Pune News: फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब, शहाजी महाराज, शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्य रथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... ५१ रणशिंगांची ललकारी... नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा गजर... सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर... पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला व शिवभक्तांनी केलेला ‘जय शिवाजी जय भवानीचा जयघोष’ अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणेतर्फे लाल महाल येथून बुधवारी (ता. १९) आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले.
या वेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलिस उपायुक्त विशेष शाखा मिलिंद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पोलिस उपायुक्त संदीप गिल्ल, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते.
सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १३ वे वर्ष आहे. छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्या वेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे. इतिहासातील शिवकालीन युद्धकथा सादर करणाऱ्या ५१ रणरागिणींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिणी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्धकथा सादर केली.
सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयूरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ मध्ये या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाच या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.अमित गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, शिवजयंती महोत्सव समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.