Mahayuti Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : शिवसेना, ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता

Politics Update : मंत्रिमंडळ विस्तारासाठी १४ तारखेचा मुहूर्त निश्‍चित केला असला, तरी मंत्र्यांच्या यादीबाबत संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून अन्य आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी १४ तारखेचा मुहूर्त निश्‍चित केला असला, तरी मंत्र्यांच्या यादीबाबत संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून अन्य आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. तर शिवसेनेतील वादग्रस्त नेत्यांना वगळ्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षांत पूर्ण क्षमतेचे मंत्रिमंडळ नसल्याने एका मंत्र्याकडे तीन-तीन खाती होती. मात्र या वेळी कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशी विभागणी होऊन स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री मंत्रिमंडळात असतील. यामध्ये भाजपच्या वाट्याला २२, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मागील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ नोव्हेंबरपासून नागपुरात होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र त्याचा मुहूर्त अद्याप निश्‍चित नाही. दिल्लीत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४ डिसेंबर रोजी शपथविधी होईल, असे पत्रकारांना सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्टपणे काहीच न सांगता तारीख सांगण्यास नकार दिला. त्यामुळे शपथविधीबाबत संभ्रम असला, तरी १४ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत शपथविधी होईल, त्यानंतर १५ डिसेंबर रोजी सायंकाळी चहापान आणि १६ रोजी कामकाज सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत साशंकता आहे. ज्येष्ठ नेत्यांऐवजी नव्या फळीतील आमदारांना संधी देण्याबाबत खलबते सुरू असून अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तीन नेत्यांनी मंत्र्यांची यादी निश्चित केली असून भाजपमध्येही मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.

शिवसेनेच्या मागील मंत्रिमंडळातील अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर यांना वगळण्याची शक्यता असून, त्यांच्या जागी प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर यांसारख्या नव्या दमाच्या आमदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये महिला आमदारांमध्ये स्पर्धा

भाजपच्या यादीतून महिला आमदारांची मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे. भाजपने मागील कार्यकाळात विधान परिषदेच्या आमदारांना संधी दिली नव्हती. त्यामुळे याही कार्यकाळात असा प्रयोग केल्यास पंकजा मुंडे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, श्‍वेता महाले, मंदा म्हात्रे आदी महिला आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. महिला व बालविकास हा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे होता. मात्र नव्या रचनेत हा विभाग भाजपकडे जाण्याची शक्यता आहे.

देवाभाऊच ‘मोठा भाऊ’

सध्या भाजपमधील नेत्यांनाही मंत्रिमंडळात वर्णी लागेल की नाही याची शाश्‍वती नाही. या बाबत विचारणा केली असता, जे काही आहे ते एकतर देवाला किंवा देवाभाऊला माहीत अशी मिश्कील टिप्पणी केली जात आहे. मंत्रिमंडळ रचनेत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असेल. गृह, अर्थ, गृहनिर्माण आणि अन्य महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा दावा आहे. ऊर्जा, जलसंपदा, कृषी, नगरविकास आणि अन्य महत्त्वाची खाती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, असे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT