Soil and Water Conservation : पाणीटंचाईग्रस्त ‘लाठ खुर्द’ने घडविली किमया

Water Shortage : नांदेड जिल्ह्यातील लाठ खुर्द गाव पाणीटंचाईच्या झळा सोसत होते. लोकसहभाग आणि संस्थांच्या एकत्रीकरणातून गावात मृद्‍ व जलसंधारणाची विविध कामे यशस्वी करण्यात आली. त्यातून गावात शाश्‍वत जलसाठा तयार झाला.
Soil and Water Conservation
Soil and Water ConservationAgrowon

कृष्णा जोमेगावकर

Lath Khurd Village : नांदेड जिल्ह्यातील लाठ खुर्द गाव पाणीटंचाईच्या झळा सोसत होते. लोकसहभाग आणि संस्थांच्या एकत्रीकरणातून गावात मृद्‍ व जलसंधारणाची विविध कामे यशस्वी करण्यात आली. त्यातून गावात शाश्‍वत जलसाठा तयार झाला. गाव बागायती झाले. संकरित भाजीपाला बीजोत्पादनासह पूरक व्यवसायांना चांगली गती मिळाली. गावाने आज प्रगतीची किमया घडवली आहे.

नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ, अवर्षणप्रवण तालुका असलेल्या कंधारच्या उत्तरेला १६ किलोमीटरवर बालाघाटच्या कुशीत लाठ खुर्द गाव वसले आहे. लोकसंख्या सुमारे २२०० आहे. गावाच्या तीनही बाजूंना असलेल्या डोंगरदऱ्यांमधून उगम पावणारे जलप्रवाह पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळतात. लाठ खुर्द तसेच भंडारकुमठ्याची वाडी हे एका पाणलोट क्षेत्रात येतात. एकूण ८५० हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या या गावाच्या जमिनी उताराच्या व हलक्या प्रतीच्या आहेत.

गाव झाले पाणीटंचाईग्रस्त

सरासरी ७५० मिमी.च्या आसपास पर्जन्यमान असलेल्या गावात कुठल्याच सिंचन सुविधा नव्हत्या.
एकेकाळी (सन १९८० ते १९९०) कलंबर सहकारी साखर कारखान्याचा मुख्य ऊस पुरवठादार म्हणून लाठ खूर्द व भंडारकुमठ्याची वाडी यांची ओळख होती. पाटाने पाणी देऊन येथील शेतकऱ्यांनी
ऊस पिकविला खरा. परंतु कसदार जमिनी हळूहळू क्षारयुक्त व नापीक झाल्या. सन १९९५ ते २००८ या काळात गावाला तीव्र पाणी संकटाचा सामना करावा लागला. भूगर्भातील पाणीपातळी कमी झाल्याने शेतीसाठी पाणी उरले नाही. लाठ खुर्द हे तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव बनले. दर उन्हाळ्यात
टँकरची मागणी, विहीर अधिग्रहित करून गावाला पाणी पुरवण्याची वेळ आली.
उताराच्या जमिनीवर कुठलेच मृद्‍संधारणाचे उपचार झाले नव्हते. वृक्षतोडीमुळे मातीची धूप झाली. जमिनीचा पोत बिघडला. पीक उत्पादन घटले. खरिपानंतर कामाच्या शोधात स्थलांतर सुरू झाले. सुमारे ८० टक्के गाव शेतीवर अवलंबून होते. जेमतेम १५ ते २० हेक्टर शेती निव्वळ ओलिताखाली होती.

Soil and Water Conservation
Soil And Water Conservation : माती, पाणी जपणाऱ्या गावांना चांगले दिवस

युवकांच्या पुढाकारातून संकल्प

सदस्यांमधून बाहेर काढण्यासाठी गावातील युवकांची फळी तयार झाली. यात संजय घोरबांड, विनायक इंगोले, बळिराम इंगोले, रणजित घोरबांड, शंकर गिरी, दत्तात्रेय इंगोले, रामकिशन घोरबांड, विष्णू इंगोले, चंद्रकांत बाबळे, अमृता कऊटकर आदींचा समावेश होता. त्यांनी सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे (सगरोळी) अध्यक्ष प्रमोद देशमुख यांची भेट घेतली. समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानंतर डोणगाव खुर्द (ता. बिलोली) व केदार वडगाव (ता. नायगाव) येथे झालेल्या इंडो जर्मन पाणलोट क्षेत्रातील कामे देशमुख यांनी गावकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवली. माथा ते पायथा या पद्धतीने असे पाणलोट उपचार झाल्यास आपल्या गावाचे चित्रही बदलू शकते हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ‘संस्कृती’ आणि दिलासा जनविकास संस्था (यवतमाळ) यांनी नाबार्डकडे प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

जलसंधारणाची झाली कामे


श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आदी अटी मंजूर झाल्यानंतर २००८ मध्ये ‘नाबार्ड’ने इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प गावाला मंजूर केला. ‘संस्कृती’कडून प्रकल्पाची अंमलबजावणी झाली.
त्यानुसार मृद्‍- जलसंधारणाचे विविध उपचार २००८ ते २०१३ या कालावधीत पूर्ण झाले. बळीराजा पाणलोट विकास समितीचेही योगदान राहिले. त्यात पुढील ठळक गोष्टींचा समावेश राहिला.
-एकूण ८५० हेक्टर क्षेत्रापैकी २५२.३० हेक्टर पडीक व वनखात्यावरील जमिनीवर सलग समतल चर.
-३६७९ घनमीटर जलशोषक चर, ५६ ‘अर्दन’ बांध, ८८ गली प्लग, ५८३.३४ हेक्टरवर बांधबंदिस्ती, दगडी सांडवे,
-२० जाळी बंधारे, ४ सिमेंट बंधारे, २ माती नाला बांध, ७ जुन्या नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती.
-सन २०१५ मध्ये ‘ॲक्सिस’, बँक ऑफ इंडिया व ‘दिलासा’ यांच्या माध्यमातून
पाच किलोमीटर मुख्य नाल्याचे खोली- रुंदीकरण.
-एकूण ८४८ हेक्टरवर क्षेत्रावर मृद्‍- जल संधारण कामे. त्यातून जमिनीची धूप थांबली.

गाव झाले पाणीदार

हळूहळू बदल दिसू लागले. वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले. बंद अवस्थेतील २२ विहिरी व १६ विंधन विहिरी पुन्हा जिवंत झाल्या. सध्या गावात एकूण ४० विहिरी आणि ५७ बोअरवेल्स पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. प्रकल्पापूर्वी पाणलोटातील नाला सप्टेंबर- ऑक्टोबर काळात वाहायचा. आज तो जानेवारीपर्यंत वाहतो आहे. या वर्षी सरासरी ५० टक्केच पर्जन्यमान होऊनही भूगर्भातील पाणीपातळी चांगल्या स्थितीत आहे. लाठ खुर्द गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. गावातील बागायती क्षेत्रात २० हेक्टरवरून २३५ हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. शेतकरी हळद, भाजीपाला आदी नगदी पिकांकडे वळले आहेत. रब्बी व उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

शाश्‍वत विकास प्रकल्प

‘नाबार्ड’च्या सहकार्याने २०१७ ते २०१९ मध्ये गावात शाश्‍वत विकास प्रकल्प राबविण्यात आला.
यात कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले. पाणलोट क्षेत्रात
पाणी ताळेबंद आराखडा व उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.
त्यातून सूक्ष्म पद्धतीने जलनियोजन व वापर गावकरी करू लागले.

हवामान बदल अनुकूल प्रकल्प

उशिरा येणारा पाऊस, दर ३ ते ५ वर्षांनी पडणारा दुष्काळ, पीक काढणीवेळी पाऊस व गारपीट होणे आदी धोके वाढले आहेत. ते कमी करण्यासाठी गावात २०१९ पासून हवामान बदल अनुकूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. सध्या २६५० घनमीटर सलग समतल चर, जलशोषक चर पूर्ण झाले असून,
७९ लाख ५० हजार लिटर पाणी जमिनीत मुरविण्यात आले. चार जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली. त्यातून अतिरिक्त ९० लाख लिटर पाणी साठवण क्षमता तयार झाली. गांडूळ खतनिर्मिती, नाडेप, हिरवळीचे खत, ठिबक व तुषार सिंचन यांना प्रोत्साहन देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, पॉली मल्चिंग, फेरपालट, आंतरपीक प्रात्यक्षिके घेण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले. महिलांसाठी पोषण परसबाग, परसातील कुक्कुटपालन आदी उपक्रम राबविले.

गाव झाले बीजोत्पादन केंद्र

गावात शेडनेटद्वारे झुकिनी, टोमॅटो, मिरची, भेंडी आदी संकरित भाजीपाला उत्पादनास चालना मिळाली आहे. यात २५ हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत करार केले केले आहेत. या उद्योगातून वर्षाला काही लाख रुपयांची उलाढाल होत आहे. स्थानिक मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गावातील बीजोत्पादन प्रयोगांना भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. संतोष गवारे, विष्णू इंगोले, संजय घोरबांड, दत्तात्रेय इंगोले, खुशाल इंगोले, विठ्ठल घोरबांड यासह शेतकऱ्यांनी असा प्रयोगांतून आदर्श निर्माण केला आहे. स्थलांतरित झालेले मजूर पुन्हा गावी येऊन शेती व पूरक व्यवसाय करू लागले आहेत. गावात एका कंपनीद्वारे दररोज एक हजार लिटरच्या आसपास दुधाचे संकलन होते.

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
नाबार्डचे तत्कालीन जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे व विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांच्या मार्गदर्शनातून गावात संत वैरागी महाराज शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. त्याचे ५०० सभासद आहेत. ‘संस्कृती’ मंडळाचे संचालक रोहित देशमुख, कृषी विज्ञान केंद्राच्या
प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांचे सहकार्य आहे.

संपर्क ः गंगाधर कानगुलवार, ९८६०५ २१६०१
प्रकल्प व्यवस्थापक, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी
संजय घोरबांड, ८९७५५१०५२४
अध्यक्ष, बळीराजा पाणलोट विकास समिती. लाठ खुर्द

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com