नुकताच आषाढ धो धो कोसळून गेलेला असतो. सृष्टी न्हाऊन निघते. मातीला सृजनाचे डोहाळे लागतात, कवीला कविता सुचू लागते, सगळीकडे फुलण्याचा उत्सव सुरू असतो, पृथ्वीने क्षितिजापर्यंत सर्वत्र गुबगुबीत हिरवी मखमल पांघरलेली असते. झाड-वेलींवर हजारो रंगीबेरंगी फुलं उमलून आलेली असतात. जसा निसर्ग कूस बदलतो तसे आपणही अंतर्बाह्य बदलत असतो. कवी सुधीर मोघे लिहितात, की -
‘‘निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप’’
श्रावण हा उत्सवांचा महिना. मुळात आपले सगळेच उत्सव हे निसर्गस्नेही व निसर्गाप्रति आपली कृतज्ञता व स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी आहेत. आपल्या रोजच्या धकाधकीच्या नीरस जगण्याने निघून आटत चाललेली जीवनमूल्ये पुन्हा रुजविण्यासाठी आपल्या ऋषी-कृषी संस्कृतीने असंख्य उत्सवांची रुजवणूक करून आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. मात्र आपण या उत्सवांमागची भावना किंवा विचार लक्षात न घेता गतानुगतिकपणे केवळ कर्मकांडांचे अंधानुकरण करतो व असे करताना आपल्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतींची आणि या निसर्गाच्या उत्सवांची सरमिसळ करतो. असे करून आपण निसर्गाची, पर्यावरणाची अक्षम्य अशी पायमल्ली करतो आहोत. पूर्वी उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य हे आपल्या शेतात किंवा गावातच उपलब्ध व्हायचे. आता ते (सजावटीचे) साहित्य रेडिमेड बनवून आपल्याला विकणाऱ्या अनेक देशी-परदेशी कंपन्या निर्माण झाल्या असून, प्रदूषणासोबत एक मोठी आर्थिक झळ ते आपल्याला देतात. आपणही या मटेरियलिस्टिक जीवनाला सरावलो असल्याने डोळ्यावर पट्टी बांधून त्या शोभेच्या वस्तू आपल्या घरी घेऊन येतो. ते प्रदूषण निर्माण करणारं साहित्य आपल्या हवाली करतात. व ते वापरून आपण पर्यावरणाची अपरिमित हानी करतो.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचे छोटे प्लॅस्टिकचे तिरंगी झेंडे असोत वा गणेशोत्सवातील चिनीमातीच्या मूर्तीसकट प्रदूषण वाढवणारी आरास असो, निसर्गाला कणभरही क्षती न पोहोचवता आपल्याला उत्सव कसा साजरा करता येईल हे आपण पाहिले पाहिजे आणि त्यासाठी आपण साधेपणाने सण उत्सव साजरे करण्याची आदर्श पद्धती आचरणात आणली पाहिजे. आपल्या सुशोभनाने देव प्रसन्न होवो न होवो, पण आपण निसर्गाशी अनुकूल राहून केलेल्या प्रत्येक कृतीने देव नक्की प्रसन्न होईल. असे साधेपणाने उत्सव साजरे केले गेले, तर प्रत्येक उत्सव हा आपल्या सर्वांच्याच जीवनात उन्नत विचारांसोबतच आनंद, भरभराट आणि निरामय स्वास्थ्य घेऊन येणारा असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.