Satara News : ढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात मंगळवारी (ता. १९) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते सकाळी भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच ज्योती जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
आई भवानीची आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी, दरे, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे लेझीम- तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला.
सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. छावा युवा मंचाचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.
या वेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.