Pune News : गेल्या काही वर्षांतील घटती पाणी पातळी आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता रहिमतपूर (जि. सातारा) परिसरातील दहा गावांमधील विहिरी आणि आडांच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वेक्षणाचे काम शालेय विद्यार्थांनी हाती घेतले आहे. या सर्वेक्षणानंतर सर्वंकष आराखडा तयार करून त्याची लोकसहभागातून अंमलबजावणी केली जाणार आहे.
पर्यावरण शास्त्रज्ञ आणि रहिमतपूरचे रहिवासी डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार दहा गावांतील विहीर, आड आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी ग्रीन तेर फाउंडेशन आणि श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्य मिळाले आहे.
डॉ. शेंडे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने गावशिवारात तीव्र पाणीटंचाई आहे. विहीर आणि आड हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत.’’ श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने म्हणाले, ‘‘दहा गावांतील २०० विहिरी आणि ५० आडांच्या सर्वेक्षणासाठी तीन शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या १५० विद्यार्थ्यांची निवड केली.’’
सर्वेक्षणाबाबत तांदूळवाडी- मंगळापूर (ता. कोरेगाव) येथील श्री कोल्हेश्वर विद्यालयातील शिक्षक शत्रुघ्न मोहिते म्हणाले, ‘‘१ मे रोजी शैक्षणिक निकालाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी प्रश्नावली दिली. विद्यार्थी घरोघरी जाऊन प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण पूर्ण करणार आहेत.’’
विद्यार्थी केलेल्या सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल एक समिती तयार करणार आहे. याबाबत जलसंधारण सल्लागार श्रीकांत जगताप म्हणाले, ‘‘सर्वेक्षण अहवालातून आम्हाला दहा गावांतील विहिरी, आड आणि कूपनलिकांची सद्यःस्थिती समजेल. त्याआधारे विहिरी जिवंत कशा ठेवायच्या, त्या वापरात कशा राहतील, घरांवरील पावसाचे पाणी विहीर, कूपनलिकेत कसे सोडता येईल याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि लोकसहभागाद्वारे भूजल पुनर्भरण याबाबतची रूपरेषा निश्चित केली जाईल.’’
प्रश्नावलीतून मिळणाऱ्या नोंदी ः
- गावातील कुटुंबांची, विहिरी, छोटे ओहोळ, नाले यांची संख्या
- ओढे वाहण्याचा सरासरी कालावधी, कार्यरत आड, रहाट नसलेले आड
- गावात नदी असल्यास नाव आणि सध्याची परिस्थिती.
- गावात पडणारा सरासरी पाऊस, गेल्या वर्षीची पावसाची आकडेवारी, पावसातील तफावत.
- कुटुंबाच्या मालकीच्या विहिरी आणि कूपनलिकांची संख्या
- पावसाळा आणि आताची पाणी पातळी स्थिती
- दुष्काळी स्थितीमुळे पीक पद्धतीतील बदल, पीक उत्पादनात झालेली घट, होणारे आर्थिक नुकसान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.