Dairy Business : शेतीपेक्षा दुग्ध व्यवसाय झाला मुख्य

Dairy Farming : सातशे लिटर रोजचे दूध संकलन
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Milk Production : आजोबांच्या काळापासून सुरू असलेल्या घरच्या दुग्ध व्यवसायाचा व्यावसायिक विस्तार युवा शेतकरी हेमंत पासलकर (माले, जि, पुणे) यांनी केला आहे. स्वच्छ, सुसज्ज, हवेशीर गोठा व सुयोग्य व्यवस्थापनातून दिवसाला सातशे लिटर दूध संकलन व पुणे शहरातील हमीची बाजारपेठ त्यांनी मिळवली आहे. दहा एकर शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायच त्यांचा मुख्य उत्पन्नस्रोत झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि विशेषतः माले गाव डोंगरदऱ्यांनी वेढले आहे. पारंपरिक भात शेती आणि चार- पाच म्हशींचा गोठा हे इथल्या शेतकऱ्यांचे समीकरण होते. पुणे शहर जवळ असल्याने झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि नागरिकीकरण यामुळे तालुक्यातील शेतीचे क्षेत्र कमी होत गेले. मात्र मालेतील पासलकर कुटुंबाने आपली शेती व दुग्ध व्यवसाय टिकवून धरला आहे.

दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण

सध्या पासलकर कुटुंबातील तरुण पिढीतील हेमंत दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. पूर्वी त्यांचे
आजोबा आणि त्यानंतर वडील रामचंद्र पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करायचे. त्यावेळी तीन म्हशी आणि आठ गायी होत्या. त्यावर घर चालायचे. पुणे शहराची दुधाची वाढती गरज व संधी हेमंत यांनी ओळखली. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी २०१३ च्या दरम्यान संपूर्ण व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाचा निर्णय घेतला. पंजाब, हरियाना येथे जाऊन दुग्धोत्पादक, मोठे गोठे, व्यवस्थापन यांचा अभ्यास केला. गावी परतल्यानंतर कॅनरा बँकेच्या माले शाखेकडे प्रस्ताव दिला. तीस लाखांचे कर्ज आणि स्वभांडवलातून गोठा उभारणी केली. दहा मुऱ्हा म्हशींची हरियानातून खरेदी केली.

Dairy Business
Dairy Business : पूरक नव्हे तर दुग्धव्यवसाय झाला मुख्य अन शाश्‍वत

गोठा उभारणी व व्यवस्थापन

सन २०१७ पासून प्रत्यक्ष व्यवसायाने गती घेतली. मुबलक पाणी व जागा होती. आता ५० म्हशींचे नियोजन करून आठ हजार चौरस फुटांचा गोठा शास्त्रोक्त पद्धतीने उभारला. त्यामध्ये ‘हेड टू हेड’ पद्धत, गव्हाणीची योग्य उंची, शेण- मूत्र वाहून जाण्याची व्यवस्था, पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि जागेवरच पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आदी बाबींचा विचार केला. भविष्यात गायीही घ्याव्या लागतील या उद्देशाने पाच हजार चौरस फुटांचा स्वतंत्र मुक्त गोठा उभारला. म्हशींचा गोठा स्थिरावल्यानंतर २०१८ मध्ये बंगळूर येथून २० गायी खरेदी केल्या.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसाय दुसऱ्या श्‍वेतक्रांतीच्या दिशेने...

व्यवस्थापनातील ठळक बाबी

- सध्या ५० म्हशी (मुऱ्हा) व २५ गायी (एचएफ).
-दररोज पहाटे साडेतीन वाजता काम सुरू. गोठा स्वच्छता, त्यानंतर पशुखाद्यात भिजवलेला खुराक देण्यात येतो. त्यानंतर कडबा किंवा कुट्टी दिली जाते.
- साडेचार वाजता दूध काढणी होते. गायींचे दूध यंत्राद्वारे तर म्हशींचे दूध हाताने काढले जाते.
-पाचशे लिटरच क्षमतेचा चिलर आहे. त्यात उणे पाच अंशाला दूध साठवण्याची सोय.
-जनावरांची संख्या पाहता पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी स्वतःच्या पाच आणि भाडेतत्त्वावरील
पाच अशा दहा एकरांत मका व अन्य चारापिकांची लागवड आहे. वर्षभरात ६० टक्के चारा स्वतःकडील उपलब्ध होते.
-नुकत्याच व्यालेल्या गायी- म्हशीचे चांगल्या प्रकारे पोषण व्हावे, दुधात सातत्य राहावे यासाठी विशेष आहार दिला जातो. यात मोड आलेली मेथी व गूळ उकळून त्याचे द्रावण, त्यात मोहरीचे तेल
आणि रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी थोड्या प्रमाणात हळद असा खुराक तयार केला जातो. दर चार दिवसांनी तो २०० ग्रॅम प्रति पशुधन याप्रमाणे दिला जातो. त्यातून आरोग्यासह दुधाचे फॅटही चांगले राहते.
-हेमंत यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक
उपचार शिकून घेतले. सहा वर्षांच्या अनुभवातून ते याबाबत कुशल झाले आहेत.
-नियमित उपचारांसाठी विविध औषधांचा साठा सज्ज. गरजेनुसार पशुवैद्यकांची मदत घेण्यात येते.
-बाएफ व एका अमेरिकन कंपनीकडील ‘सीमेन’ आधारे गोठ्यात जातिवंत पैदास
करण्यावर भर. सध्या ५० पैकी २० म्हशींची गोठ्यात पैदास झाली आहे.

अर्थकारण

दररोज सातशे लिटरपर्यंत एकूण दूध संकलन होते. पुणे शहरातील कोथरूड, पाषाण, सूस परिसरातील डेअरी चालक व स्वीट मार्टना रोजचे वितरण होते. गायीच्या दुधाला प्रति लिटर ४३ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळतो. रोजचा पुरवठा कायम ठेवण्याच्या दृष्टीने गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. जून-जुलै, ऑक्टो.-नोव्हेंबर व फेब्रु.- मार्च असे वेताचे तीन टप्पे केले जातात. गर्भधारणा व वेत यांचे नियोजन त्यानुसार होते. दुसऱ्या, चौथ्या वितातील जनावरांची विक्री वर्षाला १० ते १५ या संख्येने होते. नवी जनावरेही खरेदी केली जातात. त्यामुळेही दूध संकलन नियमित राहते. गाभण जनावराची किंमत ८५ ते ९० हजार रुपयांच्या दरम्यान, तर व्यालेल्या जनावराची किंमत एक लाख २० हजार रुपये असते. दुग्ध व्यवसायातून महिन्याला ४० ते ४५ टक्के नफा होतो. त्यातील १० टक्के वाटा हा जनावरे खरेदी किंवा गोठा व्यवस्थापन बाबींसाठी वापरला जातो. भविष्यात दूध संकलन वाढवून गावातच प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा हेमंत यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध दूध प्रकल्पांना भेटी देऊन ते अभ्यास करीत आहेत.

हेमंत पासलकर, ९७६४६७६१२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com