Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy : मणिपूरच्या सुगंधी भाताचे रहस्य

भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर होते. म्हणूनच भात शेतीसाठी या भागांत नील- हरित शेवाळाचा वापर अधिक होतो. पूर्वी हे प्रमाण कमी होते. आता या पारंपरिक सुगंधी वाणांच्या वाढत्या मागणीमुळे हे प्रमाण अजून वाढतच आहे.

डॉ. नागेश टेकाळे

साधारणपणे तीन वर्षांपूर्वीचा पावसाळा. मणिपूरची राजधानी इंफाळमधील दुपारची वेळ. शहराच्या मध्यवर्ती भागामधील एका छानशा हॉटेलमध्ये दुपारचे शाकाहारी जेवण घेतले. त्या जेवणाचे बिल दिल्यानंतर समोर आलेली बडीशेप नाकारत जिभेवरील भाताची चव सांभाळत हॉटेल मालकास मुद्दाम या चवीचे रहस्य विचारण्यासाठी गेलो. तर काय आश्‍चर्य त्या चवीचा निर्माता समोरच बसलेला होता. परिचयातून कळले, की मणिपूरच्या त्या सुशिक्षित शेतकऱ्याचे स्वतःच दोन एकर मणिपूरच्या चाखो (Chakhao Paddy) या सुगंधी भाताचे (Fragrant Paddy) क्षेत्र होते.

मणिपूरला येणारे पर्यटक त्या हॉटेलमध्ये या भाताची चव घेण्यास आवर्जून जातात. तो भात शिजविण्याची त्याचा ॲरोमा टिकवणारी त्यांची पारंपरिक पद्धती सुद्धा मी त्या हॉटेलमध्ये पाहिली. आणि साहजिकच त्या शेतकऱ्यास त्यांच्या शेतावर मला घेऊन जाण्याची विनंती केली. ‘अतिथी देवो भव’चा सन्मान करत त्या शेतकऱ्याने मला त्याचे भात क्षेत्र दाखवले. आपल्या या सुगंधी वाणाचे रहस्य काय? या माझ्या प्रश्‍नाच्या उत्तराऐवजी त्यानेच मला तीन प्रश्‍न विचारले.

शेतकऱ्याचे तीन मित्र कोणते? मी निःशब्द होतो. त्याने उत्तर देण्यास सुरुवात केली. बांधावरील वृक्ष, जमिनीमधील उपयुक्त जिवाणू आणि माझ्या भात शेतीवर वाढत असलेले नील हरित अर्थात निळे- हिरवे शेवाळ. बांधावरील वृक्ष शेतकऱ्यांना उत्पन्न तर देतातच सोबत लहान पक्ष्यांना निवाराही देतात. पिकांवरील किडीचे नियंत्रण करतात. जमिनीमधील उपयुक्त जिवाणू पिकांना आवश्यक त्या मूलद्रव्यांची देवाण-घेवाण करतात, तर निळे -हिरवे शेवाळ भातासारख्या पाण्याच्या सहवासात वाढणाऱ्या पिकाला मोफत नत्र पुरवठा करते. त्याने एका घमेल्यात त्या शेवाळाचे सूक्ष्म गोळे आणले आणि भात शेतीच्या पाण्यात दूरवर फेकण्यास सुरुवात केली. त्याच्या चाखो या सुगंधी भाताचे रहस्य या शेवाळाच्या मैत्रीमध्ये होते हे माझ्या लगेच लक्षात आले.

नील- हरित शेवाळाच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. त्यांपैकी नॉस्टॉक हे शेवाळ शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. भात शेतीला पाणी भरपूर लागत असते. थोडक्यात, मॉन्सूनच्या बरसणाऱ्या पावसातच हे पीक उभे असते. हे पीक नत्रासाठी जमिनीमधील नत्र जिवाणूंवर अवलंबून असते. उत्पादन जास्त हवे असेल तर शेतकरी युरिया या रासायनिक खताचा वापर करतात. मात्र त्यामुळे खर्च तर वाढतोच सोबत जमिनीमधील भातास नत्र पुरविणारे जिवाणू अकार्यक्षम होतात, नष्टही होतात. भारताच्या पूर्वोत्तर मणिपूर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम या छोट्या राज्यांत सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर होते. म्हणूनच भात शेतीसाठी नील- हरित शेवाळाचा वापर अधिक होतो.

पूर्वी हे प्रमाण कमी होते. आता या पारंपरिक सुगंधी वाणांच्या वाढत्या मागणीमुळे हे प्रमाण अजून वाढतच आहे. खते-बियाणांच्या दुकानातही हे शेवाळ कोरड्या अवस्थेत मिळते. ते पाण्यात फेकले असता जिवंत होते आणि काही आठवड्यांमध्येच भात शेतीमध्ये असलेल्या पाण्यावर त्याचा थर तयार होतो. हाताच्या स्पर्शाला लिबलिबीत वाटणारे हे शेवाळ नेहमी समूहात असते आणि जेथे पाणी असते तेथेच ते वाढते. या तंतुमय शेवाळाच्या आकाराने मोठ्या जाड आवरण असलेल्या पेशीमध्ये हवेमधील नत्र वायूचे रूपांतर स्थिर अमोनियममध्ये करण्याची क्षमता असते.

दिवसा सूर्यप्रकाशात ही क्रिया वेगाने सुरू असते. तयार झालेला अमोनिया सभोवतालच्या पाण्यात विरघळला जातो आणि भात पिकाला विनासायास उपलब्ध होतो. भात पिकाच्या क्षेत्रात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ही नैसर्गिक क्रिया सुरू असते. जेव्हा पाऊस थांबतो आणि भात पीक फुलोऱ्यात येते तेव्हा हे शेवाळ वाळून त्याचा जमिनीवर सूक्ष्म थर अथवा पापुद्रा तयार होतो. अशावेळी ते सुप्त अवस्थेत जाते. पुढील वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा ते पुन्हा जागृत होते. मात्र त्यासाठी ती जमीन भात कापणीनंतर तशीच ठेवावयास हवी.

निळे- हिरवे शेवाळ शेती हा सेंद्रिय शेतीचाच एक प्रकार आहे. मात्र त्याला अनेक मर्यादा आहेत. पाण्यावर वाढणारे हे शेवाळ चाळणीमध्ये गोळा करून उन्हामध्ये वाळवून कोरड्या ठिकाणी सहज साठवून ठेवता येते. भातामधील ‘ॲरोमा’ या खतामुळे वाढतो आणि टिकूनही राहतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. चीन आणि तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर नील- हरित शेवाळ भात शेतीसाठी वापरले जाते. आपल्याकडे सुद्धा कर्नाटक, ओडिशा, केरळ आणि तेलंगणामध्ये काही शेतकरी त्यांचे भात क्षेत्र या पद्धतीसाठी प्रतिवर्षी राखून ठेवतात.

कटक, ओडिशा येथील मध्यवर्ती भात संशोधन संस्थेमध्ये या शेवाळावर उपयुक्त कार्य सुरू आहे. आदिवासींच्या भात शेतीवर त्याचे नियमित प्रयोग केले जातात. आपल्याकडे आदिवासी भागात भात शेतीमधील उत्पादन सातत्याने कमी होत आहे. शासनाच्या कृषी विभागातर्फे हे निळे हिरवे शेवाळ या गरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणे गरजेचे आहे. या निळ्या हिरव्या शेवाळामुळे जमीन नत्रयुक्त होऊन तिची उत्पादन क्षमता वाढते.

व्यावसायिक शेतीसाठी मात्र निळ्या- हिरव्या शेवाळाच्या वापराला अनेक मर्यादा आहेत. जमिनीमध्ये ज्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावयाचे आहेत, तिच्यामधील सेंद्रिय नत्र वाढवायचा आहे, मातीचे, जिवाणूंचे रक्षण करावयाचे आहे, उत्पादनाची गुणवत्ता वाढवावयाची आहे आणि सोबत पौष्टिक आहार घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी ही मैत्री अनोखी बंध निर्माण करणारी आहे. ‘ॲझोला’ म्हणजे पाण्यावर तरंगणारे नेचे या वनस्पतीच्या पानांमध्ये सुद्धा नील- हरित शेवाळ वाढते आणि हवेमधील नत्र वायूचे अमोनिअममध्ये रूपांतर करते.

हा ॲझोला आता नत्रयुक्त होतो आणि त्याचे हरित खत भात शेतीला दिल्यास उत्पन्नामध्ये वाढ होते. ॲझोला हे उत्कृष्ट पशुखाद्य आहे ते या नत्रामुळेच आणि या आहारामुळे दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. ॲझोला हे भात शेतीत हरित खत म्हणून वापरतात. ॲझोला आणि निळे हिरवे शेवाळाचे सहजीवन हे भारतीय शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारे आहे. मात्र, या अशा पौष्टिक कृषी उत्पादनासाठी शासनाने वेगळे दर निश्चित करावयास हवे तरच शेतकरी यात पुढाकार घेऊ शकेल.

हा ॲझोला आता नत्रयुक्त होतो आणि त्याचे हरित खत भात शेतीला दिल्यास उत्पन्नामध्ये वाढ होते. ॲझोला हे उत्कृष्ट पशुखाद्य आहे ते या नत्रामुळेच आणि या आहारामुळे दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. ॲझोला हे भात शेतीत हरित खत म्हणून वापरतात. ॲझोला आणि निळे हिरवे शेवाळाचे सहजीवन हे भारतीय शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारे आहे. मात्र, या अशा पौष्टिक कृषी उत्पादनासाठी शासनाने वेगळे दर निश्चित करावयास हवे तरच शेतकरी यात पुढाकार घेऊ शकेल.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT