Baramati News : पाण्याच्या टँकरची आवश्यकता असणाऱ्या गावांना तातडीने टँकर सुरू करण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील १५ दिवसांत अशा गावांची यादी तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. खडकवासला तलावात सहा टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले आहे.
आवर्तनातून बारामती, इंदापूर तालुक्यांतील तलाव भरण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ तलाव तसेच इंदापूर तालुक्यातील भादलवाडी, मदनवाडी, शेटफळगढे, तरंगवाडी तलाव, नीरा डावा कालव्यातून वाघाळे तलाव, वरकुटे खुर्द, शेटफळ हवेली तलाव भरण्याबाबत नियोजन करावे.
मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. बारामती येथे पंचायत समिती कार्यालयात आयोजित बारामती व इंदापूर तालुक्यांतील पाणी व चाराटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, श्वेता कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, की टंचाई आराखडा महिनानिहाय सादर करा. कृती आराखडा तयार करून कामे पूर्ण करावीत. गावनिहाय पेरणी क्षेत्र, उपलब्ध चारा, चाऱ्याची लागवड त्यासाठी लागणारे बियाणे, पेरणीसाठी लागणारे पाणी याबाबत नियोजन करून कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करावी. इंदापूर तालुक्याची माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिली.
गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी बारामती तालुक्यात सुरू टँकरची संख्या, चारा डेपोबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या वेळी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यावर प्राधान्य देत असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात धरणातून आर्वतने सोडण्यात येत आहे. टँकरची मागणी असलेल्या गावांची पाहणी करून टँकर सुरू करावेत.- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.