत अनेक बदल करावे लागले. आपल्या लिखाणामुळे शेतकऱ्यांना काही तरी निश्चित फायदा होतोय त्याचे समाधान ॲग्रोवनसोबत काम करताना कायम आहे.
: ९८८११२९२७०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.