Mumbai News : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा नेमका कशामुळे कोसळला याची कारणमीमांसा करून ही समिती जबाबदारी निश्चित करेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा असा भव्य आणि उत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरूपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, की झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी आपल्याला अतिशय काळजी घेतली पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.