Jalgaon Tehsil News : ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’, असे म्हटले जाते. तसाच अनुभव तहसील कार्यालयाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या सात महिन्यांपासून येत आहे. पडलेल्या भिंतीमुळे तहसील कार्यालयाची (Tehsil) सुरक्षा धोक्यात आली आहे.
तहसील कार्यालयातील महत्त्वाची दस्तऐवज केव्हाही चोरीला (Theft) जाऊ शकतात किंवा त्याला कोणी आग लावू शकते. तहसील कार्यालयातील कागदपत्रे जळाली किंवा चोरी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला (Public Work Department) जाग येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला भिंत बांधण्यासह तहसील कार्यालयात प्राथमिक सुविधा करण्याबाबत तब्बल दहा स्मरणपत्रे पाठविली, तर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनीही दोन वेळा पत्रे पाठविली आहेत. तरीही तहसील कार्यालयाची भिंत बांधण्यात आलेली नाही.
विविध दाखले, विविध परवानग्या, विद्यार्थ्यांसाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात शहरासह जळगाव तालुक्यातील नागरिकांची दिवसभर गर्दी असते.
तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस (शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बाजूने) पूर्वी मोठी भिंत होती. यामुळे तहसील कार्यालयाला मागील बाजूने संरक्षण होते. उड्डाण पुलाच्या कामात तहसील कार्यालयाची मागील संरक्षण भिंत पाडण्यात आली.
पुलाचे काम सुरू असताना, बांधकामाचे साहित्य भिंत पाडलेल्या जागेवर असल्याने मागील बाजूने काही प्रमाणात संरक्षण होते. आता काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण गरजेचे होते.
याबाबत तहसीलदार कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जुलै महिन्यात पत्र देऊन सरंक्षण भिंत बांधण्यासह विविध सुविधांची कामे करण्यास सांगितले. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
पावसाळ्यात पाडलेल्या भिंतीच्या बाजूने पाणी तहसील कार्यालयात शिरले होते. पावसाळ्यानंतरही तब्बल दहा स्मरणपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. अद्यापही भिंत बांधण्यात आलेली नाही.
एकीकडे भिंत पाडली असल्याने तहसील कार्यालयाला चोरीचा, आगीचा धोका आहे. दुसरीकडे आता महापालिका तहसील कार्यालयाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते, गटारीचे काम करीत आहे. मात्र हेही काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे.
तहसील कार्यालयासमोर खडीसह इतर साहित्याचे ढीग पडून आहेत. गटारीवरील ढापा दोन फूट उंच करण्यात आल्याने नागरिकांना कसरत करीत तहसील कार्यालयात जावे लागते.
ये-जा करताना अडचण होते. रस्त्यावर बांधकाम साहित्य पडल्याने मोठी वाहने तहसील कार्यालयाकडे आणता येत नाहीत. तहसीलदारांना जिल्हा परिषदेजवळ गाडी उभी करून पायी तहसील कार्यालयात यावे लागते. जातानाही परत जिल्हा परिषदेपर्यंत पायी जावे लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.