Pune News : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, प्रसिद्ध विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं मंगळवारी (ता.२०) पहाटे पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ८६ वर्षांचे होते. सकाळी झोपेत त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. नारळीकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांच्या मराठी विज्ञानकथांसाठी नारळीकर ओळखले जात. गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय सुलभ, सुंदर भाषेत मांडण्याची त्यांची शैली विलक्षण होती. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण अशा सन्मानाने गौरवण्यात आले होते.
केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन सुरुवातीला टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केलं. तसेच त्यांनी पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) या संस्थेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली.
२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या निधनामुळं भारतीय विज्ञान आणि विज्ञानसंपर्क क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली.
उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर सन्मान डॉ. नारळीकरांना मिळाले.
डॉ. नारळीकरांचे साहित्य
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस अशी त्यांची साहित्य संपदा आहे.
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र) ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.