Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : विश्‍व कल्याणासाठी कार्यरत ‘सप्तऋषी’

Irrigation Management : जल शाश्‍वत आणि स्थिर केल्यानंतर त्याचा विश्‍व कल्याणासाठी वापर करण्याकरिता निसर्गामधील घटक कार्यरत असतात. त्यातील सात मुख्य घटक म्हणजे वृक्ष, माती, वैश्‍विक उष्णता, सेंद्रिय कर्ब, पीक पद्धती, वाहणारा वारा आणि हिरवे गवत होय.

Team Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

Saptarishi For Water Management : जल शाश्‍वत आणि स्थिर केल्यानंतर त्याचा विश्‍व कल्याणासाठी वापर करण्याकरिता निसर्गामधील घटक कार्यरत असतात. त्यातील सात मुख्य घटक म्हणजे वृक्ष, माती, वैश्‍विक उष्णता, सेंद्रिय कर्ब, पीक पद्धती, वाहणारा वारा आणि हिरवे गवत होय. त्यांनी मी ‘सप्तऋषी’ असे म्हणतो.

पाणी व्यवस्थापनाचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, तर भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाणी या दोघांचाही एकत्र विचार करावयास हवा. भूगर्भातील पाण्यावर खरेतर मानवाचा अधिकार नाही. पण मानवाने आपली सोय आणि स्वार्थ यासाठी भूजल गरजेपेक्षाही अधिक वापरून त्याचा नाशही केला. भूगर्भातील पाण्यावर फक्त निसर्गाचाच हक्क असल्याचे मान्य केले, तर पाणी व्यवस्थापनाचे गणित सोपे होऊन जाते.

जमिनीवर साचलेले पाणी ही निसर्गाची मानवजातीस अनमोल भेट आहे. त्याचा योग्य वापर करून उर्वरित पाणी भूगर्भास सन्मानाने परत करणे, हे खरे जल व्यवस्थापन. अशा प्रकारे जल शाश्‍वत आणि स्थिर केल्यानंतर त्याचा विश्‍व कल्याणासाठी वापर करण्याकरिता निसर्गामधील घटक कार्यरत असतात. त्यातील सात मुख्य घटक म्हणजे वृक्ष, माती, वैश्‍विक उष्णता, सेंद्रिय कर्ब, पीक पद्धती, वाहणारा वारा आणि हिरवे गवत होय. त्यांनी मी ‘सप्तऋषी’ असे म्हणतो.

१) वृक्ष ः नदीच्या वाहत्या पाण्याच्या व्यवस्थापनात दोन्ही तीरांवरील वृक्ष महत्त्वाचे असतात. ते वाहत्या नदीमधील जैवविविधता समृद्ध करतात. वाळू निर्मितीमध्येही भाग घेतात. वृक्षछायेमुळे सूर्याच्या दाहक उष्णतेपासून व पर्यायाने होणाऱ्या बाष्पीभवनासाठी पाण्याचे संरक्षण होते.

पाण्यात पडलेली पाने अनेक जलजीवांच्या अन्नांचा मुख्य भाग आहेत. नदीचा पूर नियंत्रित करणे हेही वृक्षांचेच काम आहे. नर्मदा काठावरील लाखो वृक्षामुळेच ही नदी बारमाही वाहत असते. केरळमधील सर्व नद्या आणि त्यांचे काठ वृक्षांनी समृद्ध आहेत. काठावरील वृक्ष कापले गेल्यास नदी उघडी पडून हळूहळू वाहण्याची बंद होते.

२) माती ः पाणी व्यवस्थापनात सहभाग नोंदविणारा माती हा अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. भुसभुशीत माती पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या पोटात घेते. ओलावा, आर्द्रता साठवून ठेवते. आपल्या देशात ८५ टक्के कोरडवाहू शेती याच आर्द्रतेवर केली जाते.

म्हणून माती हा पाणी व्यवस्थापन करणारा आणि कदाचित बिघडून टाकणाराही घटक आहे. सेंद्रिय कर्ब भरपूर असलेल्या शेतात पावसाचे पाणी अधिक मुरते, साठते. त्यातून कृषी उत्पादन वाढते. भूजल संचयही वाढण्यास मदत होते. उलट केवळ रासायनिक खतांचा वापर होणाऱ्या शेतांमध्ये पावसाचे पाणी मुरण्याऐवजी मोकळ्या मातीलाच घेऊन (क्वचित पिकांसह) वाहून जाते.

थोडक्यात, अशी सर्व जमीन खरवडून जाते. जमिनीवरील जलसाठ्यात माती शिरताच तेथील जल व्यवस्थापनाचे गणित बिघडून जाते. अनेक लहान मोठी धरणे गाळांनी भरतात. पाणी ओसंडून वाहू लागते. गाळाने भरलेल्या धरणात पाणीसाठाही कमी होतो. म्हणूनच डिसेंबर, जानेवारीमध्येच त्यांचा मृत जलसाठा उघडा पडतो. अनेक नद्या, नाले, ओढे अशा गाळाने भरत पुढे त्यांचे वाहणेच बंद होते. एखाद्या मोठ्या पावसात त्यांचे पात्र बदलून जाते.

३) सेंद्रिय कर्ब ः पिकांचे अधिक उत्पादन पाहिजे असेल, तर सेंद्रिय खते आवश्यक आहेत. तसेच सिंचनाच्या पाण्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त असला पाहिजे. या बाबत मला कर्नाटकातील सेंद्रिय शेतकऱ्यांच्या सतत भरलेल्या विहिरी आठवतात. हे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने वर्षाला तीन आणि आंतरपिकासह अधिक पिके घेतात. कारण त्यांना मातीचे जल व्यवस्थापन कळलेले आहे.

४) वैश्‍विक उष्णता वाढ ः हा मानवनिर्मित घटक गेल्या तीन, चार दशकांपासून पाणी व्यवस्थापनाचे संपूर्ण गणित बिघडून टाकत आहे. आपल्या पृथ्वीचे सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस असले, तरी त्यात सातत्याने भर पडत आहे. म्हणूनच ध्रुवीय भागात असलेले शून्याखालील तापमान कमी होत आहे, तर जिथे उष्ण तापमान आहे, तिथे त्यात मोठी भर पडत आहे.

ध्रुवीय भागातील बर्फाच्या वितळण्यामुळे समुद्रपातळी वेगाने वाढत आहे. १० ते १५ मीटर उंचीच्या लाटा किनारी भूप्रदेशाकडे येत असल्याने तेथील शेती उद्ध्वस्त होत आहे. किनारी भागामधील गोड पाण्यात समुद्राचे खारे पाणी शिरल्याने गुणवत्ता ढासळत आहे. मानवी स्थलांतर वाढत आहे. समुद्र किनारी भागामधील जल व्यवस्थापन सांभाळण्यामध्ये खारफुटीचे जंगल आणि खाड्या महत्त्वाच्या असतात. पण बहुतांश खाड्या गाळाने भरलेल्या आहेत. खारफुटीवर माणूस कुऱ्हाडीचे घाव घालत आहे.

खारफुटीची जंगले नष्ट झाल्यानेच किनारी भागातील पाणी व्यवस्थापनच नव्हे, तर मत्स्य व्यवसायही धोक्यात आला आहे. अन्य ठिकाणीही सुपीक जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे. त्याखालील भूजल पातळीही खोल जात आहे. वाढते तापमान पृष्ठभागावरील जलसाठ्यासाठी पहिल्या क्रमांकांचा शत्रू आहे. वाढलेल्या बाष्पीभवनामुळे पाणी वातावरणात जाऊन, पूर्वीच्या रिमझिम, संथ पावसाची संततधार पावसाची जागा वादळी किंवा ढगफुटीसारख्या पावसांनी घेतली आहे. जल व्यवस्थापनाचे सर्व गणितच बिघडत आहे.

५) वाहणारा वारा ः वाढत्या उष्णतामानामुळे निर्वात पोकळ्या तयार होऊन वादळे तयार होतात. सोसाट्याने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे जमिनीवर जलाचे बाष्पीभवन वाढते. शेतातील उभी पिके, फळबागांवरील ताण वाढतात.

जमिनीवरील मोकळे मातीचे कण वाऱ्यासोबत वाहून जातात. जमिनीवरील, शेताच्या बांधावरील मोठे वृक्ष कमी झाल्याने वाऱ्यांना अडवणार कोण? जाताना उष्ण वारे जमिनीतील नैसर्गिक ओलावाही वाहून नेतात.

६) पीक पद्धती ः आपण तिन्ही हंगामांत कोणती पिके घेतो, हेही जल व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे असते. पिकाच्या वाढ, फळे, बीज उत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते हे खरे. पण आपण दिलेल्या पाण्यातील फक्त अत्यंत मोजकाच भाग घेऊन उर्वरित पाणी झाड निसर्गाला परत करते. भरपूर पाणी देणे म्हणजे शेती नव्हे! इस्राईलसारखे थेंबाथेंबाने पाणी देऊन पिकांचे उत्तम नियोजन करता येते, हे ठिबकचे तंत्र आपले शेतकरीही आता चांगल्या प्रकारे शिकले आहेत. उसासारख्या तंतुमय मुळे असणाऱ्या पिकांना जमिनीवरील सहा इंचांपर्यंतचे पाणी पुरेसे होते. सोटमूळ असलेल्या द्विदल गटांमधील पिकांना जमिनीत जास्त खोलपर्यंत जाणारे पाणी केवळ ओलावा म्हणून आवश्यक असते.

भुईमुगासारखी जमिनीवर पसरणारी पिके मातीत ओलावा कायम ठेवतात. दाट पेरणी केलेले पीक शेतात सेंद्रिय जमिनीत ओलावा धरून ठेवते. ठिबक सिंचन, हरितगृहे, बांधावरील घनदाट वृक्ष, मातीतील सेंद्रिय कर्ब आणि योग्य पिकांची निवड यातून जल व्यवस्थापन योग्य पद्धतीने साधता येते. कमी पाणी, किंवा पाऊस असलेल्या क्षेत्रात पारंपरिक द्विदल म्हणजेच डाळवर्गीय पिके पेरणे योग्य असते. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी रासायनिक खतांचा बिलकूल वापर करू नये.

७) हिरवे गवत ः पाणी व्यवस्थापनामध्ये जंगलांइतकाच, किंबहुना त्यापेक्षाही काकणभर जास्त वाटा गवताचा असतो. गवते आपल्या तंतुमय मुळांनी जमिनीत ओल पकडून ठेवतात. गवते जमिनीवर वेगाने आडवी पसरतात. मातीच्या कणांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. पावसाचे पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होते. म्हणूनच डोंगर उतारावरील गवते तिथे उगम पावणाऱ्या नद्यांना नेहमी वाहते ठेवतात. पिकामध्ये तणेही आर्द्रता जपण्यास मदत करतात. म्हणून १५-२० टक्के तणे शेतात राहिली तरी ती पिकांशी स्पर्धा करत असल्याने पिकेही जोमाने वाढण्याचा प्रयत्न करतात. मातीमधील ओलावाही टिकून राहतो.

डोंगरावरील गवते तर त्याच्या पायथ्याशी असलेल्या धरणातील पाणी संरक्षण, गाळ प्रतिबंधक म्हणूनही कार्य करते. संपूर्ण डोंगर गवताचे आच्छादित असल्यास धरण गाळमुक्त राहण्यास मदत होते. गवताचा उपयोग राखीव जलसाठा कायम ठेवण्याबरोबर नद्यांना वाहते ठेवण्यातही महत्त्वाचा असतो. गेल्या आठवड्यात ‘ॲग्रोवन’मध्ये सतीश खाडे यांनी लिहिलेल्या ‘चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत या लेखात अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधील नदी फक्त गवत आणि वृक्षांमुळे कशी जिवंत झाली याची सत्यकथा मांडली होती. नदीला जोडलेली जैवविविधता व तेथील अन्न साखळी यशस्वीपणे कार्यरत होणे किती गरजेचे आहे हे त्यातून स्पष्ट होते. आपण मात्र आपल्या नद्या वाळू काढण्यासाठी यंत्रांनी उकरत चाललो आहोत. तेथील वाळूसोबतच मूळ परिसंस्था उद्ध्वस्त करत चाललो आहोत. अशाने नदी बारमाही कशी वाहती राहील?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT