
सुनील चावके
EVM (Electronic Voting Machines) : महाराष्ट्रात ठेच लागून दारुण पराभव ओढवून घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या (मविआ) अपयशातून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी वेळीच बोध घेऊन शहाणी होण्यासाठी धडपडत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील डोळे दिपवून टाकणाऱ्या विजयामुळे हुरळून न जाता भारतीय जनता पक्षही नेहमीच्या अदृश्यपणे कामाला लागल्याचे चित्र आहे.
दिल्ली हे केंद्रशासित असले, तरी आर्थिकदृष्ट्या संपन्न असे ‘मलईदार’ राज्य आहे. हरियाना आणि महाराष्ट्राप्रमाणे. दिल्ली विधानसभेसाठी झालेली १९९३ ची पहिली निवडणूक भाजपने जिंकली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या सहा निवडणुकांमध्ये पक्षसंघटना सशक्त ठेवूनही भाजपला आधी काँग्रेसविरुद्ध आणि नंतर ‘आप’विरुद्ध पराभवाच्या दुहेरी हॅटट्रिकला सामोरे जावे लागले आहे.
पण हरियाना आणि महाराष्ट्रातील यंदाच्या भाजपच्या अनपेक्षित यशाने अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी अनामिक धास्तीने ग्रासली गेली आहे. कुठल्याही निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याच्या फार आधीपासून भाजपची तयारी सुरू होते.
प्रतिस्पर्ध्यांच्या सर्व शक्तिस्थळांची नोंद करून त्यांना निष्प्रभ करण्यासाठी आखलेली रणनीती पूर्णपणे अमलात आणणाऱ्या भाजपच्या सुसज्ज यंत्रणेला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. कारण मोदी-शहा यांच्या भाजपची गाठ दिल्लीत २४ तास सजग राहून राजकारण करणाऱ्या धूर्त, चाणाक्ष आणि आक्रमक अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’शी पडणार आहे.
दिल्लीतील ३७ लाख घरांना शून्य वीजबिलासह दोन कोटी जनतेला माफक दरात अखंड वीजपुरवठा, १८ लाख मुलांना सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण, सरसकट सर्व नागरिकांना सरकारी इस्पितळे आणि ‘मोहल्ला क्लिनिक’मध्ये मोफत उपचार, प्रत्येक महिलेच्या खात्यात एक हजार रुपये, महिलांना दिल्लीभर मोफत बसप्रवास, बुजुर्गांना मोफत तीर्थयात्रा आणि मोफत पाणीपुरवठा अशा योजना राबवून आम आदमी पार्टी दिल्लीच्या राजकारणात भक्कमपणे उभी आहे.
२०१५ मध्ये ७० पैकी ६७ आणि २०२० मध्ये ७० पैकी ६२ जागांच्या जबरदस्त बहुमतासह सत्तेत आलेल्या ‘आप’ला तिसऱ्या यशाविषयी साशंकता आहे. त्याचे कारण भाजपला हरियाना आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये मिळालेले अनपेक्षित यश. भाजप विजयी झाल्यास सर्वसामान्यांना सर्व सवलती-सुविधांना मुकावे लागेल, असे ‘आप’चे नेते सांगत आहेत.
२०२० पासूनच्या दुसऱ्या कार्यकाळातील सुरुवातीची अडीच वर्षे कोरोनाचे संकट, नंतरचे दीड वर्ष पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांना करावा लागलेला खटले आणि तुरुंगवासाचा सामना आणि सदासर्वदा उपराज्यपालांकडून होणाऱ्या मनस्तापामुळे दिल्लीला हवी तशी प्रगती साधता आली नाही, अशी कबुलीही ‘आप’चे नेते देतात.
हरियाना, महाराष्ट्रात पराभूत होताना ज्या चुका काँग्रेस, ‘मविआ’ने केल्या, त्यांची पुनरावृत्ती दिल्ली विधानसभा निवडणुकीत घडू नये यासाठी ‘आप’ची यंत्रणा सावध झाली आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रारी करून प्रतिस्पर्धी पक्षांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघांमध्ये त्यांच्या समर्थक मतदारांची नावे गाळून नकळत सुरुंग लावणे, मतमोजणीच्या दिवसापर्यंत मतांच्या टक्केवारीत आणखी भर पडल्याचे जाहीर करणे, अशा आव्हानांपलीकडे जाऊन आणखी कोणकोणत्या मार्गांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाऊ शकतो, याचा अंदाज लावून ‘आम आदमी पार्टी’ दिल्लीत अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज होत आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून शून्यात जमा झालेला दिल्लीतील काँग्रेस पक्ष म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वासाठी ‘दिव्याखालचा अंधार’ ठरला आहे. ‘इंडिया’ आघाडीत कायम राहताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी केलेली हातमिळवणी संपुष्टात आणून ‘आप’ने आपल्या खांद्यावरून मोठे ओझे उतरविले आहे.
‘आप’चे सर्वेक्षण
भाजपच्या निवडणूकपूर्व अदृश्य डावपेचांवर पूर्ण लक्ष ठेवून असलेल्या ‘आप’च्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोहल्लामोहल्ल्यांमधील बैठकींतून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क सुरू आहे. शिवाय प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयपॅक संस्था ‘आप’च्या वतीने सर्वेक्षण करीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही आयपॅकने ‘आप’चे काम केले होते. त्या वेळी या संस्थेचे नेतृत्व प्रशांत किशोर करीत होते. यंदा ते आयपॅकपासून दूर झाले असले, तरी ‘आप’ने आयपॅकवर विश्वास कायम ठेवला आहे.
‘आप’ने डावपेचांचा भाग म्हणून बाहेरून आणलेल्या अर्धा डझन उमेदवारांसह अकरा विधानसभा मतदार संघांमधील उमेदवारांची बऱ्याच आधी घोषणा केली आहे. त्यापैकी करावलनगर विधानसभा मतदार संघात ‘आप’ला लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. छतरपूरचे उमेदवार भाजपमधून आलेले आहेत. बदरपूरचे भाजपचे आमदार रामवीरकसिंह बिधुरी आता लोकसभा सदस्य झाले आहेत.
‘आप’ने रामसिंह मेहता यांना उमेदवारी देऊन त्यांच्या विधानसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रित केले आहे. विश्वासनगर, लक्ष्मीनगरमध्ये भाजपला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र बाहेरून आलेल्या अर्धा डझन उमेदवारांव्यतिरिक्त ‘आप’ला पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी आपल्या सर्व विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘आप’ला लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या पीछेहाटीचाही हिशेब लक्षात ठेवावा लागणार आहे. दिल्लीत केवळ १७ विधानसभा मतदार संघांमध्येच आम आदमी पार्टीला आघाडी घेणे शक्य झाले होते. मुख्यमंत्री आतिशी, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती या बड्या नेत्यांच्या विधानसभा मतदार संघांमध्येही ‘आप’ भाजपला रोखू शकली नव्हती.
नेहमीप्रमाणे भाजपनेही कुठलाही गोंगाट होऊ न देता निवडणुकीची तयारी चालविली आहे. भाजपला ‘आप’चे लहान-मोठे नेतेच नव्हे तर कार्यकर्ते आणि मतदारांचीही पूर्ण माहिती आहे. १७७ दिवस तुरुंगवास भोगणारे अरविंद केजरीवाल तसेच त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांसारखे ‘आप’चे सर्व बडे नेते आता तुरुंगातून बाहेर आले आहेत, तर लोकसभा निवडणुकीत बाजूला ठेवण्यात आलेली प्रवेश वर्मा, मीनाक्षी लेखी, रमेश बिधुरी अशी फळी विधेनसभेसाठी उतरवली जाईल, अशी चिन्हे आहेत.
त्यामुळे २०१५ आणि २०२० च्या तुलनेत यंदा ‘आप’ची भाजपविरुद्ध चुरशीची टक्कर होईल. हरियाना आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पाठोपाठ होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत फरक इतकाच आहे, की काँग्रेस आणि मविआतील मित्रपक्षांप्रमाणे आम आदमी पार्टी ‘अज्ञ’ आणि गाफिल नाही.
(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.