डॉ. भागवत चव्हाण
बीजोत्पादनामध्ये वेळोवेळी भेसळ रोपे काढणे फारच महत्त्वाचे असते. वेगळ्या जातींची, त्याच जातीची परंतु रोगट, पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच किंवा बुटकी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे काढून टाकावीत. ज्या पिकात परपरागीभवन होते, अशा पिकातील भेसळीची झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत.
जी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत, अशी झाडे फुलोऱ्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात. संकरित बीजोत्पादनात मादी वाणाच्या ओळीत नर वाणाची झाडे असल्यास तीसुद्धा काढून टाकावीत. पीक पक्व होण्याच्या अवस्थेत भेसळ काढणे महत्त्वाचे असते. वेगळ्या गुणधर्माचे झाडे स्वपरागसिंचित पिकांमध्ये पक्क होण्याच्या अवस्थेत काढता येतात.
क्षेत्र तपासणी
बीजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणा पिकाच्या परागीभवनाच्या प्रकारानुसार २ ते ४ क्षेत्र तपासण्या करते.
यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बीजोत्पादन आहे किंवा नाही ते तपासले जाते. तसेच बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाते.
आंतरमशागत
बीजोत्पादनाचे क्षेत्र तणविरहित असणे फार महत्त्वाचे असते. तणामुळे बीजोत्पादनाची प्रत कमी होते. काढणीच्या वेळेस बियाण्यामध्ये तणाचे बी मिसळण्याचा संभव असतो. असे बी वेगळे करणे फारच जिकिरीचे होते.
तणामुळे कीड आणि रोग वाढण्याचा किंवा पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे आवश्यक तेवढ्या निंदणी-खुरपण्या करून बीजोत्पादन क्षेत्र तणविरहित ठेवावे.
पीक संरक्षण
रोग आणि कीड यांच्या संसर्गामुळे बीजोत्पादन घटते आणि तयार झालेले बियाणे निकृष्ट प्रतीचे होते. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशके, बुरशीनाशके वापरावीत.
रोग आणि कीडग्रस्त रोपे/झाडे उपटून काढावीत. बियाण्यापासून होणारे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
काढणी
बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर काढणी व मळणी करावी. काही पिकांच्या बाबतीत उदा. सोयाबीन पीक जास्त पक्व झाल्यास शेंगा फुटतात. त्यामुळे उत्पादनात जास्त प्रमाणात घट येते.
संकरित बीजोत्पादनामध्ये नर कणसाची काढणी अगोदर करुन ते वेगळ्या ठिकाणी ठेवावे. मादी कणसाची मळणी करते वेळी अवजारे स्वच्छ असावीत. त्यामुळे भेसळ होण्याची शक्यता टाळता येईल.
बियाणे परिपक्व होण्याच्या आधी काढले, तर मळणी आणि उफणणीच्या वेळेस त्यातून अपरिपक्व बियाणे जास्त प्रमाणात निघून वाया जाते आणि उत्पन्न कमी होते. काढणी उशिरा झाली, तर बियाणे शेतातच गळून पडल्यामुळे नुकसान होते.
बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणतः १२ ते १५ टक्क्यांदरम्यान असल्यावर ते काढण्यास तयार होते. काढणी वेळेवर झाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
बियाण्याची शुद्धता ही काढणीनंतर होणाऱ्या हाताळणीवर अवलंबून असते. काढणी आणि मळणी करते वेळी इतर बियाण्याची भेसळ होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी बियाणे क्षेत्रातील पीक वेगळे ठेवावे.
मळणी शक्यतो सपाट जागेवर ताडपत्रीवर किंवा फरशीवर करावी. सारवलेल्या जागेवर मळणी केल्यास बियाण्याकडून जमिनीतील पाणी / ओलावा शोषण्याची शक्यता असते. मळणीयंत्र पूर्णपणे स्वच्छ केल्यावर वापरावे. बियाणे फुटू नये म्हणून मळणीयंत्र बियाण्याच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थित सेट केलेले असावे.
बियाणे वाळविणे
काढणी आणि मळणीच्या वेळेत बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने ते उन्हात वाळविणे आवश्यक असते. त्यामुळे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता आणि जोम टिकून राहतो.
बियाण्यातील पाण्याचे प्रमाण ठरावीक पातळीपर्यंत कमी केल्याने साठविण्याच्या वेळी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
साठवण
थोडे दिवस साठवणीकरिता स्वच्छ केलेल्या कीडविरहित पोते किंवा नवीन पोत्यात बियाणे भरून ठेवावे, पोत्यावर बियाण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असावी.
पोती जमिनीपासून काही अंतर ठेवून तयार केलेल्या रॅकवर ठेवावीत. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची उंची ४ मीटरपेक्षा जास्त होऊ नये. बियाणे स्वच्छ, थंड आणि कोरडे हवामान असलेल्या भांडारात साठवावे. आवश्यकतेनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर करावा.
बीजप्रक्रिया
बियाणे वाळविणे, स्वच्छ करणे, प्रतवारी करणे, कीडनाशक लावणे आणि परीक्षण करून पिशव्या भरून मोहोरबंद करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव असतो. बीजप्रक्रियेमुळे बियाणांची प्रत वाढते. कीडनाशक लावल्याने कीड व रोगांपासून संरक्षण होतो. बीजप्रक्रियेसाठी शिफारशीनुसार बुरशीनाशकांचा वापर करावा.
बीज प्रक्रिया केंद्रात विविध पिकांच्या जातीवर प्रक्रिया करण्यात येत असल्याने कोणत्याही प्रकारे भेसळ होवू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. बीज प्रक्रिया केंद्रातील कामे ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली होतात.
- डॉ. भागवत चव्हाण,
८७६७४५६४५५
(कृषिविज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.