
Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्गत नवा मोंढा बाजारात शेतकऱ्यांना हळद विक्रीनंतर दोन ते अडीच महिने चुकारे मिळत नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह अडत्यांनी मंगळवारी (ता. १५) लिलाव बंद पाडला. या वेळी शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांना घेराव घालून ठिय्या केला. सभापती संजय लहानकर यांनी सोमवारपर्यंत सर्व मागील देणे देऊन खरेदीदारांना ठरल्यानुसार नियमित चुकारे देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजार हळदीच्या व्यापारासाठी महाराष्ट्रात अग्रणी आहे. या ठिकाणी दररोज हजारो क्विंटल हळदीची आवक होते. परंतु हळद खरेदीदार अडत्यांना दोन ते अडीच महिन्यांच्या विलंबाने पैसे देतात. यामुळे अडते शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नव्हते. यामुळे अडत्यांनी मंगळवारपासून लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु ऐनवेळी आलेल्या शेतकऱ्यांची हळद लिलावात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
यानंतर प्रल्हाद इंगोले यांनी शेतकऱ्यांना बाजार समितीतील वस्तुस्थिती सांगितली. हळद उत्पादकांना दोन-अडीच महिन्यांनंतर पैसे घेण्यासह लिलावानंतर आठ-दहा दिवसांनंतरही वजन करण्यासाठी थांबावे, लागते. हळदीचे चुकारे व्यापाऱ्यांच्या मनावर घ्यायचे असतील तर लिलाव सुरू करा आणि नियमानुसार घ्यायचे असतील तर सभापतींच्या दालनात जाऊन बोलू असे आवाहन केले.
यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव करायचे नाही, आम्हाला वेळेवर नियमानुसार चुकारे हवे म्हणत सभापती संजय देशमुख लहानकर, संचालक बबन बारसे, निलेश देशमुख, ज्ञानेश्वर राजेगोरे, गजानन कदम यांच्यासमोर व्यथा मांडल्या. नवा मोंढ्यात अडत्यांसह शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे नवनाथ दर्यापूरकर, शिवाजी वासरीकर, राजू पालदेवार, विठ्ठल देशमुख, गणेशराव वासरीकर, राम राजेगोरे, संतोष कदम, दीपक शिंदे, बंटी शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी अनेकवेळा खरेदीदार, अडते आणि प्रशासनात चर्चा झाली.
सामंजस्याने काही तोडगे काढले, होते परंतु खरेदीदार चार-आठ दिवसातच बदलतात. त्यामुळे नेहमीच वाद निर्माण होत आहेत. वसमत येथील खरेदीदार पंधरा दिवसांत सर्व अडत्यांच्या चुकारे देत असतात, परंतु नांदेडचे खरेदीदार उशिरा चुकारे देऊ लागल्यामुळे त्यांनीही आता नांदेडच्या खरीदराबरोबरच दीड-दोन महिन्यांनी पैसे देण्याची भूमिका घेतली आहे.
नांदेड येथील काही खरेदीदारांच्या दहशतीमुळे बाहेरचे खरेदीदार नांदेडला येणे बंद झाले आहेत. दोन ते अडीच महिन्यांनी पैसे, पावणेचार किलोपर्यंत कट्टी, पंधरा-पंधरा दिवस वजन न करने, सध्या तर वीस पंचवीस दिवसांनंतर तीन टक्के काटून पैसे देत असल्यामुळे नांदेड बाजार समितीमध्ये सोयाबीन, हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
दरम्यान, सोमवारपासून ठरल्यानुसार नियमित वेळेवर हळदीचे चुकारे दिले नाहीत तर शेतकरी व अडत्यांच्या वतीने बेमुदत लिलाव बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रल्हाद इंगोले, अडते असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद काकांडीकर, सचिव बालाजी पाटील भायेगावकर, शिवाजी वासरीकर यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.