डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गणेश पवार, डॉ. अशोक कडलग
आंतरपीक पद्धती हा पीक पद्धतीतील महत्त्वाचा घटक आहे. आंतरपीक पद्धती म्हणजे मुख्य पिकामध्ये किंवा मुख्य पिकाच्या मधल्या पट्ट्यामध्ये दुय्यम पिकाची योग्य अंतरावर केलेली लागवड करणे. यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये मुख्य पिकावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा ताण कमी करून दुय्यम पीक पद्धतीतून चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे मुख्य पीक काही कारणास्तव हाती आले नाही, तरी दुय्यम म्हणजेच आंतरपीक पद्धतीतून काही प्रमाणात झालेला खर्च भरून काढला जातो. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी आंतरपीक पद्धती आवश्यक आहे.
आंतरपीक पद्धती ही वातावरण बदल अनुकूल शेतीसाठी महत्त्वाची आहे. एकल पीक पद्धतीमध्ये जास्त अंतरावर लागवड केलेली पिके उपलब्ध सूर्यप्रकाश, जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्ये या सर्व बाबींचा सुरुवातीच्या काळात कार्यक्षमपणे वापर करू शकत नाहीत. कारण सुरुवातीची काळात त्यांची वाढ हळूहळू होत असते. यामुळे या सर्व बाबींच्या कार्यक्षम वापरासाठी आंतरपीक घेऊन कमी दिवसांत चांगले उत्पादन मिळते.
एकल पीक पद्धतीमुळे कीड व रोगांचा प्रसार वातावरण बदलामुळे वाढताना दिसत आहे, परंतु त्याच पिकाचा आंतरपीक पद्धतीत समावेश केल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. शिवाय शेतीमध्ये विविध मित्र कीटकांची वाढ होऊन जैवविविधता वाढण्यास मदत होते. तसेच जमिनीची धूप, अन्नद्रव्यांचा निचरा, जमिनीतील पाणी पातळी किंवा ओलावा वाढण्यास मदत होते, तसेच ही पिके मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे एकंदरीत शेतीची पुनरुत्पादन क्षमता वाढीस मदत होते.
आंतरपिकासाठी ऊस लागवड पद्धत
रुंद सरी किंवा पट्टा पद्धत
या पद्धतीमध्ये दोन सरीतील अंतर साधारणतः ४ ते ६ फुटांपर्यंत वाढवून जमिनीच्या प्रकारानुसार मधल्या पट्ट्यात २ ते ३ ओळी पेरणी किंवा टोकन पद्धतीने आंतरपिकांची लागवड करावी.
जोड ओळ किंवा एकाआड एक सरी पद्धत
यामध्ये सलग २.५ ते ३ फुटांच्या सऱ्या सोडून एका सरीमध्ये ऊस लागण तर दुसऱ्या सरीतील वरंब्याच्या दोन्ही बाजूंना आंतरपिकाची टोकण करावी.
मुख्य बाबी
आंतरपीक हे मोठ्या बांधणीच्या अगोदर (चार महिन्यांच्या आत) पक्व होणारे असावे.
आंतरपीक जास्त उंचीचे व ऊस पिकास स्पर्धा करणारे नसावे.
आंतरपिकांना मुख्य ऊस पिकाव्यतिरिक्त शिफारशीनुसार खतमात्रा द्याव्यात.
स्पर्धा करणारी तसेच ऊस कुळातील एकदल
पिके (मका ज्वारी इ.) यांची लागवड टाळावी.
ऊस हे एकदलवर्गीय पीक आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून एकदल वर्गीय पीक घेतल्यास दोन्ही पिकांची अन्नद्रव्य, पाणी व सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होते. त्याचा ऊस पिकाच्या वाढीवर आणि फुटव्यांवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. द्विदलवर्गीय पिकामुळे मोठ्या प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होऊन ऊस पिकातील नत्राची आवश्यकता पूर्ण करता येते. तण नियंत्रणासाठी ऊस व आंतरपीक या दोन्हींसाठी योग्य असलेल्या तणनाशकाची निवड करावी.
आंतरपीक पद्धतीचे फायदे
मुख्य पिकाच्या मोकळ्या पट्ट्याचा वापर करून मुख्य पिकातील अन्नद्रव्ये, पाणी व उपलब्ध सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमतेने उपयोग करता येतो.
आंतरपिकांमधून मुख्य पिकाव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न मिळून एकूण उत्पादन खर्चावरील ताण कमी करता येतो.
आंतरपीक घेतल्यामुळे मुख्य पिकामधील मोकळ्या जागेतील तणांचा बंदोबस्त होतो. अर्थात मोकळ्या जागेत आंतरपिके वेगाने वाढून मधील जागा पूर्णपणे व्यापतात. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही.
द्विदलवर्गीय पिकामुळे मोठ्या प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होऊन ऊस पिकातील नत्राची आवश्यकता पूर्ण करता येते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढण्यास मदत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.