
Maharashtra Agriculture: लातूर जिल्ह्यातील मांजरा कृषी विज्ञान केंद्राने लातूर सीड हब हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत केव्हीकेच्या सुमारे अडीचशे शेतकऱ्यांकडे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवून पायाभूत बियाण्याची निर्मिती करण्यात येत आहे. जोडीला बीज परीक्षण प्रयोगशाळा उभारून बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच बीज प्रक्रिया यंत्रणाही उभारण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित केली जाणार आहे.
सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. जिल्ह्यात खरिपाचे पेरणीक्षेत्र सुमारे सहा लाख हेक्टर असून पैकी चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आहे. उत्पादन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक शेतकरी पेरणीसाठी घरी तयार केलेल्या बियाण्याचा वापर करतात. खासगी व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून दरवर्षी पत्रास हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकते.
तरीही पेरणीसाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भासतो. काही वेळा बाजारातील बियाण्यांचा दर्जा निकृष्ट असतो. उगवण क्षमता खूप कमी असल्याने दुबार पेरणीची वेळ येते. जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत समस्या निर्माण झाल्या. दर्जेदार बियाणे निर्मितीच्या प्रक्रियेची शृंखलाच तुटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण पायाभूत, प्रमाणित बियाणे व तेही वेळेवर उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) यांना पुढाकार घेतला. यात मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. सर्वांच्या एकत्रीकरणातून ‘सोयाबीन सीड हब’चा उपक्रम हाती घेण्यात आला.
सीड हब उपक्रमातील बाबी
मांजरा केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिन डिग्रसे म्हणाले, की जिल्ह्यात ७० च्या दरम्यान सक्रिय असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या बीजोत्पादन व प्रक्रिया विषयात कार्य करतात. या कंपन्यांना पायाभूत (फाउंडेशन) बियाणे उपलब्ध करून देण्याचा केव्हीकेचा प्रयत्न होता. केव्हीके अंतर्गत सुमारे २५० सदस्य शेतकरी आहेत. त्यांना पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड) देऊन पायाभूत बियाणे तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.
लातूर सीड हबचा हा महत्त्वाचा भाग होता. त्यास जिल्हा नियोजन समितीने आर्थिक पाठबळ देण्याचे ठरवले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यानुसार केव्हीकेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम, बियाणे तपासणी प्रयोगशाळा व बियाणे प्रक्रिया केंद्र असा एकूण एक कोटी ७५ लाख २५ हजार ९९६ रुपयांचा निधी देण्यात आला.
सव्वा लाख क्विंटल बियाणे निर्मिती
पैदासकार बियाणे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून घेण्यात आले. त्यातून २०२३- २४ मध्ये ७० एकरांवर, तर २०२४ - २५ मध्ये १७० एकरांवर बीजोत्पादन घेण्यात आले. यात दोन्ही विद्यापीठांकडील नव्या, सुधारित वाणांचा वापर करण्यात आला.
प्रत्येकी २५ किलो वजनाच्या बियाणे बॅगांमधून एक लाख वीस हजार क्विंटल बियाणे तयार झाले. दोन वर्षांत ४२ शेतकरी उत्पादक कंपन्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या दरांनुसार हे बियाणे देण्यात आले. या कंपन्यांनी पुढे प्रमाणित व सतत्यादर्शक (ट्रूथफूल) बियाण्यांची निर्मिती करून त्याची शेतकऱ्यांना विक्री केली.
साडेतीन हजार बियाणे नमुन्यांची तपासणी
बीजप्रक्रिया व बियाणे नमुने तपासणीसाठी पूर्वी शेतकऱ्यांना परभणी विद्यापीठातील प्रयोगशाळा, प्रक्रिया केंद्राचा तसेच छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील प्रयोगशाळांचा आधार होता. यामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होत असे. शेतकऱ्यांनाही घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासणीसाठी सोय नव्हती. या उपक्रमात केव्हीकेच्या बीज तपासणी प्रयोगशाळेची स्थापना झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली. प्रयोगशाळेची वार्षिक क्षमता सात ते दहा हजार नमुने तपासणीची आहे.
यात उगवण क्षमता व दर्जा तपासला जातो. ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेल्या या प्रयोगशाळेत नऊ महिन्यांत शेतकरी कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांकडील अशा साडेतीन हजार बियाण्यांचे नमुने तपासण्यात आले. सत्तर टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले पायाभूत बियाणेच शेतकरी कंपन्यांना देण्यात आले. त्याहून कमी उगवण क्षमतेच्या बियाण्याची बाजारभावाने बाजारात विक्री केली.
यंदाच्या खरिपासाठीही उपक्रमातील पायाभूत बियाण्यांपासून शेतकरी कंपन्यांनी तयार केलेले प्रमाणित बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे केव्हीकेचे प्रमुख डॉ. डिग्रसे यांनी सांगितले. कंपन्यांसाठी तपासणी शुल्क तीनशे रुपये तर शेतकऱ्यांसाठी ते नाममात्र पन्नास रुपये आहे. गेल्यावर्षी उशिरा प्रयोगशाळा सुरू झाल्याने अपेक्षित एवढ्या नमुन्यांची तपासणी करता आली नाही. यंदा मात्र मोठ्या संख्येने तपासणी सुरू असून, आतापर्यंत पाचशेच्या आसपास शेतकऱ्यांनी नी घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून घेतल्याचे डॉ. डिग्रसे यांनी सांगितले.
प्रक्रिया प्रकल्प होतोय कार्यान्वित
केव्हीकेतर्फे बियाणे प्रकल्प केंद्राचा यांत्रिक सेटअप उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या केंद्राची क्षमता चार ते पाच मे. टन प्रति तास एवढी आहे. लवकरच केंद्र कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षाच्या खरीप हंगामापूर्वी केंद्रात बियाणे प्रक्रिया सुरू होऊन पायाभूत बियाणे तयार होणार आहे. लातूर सोयाबीन सीड हब या नावाने ते बाजारात येणार आहे.
उपक्रमाच्या विविध टप्प्यांत एकात्मिक पीक व्यवस्थापन, विलगीकरण अंतर, उत्पादनासाठी प्रत्यक्ष शिवार भेटीसह दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी तज्ज्ञांनी प्रभावी प्रयत्न झाले. त्याचे फलित चांगले घडून आले. कमी उगवण क्षमतेच्या बियाण्यांच्या तक्रारी कमी झाल्या. बियाणे दर्जेदार व वेळेवर उपलब्ध होऊन त्याचा परिणाम उत्पादन वाढीत झाले. एकरी १० ते १२, १३ क्विंटलपर्यंत बीजोत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे, असे डॉ. डिग्रसे यांनी सांगितले.
डॉ. सचिन डिग्रसे ९४०४९५७५११
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.