Latur / Dharashiv News : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे दोन्ही जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उसाचे पीक बहरात असताना फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून उन्हाचा चटका बसत आहे. उसाला २७ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान मानवते.
काही दिवसांपासून ३८ अंशांपर्यंत पारा सरकल्याचे ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. प्रकल्पातील पाणीसाठाही कमी होत आहे. यामुळे उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणी पुरेल की नाही, या भीतीने शेतकऱ्यांनी आतापासून विहिरी व बोअरच्या माध्यमातून पर्यायी सिंचन व्यवस्थेसाठी धडपड सुरू केली आहे.
मार्चअखेर बसणारे उन्हाचे चटके फेब्रुवारीअखेरीलाच बसत आहेत. द्राक्ष उत्पादकांचीही भीती वाढली आहे. भाव घसरल्यामुळे टोमॅटोकडे उत्पादकांचे दुर्लक्ष असले तरी येत्या काळात फटका टोमॅटोला बसण्याची शक्यता आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत भूजलाची पातळी चांगलीच वाढली आहे. यासोबत मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे.
दोन्ही जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ३५ हजार ६८९ हेक्टर असलेले उसाचे क्षेत्र यंदा ४५ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी ३१ हजार ९८१ हेक्टरवर असलेले क्षेत्र यंदा ४३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे.
उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला असून साठ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत ऊस पिकाला शाश्वत पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. यातूनच काही भागात विहिरी व बोअर खोदाई सुरू आहे. अखंडित विजेसाठी सौरपंप मिळवण्याचे प्रभावी प्रयत्न सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यात दोन हजार आठशे, तर लातूर जिल्ह्यात १२२ हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. विशेषतः चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात ५३६ हेक्टरवर टोमॅटो असले, तर भाव घसरल्यामुळे उत्पादक नाराज आहेत. तापमान वाढीमुळे टोमॅटो व मिरचीची फुलगळ होण्याची शक्यता आहे.
शाळा सकाळच्या सत्रात कधी भरणार?
दरवर्षी कडक उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने १६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. या वर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने शाळा एक मार्चपासूनच सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. जिल्हा परिषदेने अद्याप मागणीला प्रतिसाद दिला नाही. यामुळे शाळा सकाळच्या सत्रात कधी भरणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
ऊस पिकांमध्ये वाढत्या तापमानाचा ताण पडत आहे. उसाला २७ ते ३५ अंशांपर्यंतच तापमान मानवते. गेल्या वर्षीही फेब्रुवारीपासूनच तापमानात वाढ झाली होती. या स्थितीत शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील ऊसशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अन्नद्रव्यांचा वापर करावा.- शिवप्रसाद येळकर, ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर, रांजणी
यंदा सलग पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पन्नास टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट जाणवत आहे. उत्पादन घटले असताना फवारणीच्या खर्चात भर पडणार आहे.- राजाभाऊ नवले, द्राक्ष उत्पादक शेतकरी, धाराशिव
वाढत्या तापमानामुळे फुलोऱ्यात आलेळी मिरची व टोमॅटोची फुलगळ होते. शेतकरी फवारणीतून ही फुलगळ रोखण्याचा प्रयत्न करतात. नवी आंबा व फळबाग लागवड केली असेल, तर त्यात सोयाबीन गुळी व भुसा टाकून मल्चिंग करावे. सावली देण्याचेही नियोजन करावे.- डॉ. अरुण गुट्टे, कृषी विस्तार विद्यावेत्ता, लातूर
तापमान वाढीमुळे दूध उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. रोजचे एक ते दीड लिटरपर्यंत दूध उत्पादन घटले. यामुळे शेडमध्येच तापमान कमी राहील, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.- विलास शिंदे, दूध उत्पादक शेतकरी, सारसा, ता. लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.